भारतीय संस्कृतीमध्ये मनुष्याच्या सर्वांगीण विकासाची चावी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
भोपाळ (मध्यप्रदेश) येथील ‘टीआईटी इन्स्टिट्यूट’मध्ये ‘भारतीय संस्कृतीची वैज्ञानिकता’ विषयावर परिसंवाद !
भोपाळ (मध्यप्रदेश) – अमेरिकेत साक्षरतेसह आर्थिक, औद्योगिक आणि तंत्रज्ञान आदी सर्व विषयांत विकास झाला; परंतु त्यांना विकासाची सर्वांगीण दृष्टी नसल्यामुळे तेथे आज ६० ते ७० टक्के लोक मानसिक रोगाने त्रस्त आहेत. तेथे गुन्हेगारी, व्यसनाधिनता, बलात्कार आदी घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आपणही भारतीय संस्कृती आणि अध्यात्म यांच्याकडून मिळालेली दृष्टी सोडून विकासाच्या मागे धावलो, तर आपलीही निश्चित अधोगती होईल. आज आधुनिक विज्ञानानेही आरोग्यासाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासह आध्यात्मिक आरोग्य महत्त्वाचे असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती आणि अध्यात्म यांच्यात मनुष्याच्या सर्वांगीण विकासाची चावी आहे, हे आपण लक्षात घेणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले.
येथील ‘टेक्नोक्रॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स’मध्ये आयोजित ‘भारतीय संस्कृतीची वैज्ञानिकता’ या विषयावरील परिसंवादात ते मार्गदर्शन करत होते. या वेळी इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. शशीकुमार जैन, प्राचार्य श्री. शिशिर आनवेकर आणि समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांच्यासह १५० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी इन्स्टिट्यूटच्या वतीने सद्गुरु डॉ. पिंगळे यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
सद्गुरु डॉ. पिंगळे पुढे म्हणाले,
‘‘आज जगातील अनेक देशांमध्ये संस्कृत आणि भारतीय ज्ञान यांच्या तज्ञांचे महत्त्व वाढत चालले आहे. भारत नेहमीच प्रत्येक क्षेत्रात पुढे होता. उज्जैनच्या महाकालकडून काळाचे निर्धारण होते. आजच्या आधुनिक विज्ञानाने बनवलेली कोणत्याही वस्तूचे आयुष्य १०० वर्षांहून अधिक नाही; परंतु आपली अनेक मंदिरे शेकडो वर्षांपासून उभी आहेत. एवढे प्रगत अभियंते आपल्याकडे होते. आयुर्वेद, शल्यक्रिया, ग्रहज्ञान, शून्याचा शोध, विमानाचा शोध, असे अनेक शोध भारताच्या ऋषींनी लावले होते, तर मग आपण मागास कुठे होतो ?
आज विदेशात विद्यार्थ्यांना प्रेम मिळणे सोडा, साधे त्यांचे दायित्व घेण्यासाठीही आई-वडील सिद्ध नाहीत. भारतातील विद्यार्थ्यांचे भाग्य आहे की, त्यांचे आई-वडील त्यांचे दायित्व घेत आहेत. आजी-आजोबा त्यांच्यावर संस्कार करत आहेत आणि परिवार त्यांच्यावर लक्ष ठेवत आहे. यासाठी आपण नेहमी कृतज्ञ राहिले पाहिजे.