भूमीपूजन विधीचा पूजाविधीतील घटकांवर पुष्कळ सकारात्मक परिणाम होणे !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘भूमी खरेदी केल्यानंतर ‘भूमीची शुद्धी होऊन स्थानदेवतेचा आशीर्वाद मिळावा’, या उद्देशाने सर्वप्रथम भूमीचे विधीवत् पूजन करण्यात येते. या पूजेच्या वेळी पृथ्वी, वराह, कूर्म आणि शेष या देवतांचे आवाहन करून त्यांचे पूजन केले जाते. भूमीपूजन केल्यामुळे देवतेच्या आशीर्वादाने भूमीमध्ये असलेले दोष दूर होऊन तिची शुद्धी होते. हा विधी केल्याने भूमी तिच्या स्वामीला (मालकाला) अनुकूल होते.
४.५.२०२२ या दिवशी गोवा येथे एका आध्यात्मिक संस्थेच्या भूमीचे भूमीपूजन करण्यात आले. ‘भूमीपूजन विधीचा पूजेतील घटकांवर आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत भूमीपूजनाची जागा (पूजेची मांडणी केलेली जागा), भूमीवरील माती, पुरोहित आणि पूजेचे यजमान यांच्या विधीपूर्वी आणि विधीनंतर ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या.
१ अ. भूमीपूजन विधीचा भूमी, पुरोहित आणि यजमान यांच्यावर सकारात्मक परिणाम होणे : भूमीपूजन विधीनंतर ती जागा आणि भूमीवरील माती यांच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात वाढली. तसेच पुरोहित आणि यजमान यांच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकरया लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. भूमीपूजन विधीमुळे भूमीची शुद्धी होणे आणि तिची सात्त्विकता पुष्कळ वाढणे : भूमीपूजनापूर्वी भूमीपूजनाची जागा आणि भूमीवरील माती यांच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात त्रासदायक स्पंदने होती. भूमीपूजन विधीमुळे तेथे चैतन्य निर्माण होऊन भूमीतील त्रासदायक स्पंदने नाहीशी झाली आणि भूमीची सात्त्विकता पुष्कळ वाढली. यातून हिंदु धर्मात सांगितलेल्या भूमीपूजनादी विधींचे महत्त्व लक्षात येते.
२ आ. भूमीपूजन विधी भावपूर्ण केल्यामुळे पुरोहित आणि यजमान यांना आध्यात्मिक स्तरावरील लाभ होणे : या भूमीपूजन विधीचे यजमान संतपातळीचे असल्याने त्यांच्यामध्ये विधीपूर्वीही पुष्कळ सात्त्विकता असल्याचे चाचणीतून दिसून आले. यजमानांनी हा विधी अत्यंत भावपूर्ण केल्याने देवतांचे तत्त्व कार्यरत झाले. त्यामुळे विधीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चैतन्य निर्माण झाले. पुरोहित आणि यजमान यांनी विधीतील चैतन्य ग्रहण केल्याने त्यांच्याभोवती असलेले त्रासदायक स्पंदनांचे आवरण पुष्कळ अल्प होऊन त्यांची सात्त्विकता पुष्कळ वाढली.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (८.२.२०२३)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |