छत्रपती शिवाजी महाराज ‘धर्मनिरपेक्ष’ नव्हे, तर ‘हिंदवी स्वराज्य संस्थापक’ !
आज १९ फेब्रुवारी २०२३ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (दिनांकानुसार) आहे. त्या निमित्ताने…
छत्रपती शिवाजी महाराजांना सध्याचे निधर्मीवादी म्हणवणारे त्यांच्याविषयी खोटा इतिहास पसरवण्यात अग्रणी आहेत. त्यांच्याकडून छत्रपती शिवरायांना ‘हिंदवी स्वराज्य संस्थापक’ न म्हणता ‘निधर्मीवादी’ म्हटले जाणे, ‘शिवसाम्राज्य ‘धर्मनिरपेक्ष’ होते’, ‘त्यांच्या सैन्यात मुसलमान सैनिक सर्वाधिक होते’, असा अपप्रचार केला जातो. वास्तवात छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘हिंदवी स्वराज्य’च स्थापन केले होते. याचा सडेतोड प्रतिवाद करणारा लेख येथे देत आहोत.
१. हिंदु साम्राज्य स्थापन करणेेे, हाच छत्रपती शिवाजी महाराजांंचा मुख्य उद्देश !
‘छत्रपती शिवाजी महाराजांंच्या साम्राज्याचा मूळ उद्देश काय होता ? याविषयी नेहरूप्रणित इतिहासकारांनी राजकारणाची आवश्यकता म्हणून प्रचंड संभ्रम निर्माण केला आहे आणि असाच संभ्रमित इतिहास जनतेसमोर मांडला जात आहे. इतिहासाची मूळ साधने पडताळल्यावर विशुद्ध हिंदु साम्राज्य स्थापन करणे एवढाच छत्रपती शिवरायांचा मुख्य उद्देश होता. अतीखोलात न जाता सहज उपलब्ध असणार्या इतिहासातील काही निर्विवाद पुराव्यांचे आकलन केल्यावर ही गोष्ट अधिक स्पष्ट होते. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांना दक्षिण दिग्विजय मोहिमेप्रसंगी एक पत्र लिहिले होते. त्या पत्रातून छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा मूळ उद्देश लक्षात येतो. व्यंकोजी राजे भोसले यांनी त्यांच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान सैनिक भरती केले होते. या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज व्यंकोजी राजेंना विचारणा करतात, ‘तुझ्या सैन्यामध्ये एवढे मोठे तुर्क (तत्कालीन मुसलमानांसाठी वापरलेला शब्द) सैनिक असतांना तुला विजय कसा काय मिळू शकेल ?’ यावरून स्वाभाविकपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान सैनिक असल्याचे संभवत नाही.
दक्षिण दिग्विजय मोहिमेत आक्रमकांनी षोनाचलपती मंदिराचे (चेन्नई) रूपांतर मशिदीत केले होते. त्या ठिकाणी परत षोनाचलपतींची स्थापना करून परत मशिदीचे रूपांतर मंदिरामध्ये करण्यात आले. दक्षिण स्वारीमध्ये शाहिस्तेखानाला छत्रपती शिवाजी महाराजांचे तळकोकणातील साम्राज्य उद़्ध्वस्त करायचे होते. यासाठी त्याने उजबेत सरदार करतलब खान आणि माहुरची राणी यांना चाकणहून रवाना केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना उंब्रजच्या खिंडीत गाठले आणि कोकणात उतरण्यापूर्वीच त्यांचा धुव्वा उडवला. विनाश डोळ्यांसमोर दिसताच माहुरच्या राणीने धर्मबहीण म्हणून क्षमा मागितली. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘हा करतलब खान आमचा कोण ?’, असे स्पष्ट विचारले. तसेच अफझलखानाला साहाय्य करण्यासाठी आदिलशहाने कान्होजी जेधे यांना पाठवलेल्या आदेशामध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयामुळे मुसलमानांचा विस्तार खुंटला आहे’, असा स्पष्ट उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या मूळ हेतूविषयी केलेले आकलन हेही ‘म्लेंच्छक्षयदीक्षित’ (मुसलमानांचा सर्वनाश करण्याची दीक्षा घेतलेले), असेच केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्य स्थापनेविषयी स्वत: छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या आकलनाहून अधिक पुरावा काय असू शकतो. ‘म्लेंच्छ’ हा शब्द आक्रमणकर्त्या मुसलमानांसाठी वापरला गेलेला आहे. एकूणच हा पुरावा अतिशय भक्कम असून याहून अधिक पुराव्याची अपेक्षा ठेवणे, म्हणजे वास्तवापासून जाणीवपूर्वक दूर जाणे होय. निष्पक्षपणे विचार केल्यास ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदु साम्राज्य स्थापन करणे’, हाच मूळ हेतू असल्याचे स्पष्ट होते.
२. हेन्री रेविंग्टन याने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘हिंदु किंग’ असा करणे
हेन्री रेविंग्टन याने पन्हाळा मोहिमेच्या वेळी सिद्धी जोहरला लांब पल्ल्याच्या तोफा आणि दारूगोळा पुरवला होता. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहिलेल्या पत्रात महाराजांचा उल्लेख ‘हिंदु किंग’ असाच केला आहे. तसेच उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे आकलन ‘एक हिंदु राजा’ असेच होते. फ्रायर नावाचा एक ब्रिटीश डॉक्टर हा भारतात काही काळ वास्तव्यास होता. त्याने ‘मराठा साम्राज्यामध्ये ठाणे शहराच्या आसपास असलेल्या मशिदींचा वापर धान्याची कोठारे म्हणून करण्यात येत होता’, असे स्पष्ट केलेे आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ हेतूविषयी शंका उरत नाही.
३. छत्रपती शिवाजी महाराजांना ‘निधर्मी’ सिद्ध करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न
‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान होते’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी मशिदींना इनाम (बक्षीस) दिले’, तसेच ‘शिवसाम्राज्य हे आजच्या भाषेत ‘धर्मनिरपेक्ष’ राज्य होते’, असे विविध खोटे दावे केले जातात. वरील सर्व दाव्यांविषयी इतिहासात पुरावे नसल्याचे इतिहासकार श्री. गजानन भास्कर मेहंदळे यांनी स्पष्ट केले आहे. श्री. मेहंदळे यांनी इतिहासाच्या साधनांचा जवळपास ५० वर्षांपासून सर्वांगाने विचार केला आणि त्यातून ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत रायगडावर कोणतीही मशीद बांधलेली नाही’, हे सिद्ध केले. एवढेच नाही, तर त्यांनी त्यांच्या सैन्यात कोणत्याही मुसलमान अधिकार्याची नेमणूक केल्याचीही कोणत्याही पत्रामध्ये किंवा इतिहासात नोंद नाही. इतिहासकार श्री. मेहंदळे यांचे लिखाण यापूर्वीच प्रकाशित झाले आहे. श्री. मेहंदळे यांनी ‘त्यांचे म्हणणे पुराव्यानिशी खोडून दाखवावे’, असे उघड आव्हान दिले होते. आजपर्यंत कुणीही त्यांच्याशी चर्चा केली नाही, तसेच त्यांचे निष्कर्षही खोडून काढलेले नाहीत. त्यामुळे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य ‘धर्मनिरपेक्ष’ होते’, या म्हणण्यातील फोलपणा लक्षात येतो.
यावरून ‘इतिहासाचा अभ्यास न करता केवळ राजकारणाची आवश्यकता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ‘निधर्मी’ ठरवण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत’, अशी दाट शंका निर्माण होते. त्यामुळे जनतेने इतिहासाची मूळ साधने पडताळून विचारपूर्वक निष्कर्ष काढणे आवश्यक आहे.
४. छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला उदय ‘एक युगप्रवर्तक’ अध्याय !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी जनतेने कुठलाही संभ्रम ठेवू नये. त्यांनी रायरेश्वर महादेवाच्या समक्ष शपथ घेतली होती. त्यांनी अथक परिश्रम करून आणि प्रसंगी जिवावर उदार होऊन हिंदवी साम्राज्य उभे केले होते. वाचकांनी भारतीय इतिहासाचाही अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या जन्मापूर्वीच, म्हणजे वर्ष १६१५ मध्ये मेवाड-मोगल सामंजस्य करार झाला होता. त्यामुळे मोगलांना भारतात विरोध करणारी कोणतीही राजकीय सत्ता उरली नव्हती. त्यापूर्वी अकबराने विविध राजपूत राजांचा विरोध संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मेवाडच्या राजांनी संघर्ष चालूच ठेवला होता. परकीय आक्रमकांना चोख प्रत्युत्तर देण्याचे प्रयत्न केवळ महाराणा प्रताप यांच्या रूपाने चालू राहिले. दीर्घकाळ सैनिकी हालचाली, प्रतिकूल आर्थिक परिस्थिती आणि भीषण मनुष्यहानी यांमुळे आस्तित्वासाठी वर्ष १६१५ मध्ये मेवाड राज्याला मोगलांशी करार करणे भाग पडले. तसेच परकीय आक्रमकांना विरोध करणारी भारतीय शक्तीही थंडावली. तेव्हा मोगलांना भारत मोकळा मिळाला कि काय ? असे वाटत असतांनाच छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय ‘एक युगप्रवर्तक’ अध्याय ठरला. त्यामुळे मोगलांना विरोध करण्यासाठी पुन्हा एका भारतीय शक्तीचा उदय होऊन मोगलांचे भारत पादाक्रांत करण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.
५. मराठा इतिहासाला कलाटणी देणारे महत्त्वपूर्ण साल्हेरचे युद्ध !
छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले साल्हेरचे युद्ध हे संपूर्ण इतिहासाला कलाटणी देणारे समजले पाहिजे. तेव्हा ‘छत्रपती शिवाजी महाराज हे मोगलांशी समोरासमोर नाही, तर डोंगर-दर्यांच्या आश्रयाने युद्ध करतात’, अशी धारणा होती. ही धारणा साल्हेर युद्धाने संपूर्णपणे फोल ठरवण्यात आली. मोगलांकडून समोरासमोरच्या युद्धासाठी प्रयत्न केले जात होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष युद्धाला समोर यावे, यासाठी आदिलशहाने मंदिरांचा विध्वंस, लूट आणि बलात्कार यांचे सत्र आरंभले होते. साल्हेर युद्धात समोरासमोर लढाई झाली आणि बलाढ्य मोगल सैन्याचा पराभव झाला. साल्हेर युद्धापासूनच मराठ्यांची समोरासमोरील युद्धातील क्षमता लक्षात आली. त्यानंतर मराठे हे शक्तीसंपन्न मोगल साम्राज्याच्या प्रदेशामध्ये रायगडपासून विदर्भातील कारंजा आणि मोगलांची दक्षिणेतील उपराजधानी संभाजीनगरपासून जवळ असलेल्या जालनापर्यंत अनिर्बंधपणे लूट करत असत.
मराठ्यांनी विदर्भातील सर्वांत मोठी सोन्याची बाजारपेठ तथा मोगलकालीन समृद्ध शहर कारंजाही लुटून फस्त केले होते. साल्हेर युद्धानंतर मराठ्यांवर निर्बंध घालण्याइतपत मोगल राजवट सक्षम नव्हती. या युद्धानंतर मराठे मोगलांना कधीच जुमानत नसत. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासामधील साल्हेरचे युद्ध हे अतिशय महत्त्वपूर्ण समजले पाहिजे. इतिहासात साल्हेर युद्धापूर्वी आणि त्या युद्धानंतर मराठ्यांच्या सैनिकी हालचालींची तुलना करणारे
विस्तृत विवेचन झाल्याचे फारसे वाचनात येत नाही. मराठ्यांच्या या सैनिकी हालचालीचा परिणाम पुढे दीर्घकाळ दिसून येतो. वर्ष १७०७ नंतर मराठे देशभरात सर्वत्र अनिर्बंध संचार करू लागले. त्यासाठी कदाचित साल्हेर युद्धातील महत्त्वपूर्ण विजयच कारणीभूत ठरला असावा. त्यामुळे साल्हेर युद्धाचा एकूण मराठा इतिहासावर झालेल्या दीर्घकालीन परिणामावर अधिक चांगल्या ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे विवेचन होणे आवश्यक आहे.’
– अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्कृती अभ्यासक तथा लेखक, परभणी. (१५.२.२०२३)