४ पत्नी आणि ४० मुले, हे स्वातंत्र्यानंतरचे सनातनवरील मोठे आक्रमण ! – कथावाचक श्री देवकीनंदन ठाकूर महाराज
|
नागपूर – जोपर्यंत लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा होत नाही, तोपर्यंत जमतील तेवढी मुले जन्माला घाला. प्रत्येक सनातनी दांपत्याने किमान ५-६ मुले जन्माला घालावीत. यासाठी वेळेत विवाह करावा, तसेच सनातनी मंडळाची स्थापना करावी. या मंडळात धर्माचार्यांना घेण्यात यावे. लोकसंख्येवर आजपर्यंत नियंत्रण आणता आलेले नाही. लोकसंख्येचा एवढा मोठा स्फोट होण्याचा कुणी विचारही केला नसेल. ४ पत्नी आणि ४० मुले असतात, त्यावर कुणी बोलत नाही. स्वातंत्र्यानंतरचे सनातनवरील हे सर्वांत मोठे आक्रमण आहे, असे मार्गदर्शन कथावाचक श्री देवकीनंदन ठाकूर यांनी २० फेब्रुवारी या दिवशी येथे केले.
श्री देवकीनंदन ठाकूर महाराज यांना अनेकदा जिवे मारण्याची धमकी !
मुसलमानांच्या विरोधात बोलत असल्याच्या कारणावरून श्री देवकीनंदन महाराज यांना सौदी अरब येथून एका अज्ञात व्यक्तीने डिसेंबर २०२२ मधील शेवटच्या आठवड्यात भ्रमणभाषवरून शिवीगाळ करून बाँबने उडवून देण्याची आणि भरचौकात जिवंत जाळण्याची धमकी दिली. महाराष्ट्र पोलिसांनी याची गंभीर नोंद घेत चौकशी चालू केली होती. यापूर्वीही श्री देवकीनंदन ठाकूर महाराज यांना अनेकदा जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. प्रियाकांतजू मंदिरात एका मुसलमान संघटनेच्या नावाने पत्र आले होते. त्यात महाराजांना हिंदुत्वाचा प्रचार केल्यास सामूहिक नरसंहार करण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी वृंदावन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. देहली येथे जातांना त्यांच्यावर आक्रमण करण्याचाही प्रयत्न झाला होता.
श्री देवकीनंदन ठाकूर महाराज यांचा परिचय !कथावाचक श्री देवकीनंदन ठाकूर यांना ‘कथावाचक देवकीनंदन ठाकूर महाराज’ या नावाने ओळखले जाते. ते कथावाचक, गायक आणि आध्यात्मिक गुरु आहेत. त्यांचे दूरदर्शन आणि आणि यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रम असतात. ते वर्ष १९९७ पासून श्रीमद्भागवत कथा, श्री रामकथा, देवी भागवत, शिवपुराण कथा, श्रीमद्भगवद्गीता आदी विषयांवर प्रवचने करतात. त्यांना वर्ष २०१५ चा ‘उत्तरप्रदेश रत्न’ हा पुरस्कार मिळाला आहे. देवकीनंदन ठाकूर महाराज यांचा जन्म उत्तरप्रदेशमधील मथुरा येथील ओहावा येथे १२ सप्टेंबर १९७८ या दिवशी झाला. त्यांनी ६ व्या वर्षी घर सोडले. ते वृंदावन येथे गेले. पुढे तेथेच लहानाचे मोठे झाले. त्यांच्या वडिलांचे नाव राजवीर शर्मा आणि आईचे नाव अनसुईया देवी. बालपणी आईमुळे त्यांना कथा ऐकण्याची आवड निर्माण झाली. पुढे वृंदावन येथे वास्तव्य केल्यानंतर त्यांनी विवाह केला. त्यांच्या पत्नीचे नाव अंदमाता आणि मुलाचे नाव देवांश असे आहे. |