जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकाचालकांचा पोलिसांकडून गौरव

१७ सहस्रांहून अधिक घायाळांचे वाचले प्राण !

नाणीज (रत्नागिरी) – मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांतील घायाळांना तत्परतेने रुग्णालयात भरती करून चोख सेवा बजावणार्‍या जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकाचालकांचा रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि रत्नागिरी पोलीस प्रशासन यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या या उपक्रमामुळे १७ सहस्रांहून अधिक घायाळांचे प्राण वाचले आहेत.

रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयात रुग्णवाहिकाचालक धनेश केतकर (हातखंबा), गुरुनाथ नागवेकर (संगमेश्वर), मुकुंद मोरे (कशेडी) आणि मंगेश रसाळ (नाणीज) यांचा सत्कार राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. अन्य चौघांना प्रशस्तीपत्रे देण्यात आली. या वेळी गायकवाड यांनी त्यांच्या भाषणात संस्थानच्या कार्याचा गौरव केला. संस्थानच्या चालकांनी महामार्गावरील अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचवले आहेत, त्याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान गेल्या १२ वर्षांपासून अपघातग्रस्तांसाठी रुग्णवाहिका सेवा देत आहे. संस्थानच्या ३७ रुग्णवाहिका असून महाराष्ट्राच्या हद्दीतील विविध महामार्गावर अविरत सेवा बजावीत आहे. संस्थानची ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे.