हिंदु जनजागृती समितीचे श्री. रामेश्वर भुकन राज्यस्तरीय ‘आदर्श संस्कृतीरक्षक’ पुरस्काराने सन्मानित !
कडा (जिल्हा बीड) येथे ‘द्वारका प्रतिष्ठान’च्या वतीने पुरस्कार वितरण !
कडा (जिल्हा बीड), १८ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील ‘द्वारका प्रतिष्ठान’ने आयोजित केलेल्या सामाजिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींना आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये हिंदु जनजागृती समितीचे नगर जिल्हा समन्वयक श्री. रामेश्वर श्रीधर भुकन यांना राज्यस्तरीय ‘आदर्श संस्कृतीरक्षक’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. हा पुरस्कार ह.भ.प. राऊत महाराज भस्मे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम कडा येथील ‘द्वारका प्रतिष्ठान’च्या मुख्य कार्यालयात १७ फेब्रुवारी या दिवशी पार पडला.
श्री. भुकन यांनी शिक्षक या पदावर असूनही राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी, तसेच पूर्णवेळ साधना करण्यासाठी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यांच्या या त्यागाचा आणि निरपेक्ष कार्याचा गौरव करण्यासाठी ‘द्वारका प्रतिष्ठान’च्या माध्यमातून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.
या वेळी ह.भ.प. राऊत दादा महाराज (पिंपळ), किसन मोर्चाचे तालुका अध्यक्ष बबन औटे, नगरसेवक राजेंद्र पवार, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष विनोद ढोबळे, विठ्ठल पडोळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ श्री गणेशाच्या आरतीने करण्यात आला, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरण तलावाचे उद्घाटनही या वेळी करण्यात आले.
पुरस्काराच्या माध्यमातून श्रीकृष्णाने ‘तू योग्य मार्गावर आहेस’, असा विश्वास दिला ! – रामेश्वर भुकन
हा पुरस्कार प्राप्त होणे ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांची कृपाच आहे. आमचे कुटुंब साधना करण्यासाठी पूर्णवेळ झाल्यानंतर अनेक लोकांनी वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला; पण आता त्यांच्या लक्षात येत आहे की, राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी कुटुंबाने घेतलेला निर्णय योग्य होता. त्या लोकांना आता साधनेचे महत्त्व लक्षात येत आहे. द्वारका प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिळालेला पुरस्कार हा साक्षात् श्रीकृष्णाने ‘तू योग्य मार्गावर आहेस’ असा विश्वास दिल्याचे जाणवले.
साधनारत असलेले श्री. रामेश्वर भुकन यांचे कुटुंबीय !• पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडे (श्री. रामेश्वर भुकन यांच्या आजी) |
‘द्वारका प्रतिष्ठान’ संस्थेचे वैशिष्ट्य !
‘द्वारका प्रतिष्ठान’च्या माध्यमातून शाळा आणि बालसंस्कार केंद्र कोणतेही अनुदान न घेता चालवले जाते. केवळ विद्यार्थ्यांनी भरलेल्या शुल्क रकमेतून शाळेचा काही व्यय भागवला जातो. ही संस्था ज्ञानदानाच्या पवित्र हेतूने प्रामाणिकपणे कार्य करते. ‘द्वारका प्रतिष्ठान’च्या माध्यमातून बालकांना दैवी आकार देण्याचे कार्य निःस्वार्थीपणे केले जात आहे.
गुरुकुल शिक्षणपद्धत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत ! – प्राध्यापक अविनाश भवर, अध्यक्ष, द्वारका प्रतिष्ठान
लॉर्ड मेकॉले यांच्या शिक्षणपद्धतीमुळे भारतियांची मोठी हानी झाली आहे. ‘द्वारका प्रतिष्ठान’च्या माध्यमातून गुरुकुल शिक्षणपद्धती निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे मत प्राध्यापक श्री. अविनाश भवर यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये मांडले.
विविध पुरस्कारांचे वितरण !
या वेळी बीड येथील धर्मादाय आयुक्त कार्यालय अधीक्षक बाबासाहेब हिराजी शेकडे यांना राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट प्रशासक’ पुरस्कार, ज्ञानेश नंदनी प्रतिष्ठान संचलित चैतन्य गोशाळा देवळालीचे संचालक गजानन कृष्णराव कुलकर्णी यांना राज्यस्तरीय ‘आदर्श गोपालक’ पुरस्कार, अमोल बाळासाहेब कर्डिले यांना जिल्हास्तरीय ‘आदर्श व्यावसायिक’ पुरस्कार, अमित आणि सुमित बाळासाहेब ढोबळे यांना जिल्हास्तरीय ‘आदर्श व्यावसायिक प्रोत्साहन’ पुरस्कार, आरंभ पोलिटिव्ह कॅन्सर केअर सेंटर येथील जनसंपर्क अधिकारी सौ. शिल्पा संजय देवडे यांना राज्यस्तरीय ‘सेवारत्न’ पुरस्कार, पुण्य नगरीचे पत्रकार रघुनाथ तुकाराम कर्डिले यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार, महेश उद्योग समूह कडायानाचे संचालक महेश कल्याण सांगळे यांना ‘आदर्श उद्योजक’ पुरस्कार देण्यात आला.