उद्धव ठाकरे यांचे चिन्ह गेल्याचा फारसा परिणाम होणार नाही ! – शरद पवार
बारामती (जिल्हा पुणे) – निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्याकडून ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह काढून घेतल्याचा फारसा परिणाम होणार नाही. नवीन चिन्ह घेऊन त्यांना लोकांसमोर जावे लागेल आणि लोकही त्यांचे नवे चिन्ह मान्य करतील. हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला असल्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, असे वक्तव्य ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पवार पुढे म्हणाले की, यापूर्वी काँग्रेसलाही ‘गाय वासरू’ हे चिन्ह गमवावे लागले होते. हे चिन्ह गेल्यानंतर त्यांनी ‘हाताचा पंजा’ हे चिन्ह स्वीकारले आणि नंतरच्या काळात लोकांनी ते चिन्ह मान्य केले आहे. या निर्णयाची काही दिवस चर्चा होईल आणि नंतर लोक विसरून जातील अन् नवीन चिन्ह मान्य करतील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.