मुंबईवर आक्रमण करणारे तुमच्या देशात मोकाट फिरत आहेत !

जावेद अख्तर यांनी लाहोरमध्ये पाकला सुनावले !

लेखक, गीतकार जावेद अख्तर

लाहोर (पाकिस्तान) – आम्ही मुंबईकर आहोत. आम्ही पाहिले की, आमच्या शहरावर कसे आक्रमण करण्यात आले होते. आक्रमण करणारे लोक नॉर्वे किंवा इजिप्त देशांतून आले नव्हते. ते आक्रमणकर्ते आजही तुमच्या देशात मोकाट फिरत आहेत. ही तक्रार जर एखाद्या भारतीय नागरिकाने केली, तर तुम्हाला त्याचे वाईट वाटायला नको, अशा शब्दांत भारतीय लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी येथे पाकिस्तानला सुनावले. जावेद अख्तर लाहोर येथील फैज फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. त्या वेळी ते बोलत होते. त्यांच्या या विधानाचे उपस्थितांकडून टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले, तर भारतातही जावेद अख्तर यांचे कौतुक होत आहे. सामाजिक माध्यमांतून या विधानांचा व्हिडिओ प्रसारित होत आहे.

पाकिस्तानने कधी लता मंगेशकर यांचा कार्यक्रम आयोजित केला नाही !

जावेद अख्तर पुढे म्हणाले, ‘आम्ही पाकिस्तानी गायक नुसरत फतेह अली खान आणि मेहंदी हसन यांचे जाहीर कार्यक्रम आयोजित केले होते; पण तुमच्या देशात मात्र लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम झाला नाही.’ त्यांच्या या वाक्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.

संपादकीय भूमिका

पाकला त्याच्या देशात जाऊन अशा प्रकारे सुनावणारे जावेद अख्तर यांचे अभिनंदन ! यातून गेंड्याच्या कातडीच्या पाकवर काही परिणाम होण्याची शक्यता नाहीच; मात्र भारतातील एक तथाकथित निधर्मीवादी मुसलमान पाकमध्ये जाऊन पाकला सुनावत असेल, तर ते कौतुकास्पदच म्हणावे लागेल !