बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य आपल्याला करायचे आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सिंधुदुर्गनगरी येथे आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनाचे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी – आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी केलेले कार्य आणि त्याग विसरता येणार नाही. त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते युगप्रवर्तक ठरले. जिल्ह्यात झालेले त्यांचे स्मारक आणि पत्रकार भवन हे त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे आहे. त्यामुळे ते पत्रकारांना ऊर्जा आणि प्रेरणा देणारे ठरेल. दर्पणकारांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य आता आपल्याला करायचे आहे. राज्य सरकार यासाठी लागणारे सर्व सहकार्य करेल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे आयोजित कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे (‘ऑनलाईन’) बोलतांना दिले.
#सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आद्य पत्रकार #बाळशास्त्री_जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनाचे उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला. या सोहळ्याला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून पत्रकार बांधवांशी संवाद साधला. pic.twitter.com/aganVWksom
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 20, 2023
सिंधुदुर्गनगरी येथे आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक आणि पत्रकार भवनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते २० फेब्रुवारी या दिवशी करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर भाजपचे आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस्.एम्. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, जिल्हा पत्रकारसंघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या वेळी जिल्हा पत्रकारसंघाच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘ऑनलाईन’ पद्धतीने उपस्थितांशी संवाद साधला.
पत्रकारिता पेशाचे पावित्र्य टिकवणे हा पत्रकारांचा धर्म ! – नारायण राणे, केंद्रीय मंत्री
केंद्रीय मंत्री नारायण राणे या वेळी म्हणाले, ‘‘आद्यपत्रकार जांभेकर यांनी केलेल्या कार्याचा आदर्श ठेवून त्यांचे गुण जोपासतो का ? याचे पत्रकारांनी चिंतन केले पाहिजे. पत्रकारिता हा पेशा आहे. त्यामुळे त्याचे पावित्र्य राखणे हे कर्तव्य नाही, तर पत्रकारांचा तो धर्म आहे आणि तो सर्वांनी पाळला पाहिजे. अशी भवने अनेक उभी रहातील, पण ज्यांच्या नावाने भवन उभे रहाते, त्यांच्याप्रमाणे समाजप्रबोधनही झाले पाहिजे. त्यामुळे पत्रकारांनी विचारातून समाज घडवण्याचे काम केले पाहिजे. समाज, राज्य आणि देश यांच्या जडणघडणीत आपण काय योगदान देतो, याचा विचार झाला पाहिजे.’’
पत्रकारांसाठीच्या योजनांसाठीच्या अटींमध्ये शिथिलता आणा ! – एस्.एम्. देशमुख यांची मागणी
एस्.एम्. देशमुख या वेळी म्हणाले, ‘‘हे पत्रकार भवन राज्यातील पहिले आणि देशातील दुसरे आहे. मुंबई-गोवा महामार्गाला आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नावे दिले जावे. राज्य शासन पत्रकारांसाठी निवृत्तीवेतन योजना, आरोग्ययोजना राबवत आहे, मात्र याच्या अटी अत्यंत जाचक आहेत. त्यामुळे त्याचा लाभ पत्रकारांना मिळण्याचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे या अटींमध्ये शिथिलता आणली पाहिजे.’’
आमदार नितेश राणे म्हणाले, ‘‘आताचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे या भवनात आधुनिक तंत्रज्ञानाचीही उपलब्धता व्हावी, तसेच पत्रकारांनीही आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. जेणेकरून पत्रकारांना त्याचा लाभ होईल.’’
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही ‘ऑनलाईन’ पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी होऊन शुभेच्छा दिल्या आणि पत्रकारसंघाला लागणारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा पत्रकारसंघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी पत्रकार भवनाला मूर्त स्वरूप येण्यासाठी प्रारंभापासून सहकार्य केलेल्या सर्वांचे या वेळी आभार मानले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.