ज्ञान आणि भक्‍ती यांचा सुरेख संगम असणारे ईश्‍वरपूर, जिल्‍हा सांगली येथील पू. राजारामभाऊ नरुटे (वय ९० वर्षे) !

१. परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा श्री. राजारामभाऊ नरुटे यांना लाभलेला सत्‍संग

पू. राजाराम नरुटे

एकदा माझ्‍या वडिलांना (आबांना, श्री. राजाराभाऊ नरुटे यांना) परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्‍संग लाभला. त्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी पू. आबांविषयी पुढील गौरवाद़्‍गार काढले.

१ अ. पू. आबांच्‍या बोलण्‍यातून निर्माण होणारी स्‍पंदने अंतःकरणापर्यंत जातात आणि वातावरण हलके होतेे ! : परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी सत्‍संगात सांगितले, ‘‘आबा (श्री. राजाराभाऊ नरुटे) जे सांगतात, ते त्‍यांनी कुठे शिकले आहे किंवा वाचले आहे, असे नाही, तर त्‍यांना देवाकडून ज्ञान मिळते. त्‍यांच्‍या बोलण्‍यातून निर्माण होणारी स्‍पंदने अंतःकरणापर्यंत जातात आणि वातावरण हलके होते. त्‍यांच्‍या बोलण्‍याचा शब्‍दशः अर्थ न पहाता त्‍यामागचा कार्यकारणभाव आणि स्‍पंदने लक्षात घ्‍यावीत.’’

१ आ. ‘शंकरची (पू. राजाराम नरुटे यांच्‍या मुलाची) (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के) प्रगती लवकर लवकर कशामुळे होत आहे ?’, त्‍याचे कारण माझ्‍या आता लक्षात आले. त्‍याची प्रगती होण्‍यामागे तुम्‍ही आहात.

१ इ. पू. आबांना दिवाळी, गुढीपाडवा अशा सणांच्‍या वेळी आश्रमातून खाऊ पाठवावा.

१ ई. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी पू. आबांना सांगितले, ‘‘तुम्‍ही साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करा आणि सर्वांना पुढे घेऊन जा.’’

१ उ. ते कुटुंबियांना म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही पू. आबांची सेवा करा. त्‍यातूनच तुमची प्रगती होणार आहे. शंकर आश्रमात असतो. तुम्‍ही पू. आबांचा लाभ करून घ्‍या.’’

२. परात्‍पर गुरु डॉ. आठवले आणि पू. राजारामभाऊ नरुटे (पू. आबा) बोलत असतांना जाणवलेली सूत्रे !

श्री. शंकर नरुटे

अ. त्‍या दोघांचे बोलणे सहजावस्‍थेतील वाटत होते. पू. आबा परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना प्रथमच भेटले होते; पण दोघेही पूर्वीपासून फार चांगली ओळख असल्‍यासारखे सहजतेने बोलत होते. त्‍यांचे बोलणे ऐकून ‘दोन मित्र सहजतेने बोलत आहेत’, असे वाटत होते.

आ. पू. आबांनी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना नमस्‍कार केल्‍यावर त्‍यांनीही त्‍यांच्‍या चरणांना हात लावून नमस्‍कार केला. त्‍या वेळी परात्‍पर गुरु डॉक्‍टर म्‍हणाले, ‘‘मला वाकता येत नाही. मी असाच नमस्‍कार करतो.’’ तेव्‍हा पू. आबा म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही वाकू नका. मी तुम्‍हाला नमस्‍कार केला किंवा तुम्‍ही मला नमस्‍कार केला, एकच आहे.’’

३. पू. आबांच्‍या संतसन्‍मान सोहळ्‍याच्‍या वेळी जाणवलेली सूत्रे

३ अ. पू. आबांनी श्रीविष्‍णूच्‍या विविध रूपांची साधना केली असल्‍याने विष्‍णुस्‍वरूप परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या वतीने पू. पृथ्‍वीराज हजारे यांच्‍या हस्‍ते पू. आबांचा संतसन्‍मान सोहळा झाल्‍याबद्दल कृतज्ञता वाटणे : पू. पृथ्‍वीराज हजारे यांनी विष्‍णुस्‍वरूप परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या वतीने बाबांनी संतपद गाठल्‍यानिमित्त त्‍यांचा सन्‍मान केला. त्‍या वेळी मला जाणवले, ‘पू. आबांनी श्रीविष्‍णूच्‍या विविध रूपांची साधना केली आहे. ते सतत श्रीविष्‍णूच्‍या दहा अवतारांचे कार्य सांगत असतात. त्‍यामुळेच कलियुगातील विष्‍णूचा अवतार असणारे ‘जयंत अवतार’ त्‍यांना भेटले आणि त्‍यांचा अनेक जन्‍मांचा विष्‍णूचा सहवास सूक्ष्म रूपाने दाखवून त्‍यांना संतत्‍व प्रदान केले अन् मुक्‍त केले.’ पुराणातील विष्‍णूच्‍या अनेक अवतारांमध्‍ये अनेक जणांचा उद्धार करणार्‍या गोष्‍टी ऐकल्‍या होत्‍या. मला माझ्‍या डोळ्‍यांसमोर ही गोष्‍ट अनुभवता आली. त्‍याबद्दल भगवंताच्‍या चरणी कितीही कृतज्ञता व्‍यक्‍त केली, तरी ती अल्‍पच आहे.

३ आ. ‘पू. आबा बोलत असतांना त्‍यांचे प्रत्‍येक वाक्‍य अंतर्मनातून येत होते. पू. आबा विश्‍वमन आणि विश्‍वबुद्धी यांतून येणारे विचार ग्रहण करून बोलतात’, असे मला वाटते.

३ इ. मुलांकडून कोणतीच अपेक्षा नसणे : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पू. आबांना विचारले, ‘‘शंकरदादांनी (मुलाने) कुठे राहून साधना करायला हवी ?’’ त्‍या वेळी पू. आबा म्‍हणाले, ‘‘तो रामनाथी आश्रमात राहू दे किंवा देवद आश्रमात राहू दे. तुम्‍ही सांगाल, तिकडे त्‍याला सेवा करू दे. माझे काहीही म्‍हणणे नाही.’’ यातून ‘त्‍यांना आता मुलांकडून कोणतीच अपेक्षा राहिलेली नाही’, हे लक्षात येते.

४. गुरु आणि शिष्‍य यांची सहजावस्‍था अन् एकरूपता

पू. आबांनी परात्‍पर गुरु डॉक्‍टरांना वाकून नमस्‍कार केल्‍यावर परात्‍पर गुरु डॉक्‍टर पू. आबांना नमस्‍कार करण्‍यासाठी वाकण्‍याचा प्रयत्न करत होते. तेव्‍हा पू. आबा त्‍यांना म्‍हणाले, ‘‘तुम्‍ही वाकू नका. मीच माझे पाय वर घेतो.’’ पू. आबांनी दोन्‍ही पाय वर उचलले. त्‍यांची ही कृती सहज झाली. हे पाहिल्‍यावर मला आरंभी वेगळे वाटले; पण नंतर ‘गुरु आणि शिष्‍य यांची सहजावस्‍था’ या प्रसंगातून लक्षात आली. दोघेही ‘नाही भेदाभेद’ याप्रमाणे एकरूप झाल्‍यामुळे दोघांकडूनही ही कृती सहजतेने झाली.’

– श्री. शंकर नरुटे (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.