वाहनफेरीने दापोली शहरात दुमदुमला हिंदुत्वाचा हुंकार !
दापोली येथे २१ फेब्रुवारी या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
दापोली, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदूंवर होत असलेले आघात आणि होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी एक मात्र उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना हाच होय. हिंदु राष्ट्र स्थापनेची दिशा समजून घेण्यासाठी २१ फेब्रुवारी या दिवशी येथील आझाद मैदानात सायंकाळी ५ वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभेला मोठ्या संख्येने हिंदूनी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश शिंदे यांनी केले.
दापोलीची ग्रामदेवता श्री काळकाईदेवी मंदिरात पंचायत समिती सदस्य श्री. रोशन मंडपे यांनी धर्मध्वजाचे पूजन करून फेरीचा आरंभ झाला. मंदिराचे अध्यक्ष श्री. प्रभाकर चोरगे यांनी देवीला पुष्पहार अर्पण केला, तर सुहासिनींनी ओटी भरली. धर्मध्वजाला पुष्पहार आंजर्ले गावचे श्री. वैभव आरेकर यांनी अर्पण केला.
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झालेली ही फेरी एस्.टी. स्टँड, मच्छीमार्केट, गाडीतळ पोलीस ठाण्यासमोरून केळसकर नाका, गोखले नाका, बुरोंडी नाका, नगरपंचायत, शिवाजीनगर,जालगाव ग्रामपंचायत, इच्छापूर्ती गणेशमंदिर, उदयनगर, श्रीकृष्ण मंदिर, वडाचा कोंड या मार्गाने येऊन केळसकर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सांगता झाली.
या फेरीचे शहरात ठिकठिकाणी हिंदुत्वनिष्ठांनी आरती ओवाळून, तसेच धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण करून केले स्वागत !
फेरीच्या मार्गावर शिवसेनेच्या (शिंदे गट) नगरसेविका कु. शिवानी खानविलकर यांनी, जालगाव कुंभारवाडी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. मंजुषा जालगावकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. शोभा दांडेकर, आनंदनगर महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुमित्रा गावडे, भाजपच्या नगरसेविका सौ. जया साळवी, सौ. श्रद्धा गायकवाड यांनी धर्मध्वजाचे पूजन आणि औक्षण केले. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सचीन गायकवाड, जय भवानी मित्रमंडळाचे श्री. अजय शिंदे, मानाचा गणपतीचे अध्यक्ष श्री. संजय घाडगे यांनी धर्मध्वजाचे पूजन आणि स्वागत केले. फाटक दुकानाजवळ हिंदु राज मित्रमंडळाच्या वतीने धर्मध्वजाला पुष्पहार घालून फेरीचे स्वागत केले, तर शेवटी हिंदु राज मित्रमंडळाचे श्री. मयूर मोहिते, श्री. रोहन केळसकर आणि स्वप्नील राळे यांनी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.