‘संगीताला प्राणी कशा प्रकारे प्रतिसाद देतात ?’ याविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने कर्नाटक येथील प.पू. देवबाबा यांच्या आश्रमात केलेले संशोधन !
‘संगीताला प्राणी कशा प्रकारे प्रतिसाद देतात ?’ याविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनाच्या वेळी किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांच्या आश्रमातील देशी गायी आणि बैल यांनी दिलेला प्रतिसाद !
१७.१२.२०१८ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने प.पू. देवबाबा यांच्या किन्नीगोळी (कर्नाटक) येथील ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’तील ‘भारतीय (देशी) गाय आणि बैल यांच्यावर शास्त्रीय गायनाचा कोणता परिणाम होतो ?’, याचा अभ्यास करण्यात आला. त्या वेळी ठाणे येथील शास्त्रीय गायक श्री. प्रदीप चिटणीस (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५९ वर्षे) यांनी ‘शंकरा’ रागातील शिवावर आधारित धृपदाचे अत्यंत भावपूर्ण गायन केले. श्री. चिटणीस आणि तिथे उपस्थित असलेले साधक यांना तेथील गायी आणि ‘मुरली’ नावाचा बैल यांच्याविषयी लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. श्री. प्रदीप चिटणीस (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी ‘शंकरा’ रागातील शिवावरील धृपदाचे गायन चालू केल्यावर जाणवलेली सूत्रे
१ अ. सर्व गायींनी माना डोलावणे आणि ‘मुरली’ नावाच्या बैलाने जोरात मान डोलवून प्रतिसाद दिल्याने ‘तो गायनाशी जुगलबंदीच करत आहे’, असे वाटणे : ‘या प्रयोगाच्या वेळी मला ‘शंकरा’ रागात धृपद (शास्त्रीय गायनातील एक प्रकार) गायन करावे’, असे वाटले. धृपदात आरंभी नोम-तोम (‘नोम-तोम’ असे शब्द वापरून रागाचा केलेला स्वरविस्तार) आलापी चालू करताच सर्व गायींनी चांगला प्रतिसाद द्यायला आरंभ केला. सर्व गायी माझ्याकडे पाहून मान डोलवत होत्या. ५ – ६ गायींनी गोमूत्राचे, तर १ – २ गायींनी गोमयाचे (शेणाचे) एकाच वेळी उत्सर्जन केले. ‘मुरली’ नावाचा बैल गायन ऐकण्यात अतिशय दंग झाला होता. तो जोरजोरात मान डोलवत होता. ‘जणू तो माझ्या गायनाशी जुगलबंदीच करत आहे’, असे मला वाटले.’ – श्री. प्रदीप चिटणीस (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), ठाणे, महाराष्ट्र.
१ आ. श्री. प्रदीप चिटणीस यांचे गायन ऐकतांना गोठ्यातील सर्व गायी उठून उभ्या रहाणे, ‘गौरी’ नावाच्या गायीने त्यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणे, तिच्या डोळ्यांतील पाणी पाहून ‘गायन ऐकून तिची भावजागृती झाली आहे’, असे जाणवणे : ‘गायन चालू असतांना चिटणीसकाकांच्या मागच्या बाजूला असलेल्या गोठ्यातील सर्व गायी उठून उभ्या राहिल्या आणि त्यांच्या दिशेने पाहू लागल्या. रागाचा स्वरविस्तार ऐकतांना दुसर्या बाजूला असलेली ‘गौरी’ नावाची गाय काकांच्या दिशेने वळली आणि गोठ्यातून बाहेर काकांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू लागली. तिला बांधले असल्यामुळे ती पुढे जाऊ शकली नाही. गायन ऐकतांना ‘गौरी’च्या डोळ्यांतून पाणी येत होते. तिची ती भावावस्था पाहून माझीही भावजागृती झाली. गायन ऐकतांना काही क्षण मला ‘नृत्य करावे’, असे वाटले.’ – होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी (‘या गायीचे नाव ‘गौरी’ आहे. त्यामुळे ‘शंकरा’ रागातून प्रक्षेपित होणार्या शिवतत्त्वाकडे ती अधिक आकर्षली गेली’, असे मला वाटले.’ – तेजल)
१ इ. श्री. चिटणीस यांंनी ‘शंकरा’ रागाच्या आरंभी ‘ॐ’ कार म्हणताक्षणी डोळे बंद करून बसलेल्या गायीने श्री. चिटणीस यांंच्या दिशेने वळून पहाणे : ‘एक गाय बसलेल्या स्थितीत मान खाली करून आणि डोळे बंद करून कान हालवत होती. ‘शंकरा’ रागाच्या आरंभी चिटणीसकाकांनी केवळ ‘ॐ’ कार म्हटल्यावरच त्या गायीने अकस्मात् काकांच्या दिशेने वळून पाहिले. हे फारच वैशिष्ट्यपूर्ण वाटले. ‘त्या गायीला ‘शंकरा’ रागातील शिवाची स्पंदने आधीच जाणवली’, असे मला वाटले. काही गायींनी धृपद म्हटल्यावर अधिक प्रतिसाद दिला. ‘त्या गायी शिवतत्त्वाशी संबंधित आहेत’, असे मला वाटले.
१ ई. ‘मुरली’ नावाच्या बैलाचा प्रतिसाद रागाच्या प्रकृतीप्रमाणेच आहे’, असे जाणवणे : ‘मुरली’ नावाचा बैल हंबरण्यासह जोरजोरात मान हालवून प्रतिसाद देत होता. ‘शंकरा’ हा शिवतत्त्वाशी संबंधित आणि वीररसप्रधान राग आहे. त्यामुळे ‘मुरलीचा प्रतिसाद त्या रागाच्या प्रकृतीप्रमाणेच आहे’, असे मला जाणवले.
१ उ. निष्कर्ष : केवळ मनुष्यच संगीतप्रिय नाही; तर संगीताला प्राणीही किती आनंदाने प्रतिसाद देतात, हे आम्हाला या प्रयोगातून प्रत्यक्ष अनुभवता आले.’
– कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.२.२०२३)