अतीवृष्टी अनुदान घोटाळ्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी वैजापूर तहसीलदारांना जिल्हाधिकार्यांची कारणे दाखवा नोटीस !
संभाजीनगर – अतीवृष्टीच्या अनुदान वाटपात झालेल्या घोटाळ्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकरणी जिल्हाधिकार्यांनी तहसीलदार राहुल गायकवाड यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. तसेच ‘पुढील ७ दिवसांत यावर खुलासा प्राप्त न झाल्यास आपणास काहीही म्हणावयाचे नाही’, असे गृहीत धरून आपणाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त आणि अपील) नियम १९७९ नुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी’, असे नोटिसीमध्ये सांगण्यात आले आहे. तहसीलदार यांची ही भूमिका दायित्वशून्यतेची आणि पदाला अशोभनीय आहे, असा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
वर्ष २०१९ मधील ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या काळात दोनदा अतीवृष्टी झाली होती. अतीवृष्टीमुळे शेतकर्यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याने शासनाने अनुदान घोषित केले होते, तसेच एकाच वर्षात २ मास लागोपाठ अतीवृष्टी झाल्याने एका शेतकर्याला एकदाच अनुदान देण्याचे शासनाचे निर्देश होते; परंतु तालुक्यातील डोणगाव येथे कृषी अधिकारी, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या त्रिसदस्यीय समितीने मनमानीपणे पंचनामे करून स्वतःच्या मर्जीतील काही शेतकर्यांना दोनदा अनुदान संमत केले. डोणगाव येथे ५० शेतकर्यांना चुकीच्या पद्धतीने अनुदान संमत केल्याने शासनाची हानी झाली आहे. या प्रकरणी गावातील प्रकाश डोखे यांनी अनुदान वाटपात घोटाळा झाल्याची तक्रार विभागीय आयुक्तांकडे २६ मे २०२२ या दिवशी केली होती.
अधिकचे अनुदान वाटप झाल्याचे चौकशी अहवालात निष्पन्न !
आलेल्या तक्रारीची नोंद घेत आयुक्तांनी या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकार्यांची नियुक्ती केली होती. त्यांनी ११ नोव्हेंबर २०२२ या दिवशी चौकशी करून अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार त्रिसदस्यीय समितीने ५० शेतकर्यांना अधिकचे अनुदान वाटप केल्याचे सिद्ध झाले. यातील १२ शेतकर्यांचे अनुदान रोखण्यात आले; मात्र ३८ शेतकर्यांना १ लाख ९५ सहस्र ८५६ इतके अनुदान अधिकचे वाटप झाल्याचे चौकशी अहवालात निष्पन्न झाले होते; मात्र या गोष्टींकडे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी दुर्लक्ष केले आहे, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
संपादकीय भूमिकाशेतकर्यांना दोनदा अनुदान वाटपप्रकरणी तहसीलदार गायकवाड हे दोषी असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची वरवरची कारवाई करण्यापेक्षा कठोर कारवाई करणे आवश्यक ! |