लोकांना रोग आणि रोगांवरील औषधे यांमधून मुक्ती देण्यासाठी योग शिबिराचे आयोजन ! – योगऋषी रामदेवबाबा
योगऋषी रामदेवबाबा यांचे पणजी येथील पत्रकार परिषदेत सनातन जीवन शैली अंगीकारण्याचे आवाहन !
पणजी, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – सनातन धर्म हा सर्वसमावेशक आहे आणि यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. भारतियांच्या ‘डी.एन्.ए.’मध्ये (गुणसूत्रांमध्ये) रोग नव्हे, तर योग आहे. नागरिकांना सनातन जीवन शैली अंगीकारण्यास शिकवून त्यांना रक्तदाब, मधुमेह, ‘थायरॉईड’ आदी रोगांपासून आणि रोगांवरील औषधांपासून मुक्त करण्यासाठी गोव्यात १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. योग शिबिराच्या निमित्ताने योगऋषी रामदेवबाबा यांचे १७ फेब्रुवारी या दिवशी गोव्यात आगमन झाले. या पत्रकार परिषदेला ‘भारत स्वाभिमान’चे गोवा प्रभारी श्री. कमलेश बांदेकर आणि अन्य पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
योगऋषी रामदेवबाबा पुढे म्हणाले, ‘‘चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका यांच्या माध्यमातून समाजामध्ये अश्लीलता पसरवली जात आहे आणि याला युवावर्ग बळी पडत आहे. या पार्श्वभूमीवर १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत मिरामार येथे प्रसिद्ध कलाकार कैलास खैर यांच्या ‘सनातन संगीत’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.’’
(सौजन्य : MEDIAFIRE GOA)
२० फेब्रुवारीला शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी विशेष शिबिर
२० फेब्रुवारी या दिवशी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५ सहस्र शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांना ‘भारतीय शिक्षा बोर्ड’ आणि अध्यात्मावर आधारित शिक्षण पद्धतीशी जोडणे या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मनुष्य हा केवळ सामाजिक प्राणी नव्हे, तर तो देवाचे प्रतिनिधित्व करणारे एक माध्यम आहे. याद्वारे मुलांमध्ये शौर्य, तसेच आईवडील, पूर्वज आणि राष्ट्र यांच्याविषयी अभिमान अन् स्वाभिमान जागृत करून आत्मबळ निर्माण केले जाणार आहे. विद्यार्थ्यांची राष्ट्र आणि अध्यात्म यांची मुळे घट्ट केली जाणार आहेत.
गोवा राज्यात ‘पतंजलि वेलनेस’चे दक्षिण भारतातील सर्वांत मोठे केंद्र बनावे, अशी इच्छा !
गोवा राज्यात ‘पतंजलि वेलनेस’चे दक्षिण भारतातील सर्वांत मोठे केंद्र बनावे, अशी इच्छा आहे. याद्वारे शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, वैचारिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत, असे योगऋषी रामदेवबाबा यांनी एका प्रश्नावर उत्तर देतांना म्हटले.
लोकांना रोग आणि नशा यांपासून मुक्त करणे, हे मुख्य ध्येय !
गोव्यात अमली पदार्थाचे सेवन अधिक प्रमाणात होत असल्याविषयी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देतांना ते म्हणाले, ‘‘लोकांना रोगमुक्त करण्याबरोबरच त्यांना नशेपासून मुक्ती देणे, हे आमचे मुख्य ध्येय आहे.’’