पंचमहाभूत लोकोत्सवात संत-महंत यांचे मार्गदर्शन लाभणार !

आज शिवजयंती आणि पंचमहाभूत लोकोत्सव यांच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा !

कोल्हापूर – २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत कणेरी मठ येथे होत असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवात महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासह अनेक संत-महंत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रमुख उपस्थितांमध्ये स्वामी त्यागवल्लभदासजी, माधवप्रिय दासजी, त्रिकमदाजी स्वामी, संपूर्णानंदजी, जगद्गुरु सुत्तुर, डॉ. भाई मनजीत सिंगजी यांचेही भाविकांना मार्गदर्शन लाभणार आहे. लोकोत्सव आणि शिवजयंती यांच्या निमित्ताने १९ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजता गांधी मैदान येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. याचा समारोप पंचगंगा घाटावर होत असून त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत.

या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य चित्ररथ, १२ ते १४ राज्यांतील कलाकारांचा पारंपरिक वाद्यांसह सहभाग, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पर्यावरणपूरक दृष्टीच्या निर्णयांची चित्ररथ मांडणी यांचा समावेश असणार आहे. सायंकाळी ६ वाजता पंचगंगा घाटावर आरती होणार आहे.

भारतीय संस्कृती, तसेच आध्यात्मिक विचारांचा वारसा जपणारा मठ म्हणून कणेरी मठ अर्थात् श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान प्रसिद्ध आहे. विज्ञान, समाजसेवा, संशोधन, प्रयोग आणि चळवळ अशा माध्यमांतून चालवले जाणारे हे संस्कार केंद्र आहे. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घातल्यास जीवनाची वाटचाल सुखी अन् प्रगतीच्या दिशेने होऊ शकते, हे सांगणारे या चळवळीतील एक नाव म्हणजे श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाचे मठाधिपती प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी होय. त्यांच्याच संकल्पनेतून ‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवा’त २३ फेब्रुवारीला देशभरातील साधू-संतांना एकत्रित आणण्यात येत आहे.