सोलापूर महानगरपालिकेचे १ सहस्र ७५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर !
सोलापूर, २० फेब्रुवारी (वार्ता.) – महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी २०२३-२४ या वित्तीय वर्षासाठी महापालिकेचे १ सहस्र ७५ कोटी रुपयांचे प्रशासकीय अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले. यामध्ये सोलापूर महानगरपालिकेला विविध गोष्टींतून मिळणारे उत्पन्न ६७७ कोटी २७ लाख ४७ सहस्र रुपये दाखवण्यात आले असून भांडवली कामांसाठी उपलब्ध होणारी रक्कम ७० कोटी ४८ लाख रुपये इतकी दाखवण्यात आली आहे. यासमवेतच अंदाजपत्रकामध्ये केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान ३२४ कोटी ९४ लाख रुपये दाखवण्यात आले आहे.
या वेळी आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमाच्या (NCAP) अंतर्गत हवेतील प्रदूषण अल्प करणे आणि हवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, हे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी महानगरपालिकेने शहरातील १० मुख्य वर्दळीच्या ठिकाणी धूळ नियंत्रित करण्यासाठी पाण्याचे कारंजे सिद्ध करणे. १० ठिकाणी नागरिकांसाठी हरित पट्टा सिद्ध करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण न्यून करून ती जागा विकसित करून तेथे नागरिकांना बसण्याठी जागा विकसित करणे, २१ ठिकाणच्या ‘डिव्हायडर’ची उंची वाढवणे, त्यांना रंग देणे, सुशोभिकरणाची झाडे लावणे, शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या पुणे नाका येथे ‘व्हर्टिकल गार्डन’ सिद्ध करणे, तेथील ‘आयलंड’ सुशोभिकरण करणे यांविषयी आराखडा सिद्ध करण्यात आलेला आहे. शहरातील ८ प्रमुख वर्दळीचे रस्ते धूळमुक्त करण्यासाठीचा आराखडाही सिद्ध करण्यात आलेला आहे.