कोल्हापूर येथे निघालेल्या शोभायात्रेत पर्यावरण रक्षणासह इतिहास, भारतीय संस्कृती, अध्यात्म, आयुर्वेद यांचा जागर !
|
कोल्हापूर – २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत कणेरी मठ येथे होत असलेल्या ‘पंचमहाभूत लोकोत्सवा’च्या निमित्ताने शिवजयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीला गांधी मैदान ते पंचगंगा नदीघाट अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शोभायात्रेत विविध राज्यांतील नृत्यांसह, वारकरी संप्रदाय, लेझीम, झांजपथक, तुतारी यांच्या विविध पथकांचा सहभाग होता. पंचगंगेच्या नदीकाठावर मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचगंगेच्या आरतीने शोभायात्रेचा समारोप झाला. अत्यंत आखीव, रेखीव आणि नियोजनपूर्ण, पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देणार्या, इतिहास, अध्यात्म, भारतीय संस्कृती, आयुर्वेद यांचा जागर करणार्या शोभायात्रेने कोल्हापूरकरांचे मन जिंकले.
१. शोभायात्रेत विविध शाळांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळ, स्वराज्याचे शिलेदार शूरवीर शिवा काशीद, स्वराज्याची शपथ, ‘गड आला; पण सिंह गेला’ प्रसंग यांसह अनेक देखावे सादर केले होते. या देखाव्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपटच नागरिकांसमोर उभा राहिला. संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे, संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवणे अशा साकारण्यात आलेल्या देखाव्यांमुळे महाराष्ट्राचा समृद्ध आध्यात्मिक वारसा उलगडला.
२. ‘आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन’चे कोल्हापूर येथील शाखेचे पथक शोभायात्रेत सहभागी झाले होते. त्यांनी आयुर्वेदाचे संदेश देणारे फलक हातात धरले होते.
३. मुलींचे लेझीमपथक, झांझपथक, देहली येथील प्रजासत्ताकदिनाच्या फेरीत सहभागी असलेला महाराष्ट्राचा चित्ररथ, तुतारी पथक, पारंपरिक वाद्यांसमवेत विविध राज्यांतील वाद्यप्रकार, विविध वेशभूषेतील कलावंत यांसह शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
सनातन संस्थेच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत !
सनातन संस्थेच्या वतीने ‘पापाची तिकटी’ येथे शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी सनातन संस्थेच्या साधिकांनी प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींचे औक्षण केले, तसेच स्वामीजी अन् शोभायात्रेत सहभागी भाविकांवर पुष्पवृष्टीही केली. या प्रसंगी सनातन संस्थेच्या साधिका सौ. मेघमाला जोशी, सौ. वैष्णवी साळोखे, सौ. रूपाली बराले, सौ. मृणाल गावडे, सौ. संगिता पाटील, सौ. अनिता करमळकर, सौ. भाग्यश्री गायकवाड उपस्थित होत्या. सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या भावपूर्ण आणि चैतन्यमय स्वागताने भाविकांची मने जिंकली !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाद्वार रस्ता येथे स्वागत !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाद्वार रस्ता येथे शोभायात्रेचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी समितीचे सर्वश्री किरण दुसे, प्रथमेश गावडे, सागर हंकारे उपस्थित होते.