गोंदे (जिल्हा नाशिक) गावात ८० हून अधिक भूकंपाचे धक्के !
|
नाशिक – जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील गोंदे गावी तब्बल ८० हून अधिक वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचे संशोधनही झाले; पण कारणे अद्याप समोर आलेली नाहीत. प्रशासनाकडून काहीच उपाययोजना काढण्यात येत नसल्याने ‘ते मरणाची वाट पहात आहेत का ?’ असा प्रश्न संतप्त गावकर्यांनी उपस्थित केला आहे.
गोंदे गावाचे शेतकरी मोहन माळगावे म्हणाले की,
१. गोंदेपासून साधारणतः अडीच किलोमीटर अंतरावरील निरगुडे या गावची घरेही अशाच पद्धतीने मोडकळीस आली आहेत. भूकंपामुळे अनेक घरांना तडे गेले असून या गावात काही मासांपूर्वी भूमीतून आवाज येऊन पाण्याचे बुडबुडेही बाहेर पडत होते.
२. याविषयी प्रशासनाचे अधिकारी, तसेच भूगर्भ अभ्यासकांनी संशोधन केले; मात्र नक्की कारण अद्यापही समोर आलेले नाही. गोंदे हा भूकंपाचा केंद्रबिंदू ठरत असून आसपासच्या ५ किलोमीटर अंतरावरील जवळपास ३२ गावांवर याचा परिणाम जाणवत आहे.
३. गावातील नदीचा डोह कधीही आटत नव्हता; मात्र काही वर्षांपूर्वी भूकंपाचा हादरा बसल्यानंतर वर्ष २००० मध्ये या डोहातील पाणीच नाहीसे झाले, तसेच भूमीला भेगा पडल्या, भल्या मोठ्या खडकांनाही तडे गेले, तर अनेक झाडेही कोसळली आहेत. सागाचे झाड चिरले.
४. त्यानंतर तहसीलदार आणि शास्त्रज्ञ आले होते. पहाटेच्या वेळी अधिक धक्के बसले. अमावास्या किंवा पौर्णिमा यांना हे प्रमाण अधिक होते. कधी कधी पुष्कळ जोरात धक्के बसतात.
५. दूरवरील गावांनाही हादरा बसतो. घरातील भांडी पडतात. २ मासांपूर्वी भूकंपाचा हादरा बसल्यानंतर डोह आटला, तर खडकाची चाळणी झाली. आमची घरे कच्ची आहेत. गावात अनेक वेळा ना वीज असते, ना भ्रमणभाष नेटवर्क ! भूकंप झाल्यानंतर प्रशासनाचे अधिकारी येतात आणि फक्त समजूत काढून जातात.
याविषयी पेठ तालुक्याचे तहसीलदार संदीप भोसले म्हणाले की, गोंदे-भायगाव येथे पूर्वीपासून सौम्य धक्के बसतात. वेळोवेळी याची नोंद भूकंपमापन केंद्रात होते. धक्के सौम्य प्रकारचे असल्याने जीवित आणि वित्त हानी झालेली नाही. अशा वेळेस लोकांचे मनोधैर्य खचू नये आणि भीती वाटू नये; म्हणून प्रशासनाच्या वतीने तिथे जनजागृती केली जाते. मागे पावसाळ्यात भूमीला भेगा पडल्या, बुडबुडे निघत होते. या अनुषंगाने विशेष पथक येऊन त्यांनी संशोधनाचा प्रयत्न केला; पण निश्चित कारण समजू शकलेले नाही. निश्चितच त्या ठिकाणी ८० हून अधिक धक्के बसले आहेत. |