परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दूरदर्शनसंच पहाण्याने होणार्या हानीच्या संदर्भात साधकाला केलेले मार्गदर्शन आणि त्यानंतर त्याच्या जीवनात झालेले पालट !
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन
‘वर्ष २००४ मध्ये परात्पर गुरु डॉक्टर नाशिक येथे आले होते. ते एका प्रसंगी मला म्हणाले, ‘‘पहिले दूरदर्शनसंचाचा शोध लागला. तो आकाराने मोठा होता. त्यानंतर त्याहून लहान आकाराच्या व्हिडिओ कॅसेट्सचा शोध लागला. कालांतराने त्यापेक्षा लहान आकाराचे भ्रमणभाष आणि त्यानंतर मेमरी कार्ड यांच्या माध्यमातून मनोरंजनाचे कार्यक्रम पहाता येऊ लागले. सर्व वयोगटांतील लोक मनोरंजनाच्या अधीन झाले आणि ‘मनुष्यजन्माचे ध्येय ईश्वरप्राप्ती आहे’, याचे त्यांना विस्मरण झाले. पाश्चात्त्य देशांमध्ये असे नवनवीन शोध लागतात. त्यामुळे लोक मायेत आणखी गुरफटत जातात. हे सर्व देवाचे संशोधन नाही, तर अनिष्ट शक्तींची निर्मिती आहे. त्यामुळे मनुष्य मनोरंजनाच्या मायानगरीत गुंतला जाऊन ईश्वरापासून दूर जातो.’’
२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या वरील मार्गदर्शनामुळे साधकाच्या जीवनात झालेले पालट
मला दूरदर्शनसंचावरील कार्यक्रम पहाण्याची पुष्कळ आवड होती. वरील मार्गदर्शनाद्वारे सर्वज्ञानी गुरूंनी माझ्या नकळत ‘दूरदर्शनवरील मनोरंजनाचे कार्यक्रम पहाण्यात वेळ वाया न घालवता साधना करून स्वतःची आध्यात्मिक प्रगती करणे महत्त्वाचे आहे’, हे माझ्या मनावर बिंबवले. वरील मार्गदर्शनाचा परिणाम म्हणून मी घरातील दूरदर्शनसंच कायमचा बंद केला. तसे केल्याने माझ्या घरात शांतता नांदू लागली आणि माझा नामजप चांगला होऊ लागला.’
– श्री. प्रकाश शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.२.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |