बसवाहकाने एक रुपया परत दिला नाही; म्हणून प्रवाशाला ३ सहस्र रुपये हानीभरपाई !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथे बसवाहकाने प्रवाशाला तिकिटाचा एक रुपया परत न दिल्याने प्रवाशाने ग्राहक न्यायालयाकडे तक्रार केली. याच्या परिणामस्वरूप न्यायालयाने ग्राहकाला ३ सहस्र रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश दिला.

वर्ष २०१९ मध्ये रमेश नायक हे बी.एम्.टी.सी.च्या बसने प्रवास करत होते. त्यांनी शांतीनगर ते मॅजेस्टीक बस आगारापर्यंत जाण्यासाठी तिकीट काढले होते. तिकिटाचा दर २९ रुपये एवढा होता. नायक यांनी बसवाहकाला ३० रुपये दिले; मात्र वरचा एक रुपया बसवाहकाकडून नायक यांना मिळाला नाही. त्यामुळे संतापलेल्या नायक यांनी थेट जिल्हा ग्राहक न्यायालयात खटला प्रविष्ट केला. नायक यांनी एक रुपयाच्या बदल्यात १५ सहस्र रुपयांची हानीभरपाई मागितली. त्यावर न्यायालयाने नायक यांना २ सहस्र रुपयांची हानीभरपाई देण्यास बी.एम्.टी.सी.ला आदेश दिला. तसेच कायदेशीर प्रक्रियेसाठी खर्च झालेले १ सहस्र रुपयेही देण्याचा आदेश दिला.