फलकांवरील माहिती पडताळणीनंतरच अनुमती देण्यात येणार ! – अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त
नाशिक येथे शिवजयंतीच्या निमित्ताने सार्वजनिक मंडळा ची बैठक !
नाशिक – शहरातील सार्वजनिक मंडळानी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नियमांचे पालन करून साजरी करावी. मंडळाच्या वतीने उभारण्यात येणार्या शिवजयंतीच्या फलकांवरील माहितीची पडताळणी केल्यानंतरच अनुमती दिली जाईल, असे स्पष्ट मत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी येथे व्यक्त केले. प्रत्येक मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि स्वयंसेवक नियुक्त करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. १९ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या शिवजयंती उत्सवाच्या पार्ष्वभूमीवर पोलीस मुख्यालयात पोलीस, महापालिकेसह प्रशासनाच्या विविध विभागांसह शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी आणि सदस्य यांची बैठक पार पडली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी मंडळांच्या पदाधिकार्यांनी शिवजयंतीच्या दिवशी ‘ड्राय डे’ घोषित करावा, तसेच मांस आणि मच्छी विक्रीवर बंदी घालावी. मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवावे. जादा पोलीस कर्मचारी तैनात करण्यासमवेत वाहतुकीचे नियोजन करण्याची मागणी केली. महापालिका क्षेत्रात १९४ मंडळांनी शिवजयंतीसाठी अनुमतीचे अर्ज केल्याचे महापालिकेच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी स्पष्ट केले.