सुक्या खजुराच्या नावाखाली अडीच कोटींची तस्करी होणारी ३३ टन सुपारी जप्त !
नाशिक विमानतळाजवळ कारवाई !
नाशिक – दुबई येथून सुक्या खजुराच्या नावाखाली आयात केलेल्या ३३ टन सुपारीची तस्करी येथील विमानतळाच्या बाजूलाच असलेल्या जानोरी येथील ड्रायपोर्टवर नागपूर सीमा शुल्क विभागाच्या पथकाने उघडकीस आणली आहे. ही सुपारी २ कोटी ५० लाख रुपयांची असून बाजारात सुपारीची किंमत ६ कोटी रुपयांहून अधिक आहे.
नागपूर सीमा शुल्क विभागाला या तस्करीविषयी माहिती मिळाली होती. त्यांनी ड्रायपोर्टवर ६ कंटेनरची पडताळणी केल्यानंतर तस्करीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ‘पीके इंटरप्राईजेस’चे संचालक आणि मुख्य सूत्रधार प्रथमेश काटकर या व्यापार्याला अटक करण्यात आली आहे. त्याला २ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दुबई येथील जुबेर अली यांच्या नावाने हे कंटेनर नोंद करण्यात येत होते. व्यापारी काटकर यांच्या मुंबई आणि नाशिक येथील गोदामे अन् कार्यालये येथे पथकाने धाडी टाकून आक्षेपार्ह कागदपत्रेही जप्त केली आहेत.
संपादकीय भूमिकातस्करखोरांना वेळीच कठोर शिक्षा केल्यास अशा प्रकारांना आळा बसेल ! |