अखिल विश्व व्यापून टाकणारे शिव माहात्म्य !
शनिवार, १८ फेब्रुवारी २०२३ म्हणजेच मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी या तिथीला ‘महाशिवरात्र’ आहे. त्यानिमित्त भगवान शिवाच्या चरणी भावपूर्ण प्रणाम !
सर्वसामान्यपणे अनेकांच्या मनात महाशिवरात्रीचे व्रत का आणि कशासाठी करायचे ? असा प्रश्न नेहमीच उपस्थित होत असतो. या प्रश्नाचे उत्तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला देऊन ठेवले आहे. ते असे…
माघ कृष्ण त्रयोदशी या दिवशी महाशिवरात्रीचे व्रत करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. ही व्रताची परंपरा स्वतःला शिव बनण्याची प्रेरणा देते. म्हणूनच हा दिवस पवित्र आणि शुद्ध मानला जातो. महाशिवरात्र हा दिवस संपूर्ण मानवाला शिवत्वाचा संदेश देत असते. ‘सदैव जागृत रहा’, असे सांगणारी ही महाशिवरात्र आहे. तसे बघायला गेले, तर आपण प्रतिदिन शुभ गोष्टींचे चिंतन करायचे आहे; पण आपल्याला आजच्या दिवसाचे महत्त्व, माहात्म्य ठाऊक नसले, तर आजच्या शुभ दिवसापासून अखंड शुभचिंतन करण्याची सवय आपणच आपल्याला लावायची आहे. हेच महाशिवरात्रीचे व्रत आहे.
१. महाशिवरात्रीचे व्रत स्वतःच्या उन्नतीसाठी
आपल्या मनात अनेक बरे-वाईट विचार येतात. कधी कधी तर आपल्या वैर्याच्या मनातही जे विचार येणार नाहीत, असे विचार आपल्या मनात येतात. म्हणूनच शुभचिंतन याचाच अर्थ आजच्या परिभाषेत सांगायचे, तर सकारात्मक विचाराची सवय आपण आपल्याला लावून घ्यायची आहे. तसे शिक्षण जाणीवपूर्वक आपणच आपल्या मनाला द्यायचे आहे. मन हे नेहमीच श्रेष्ठ अशा विचारांकडे नेण्यासाठी स्वतःला पराकाष्ठेचा प्रयत्न करावा लागणार आहे. महाशिवरात्रीचे व्रत हे आपणच स्वतःची उन्नती करून घेण्यासाठी आचारायचे आहे.
शिव याचा अर्थ ‘कल्याणकारी’ आणि ‘उपकारक’ असा आहे. माणसाने ‘संपूर्ण जीवसृष्टीचे कल्याण व्हावे’, असा संकल्प करून शिवाची उपासना करायची. यालाच ‘शिवो भूत्वा शिवं यजेत् ।’ म्हणजे ‘स्वत: शिव होऊन शिवाची उपासना करावी’, असे म्हणतात.
२. भगवान महादेव आणि विष्णु यांचा एकमेकांशी संबंध
आपण भगवान शंकर यांना महादेव म्हणतो. तोच शिव आहे. शिव म्हणजे कल्याणकारी. शिव ही ज्ञानाची देवता आहे. ‘आपण प्राप्त केलेले ज्ञान हे संपूर्ण जीवसृष्टीच्या कल्याणासाठीच उपयोगात आणायचे’, असा संदेश भगवान महादेव आपल्याला देतात. याचाच अर्थ महादेवाकडे ज्ञानाची दृष्टी आहे. केवळ ज्ञानाची दृष्टी ही परिपूर्ण नाही. ज्ञानाच्या दृष्टीला प्रेमाची जोड असली पाहिजे. ‘सृष्टी ही उपभोगाची वस्तू नाही, तर ती आपल्या सर्वांची माता आहे’, याची जाणीव त्यामुळे निर्माण होते.
निसर्गामध्ये निर्माण झालेल्या वस्तू मानवाला अत्यंत उपयुक्त असतात. मानवाला ज्ञान प्राप्त झाले की, उपयुक्त वस्तू अधिकाधिक उपयोगात आणण्याचा हव्यास वाढतो. त्यामुळे प्राप्त झालेल्या ज्ञानाने माणूस सृष्टीला ओरबाडायला लागतो. माणसाची ही वृत्ती घातक आहे. म्हणून आपल्या संस्कृतीने सृष्टीकडे ‘माता’ म्हणून पहाण्याची शिकवण दिली. हा भाग आपण भगवान महादेव आणि विष्णु यांच्या परस्पर संबंधातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
२ अ. ज्ञानाला प्रेमाची दृष्टी मिळाल्यास परिपूर्णता येणे : महादेवांकडे ज्ञान, तर विष्णु ही प्रेम आणि वैभव यांची देवता आहे. हे दोन्हीही देव आपल्याला भिन्न वाटत असले, तरी ते परस्परांपासून भिन्न नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. महादेवांच्या ज्ञानाला विष्णूंची प्रेमाची दृष्टी प्राप्त झाली की, परिपूर्णता येते. प्रेमावाचून प्राप्त केलेले ज्ञान जीवनाला आणि जगाला आनंद देऊ शकत नाही.
२ आ. विरक्ती आणि वैराग्य प्राप्तीसाठी शिवतत्त्व आवश्यक : ज्ञान विश्लेषणाचा आग्रह धरते, तर प्रेमाचा कल समन्वयाकडे झुकणारा आहे. ज्ञान आणि प्रेम यांचा संयोग झाला की, त्यातून सौंदर्य प्रकट होते. महादेव आणि विष्णु यांचा ऐक्यभाव आपल्याला ज्ञान, वैभव, प्रेम आणि सौंदर्य प्रदान करतो. या चारही गोष्टी प्राप्त झाल्या, तरीसुद्धा माणूस विरक्त आणि विरागी अवस्थेत आनंदाने जगू शकतो; कारण महादेव कल्याण करणारे ज्ञानी असून विरक्त अन् विरागी आहेत. विष्णूंची उपासना करून वैभव प्राप्त झाल्यानंतर आपल्या विरक्ती आणि वैराग्य प्राप्त करण्यासाठी शिवतत्त्वच उपयुक्त ठरते. अशा प्रकारे महादेव आणि विष्णु या दोघांची उपासना आपल्याला ज्ञान, प्रेम, वैभव आणि सौंदर्य प्रदान करते. म्हणून या दोन्ही देवतांना परस्परांपासून आपल्याला भिन्न मानता येणार नाही.
३. महाशिवरात्रीचे व्रत करण्यामागील कारण
शिवाच्या मस्तकातून जी गंगा वहाते ती ज्ञानाची गंगा आहे. महाशिवरात्रीचे व्रत शुभचिंतनासाठी जसे करायचे, तसेच ज्ञानासक्त होण्यासाठीही करायचे आहे. शिवाची उपासना करणारा ज्ञानासक्त असला पाहिजे, ही अट आहे. अशी अट घालण्यामागे फार मोठा विचार दडलेला आहे. मानवाचे जीवन साधे सरळ नाही. मानवाच्या जीवनात अनंत अडचणी आणि संकटे येतात, दुःखांचे डोंगर कोसळतात. अशा परिस्थितीत त्याचे मन सैरभैर होते. बुद्धी असूनही ती गोठून जाते. काय करावे ? ते त्याला कळत नाही. हताश आणि दुर्बल झालेले मन आत्मघात करून घेते. या दुष्टचक्रातून वाचण्यासाठीच महाशिवरात्रीचे व्रत करायचे आहे. या व्रतामागचा खरा हेतू आपण जाणून घेऊया.
४. महाशिवरात्रीचे व्रत करण्याचा खरा हेतू
शिवाच्या जटेतून गंगा जशी उसळी मारून बाहेर येते, त्याप्रमाणे ज्ञानी माणसाच्या विशुद्ध बुद्धीत कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याचा आणि ध्येय गाठण्याचा आत्मविश्वास संपादन व्हावा म्हणून शिवाची उपासना करायची आहे.
ज्ञान हे अत्यंत तेजस्वी असते. भगवान श्रीकृष्ण गीतेत सांगतात, ‘‘ज्ञानरूप अग्नीमुळे सर्व कर्मे जळून जातात.’’ याचा अर्थ असा की, वासना आणि कामना असे अनेक विकार माणसावर आक्रमण करतात. या विकारांना जाळणे वा नष्ट करणे यांसाठी माणूस ज्ञानासक्त असला पाहिजे. वासनासक्त आणि कामासक्त होऊन कोणतीही उपासना करता येत नाही. वासनासक्त, कामासक्त होऊन केलेली उपासना ज्ञान, प्रेम, वैभव आणि सौंदर्य प्राप्त करून देत नाही. हे सर्व लक्षात घेऊन आपल्याला महाशिवरात्रीचे व्रत करायचे आहे.
५. खरा ज्ञानी कोण ?
भगवान महादेवाने समुद्र मंथनातून जे विष बाहेर आले ते प्राशन केले. प्राशन केलेले विष त्यांनी मस्तकात आणि हृदयातही म्हणजेच अंतःकरणात जाऊ दिले नाही. ते त्यांनी आपल्या कंठातच ठेवले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला म्हणून त्यांना ‘नीलकंठ’ म्हटले जाते. याचा अर्थ आपण आपल्या बुद्धीत आणि अंतःकरणात हानीकारक असलेले विषारी विचार जाऊ द्यायचे नाहीत. असे विषारी विचार संपूर्ण मानवी समाजाला नष्ट करून टाकतात. अशा प्रकारे जो आपल्या बुद्धीत आणि अंतःकरणात अयोग्य अन् घातक विचारांना आणि विकारांना थारा देत नाही, त्यालाच ‘ज्ञानी’ म्हटले जाते. तोच खरा ज्ञानी आहे.
६. महादेव आणि विभूती यांचा सांकेतिक अर्थ
महादेव विरक्त आणि विरागी आहेत. त्यांच्या अंगाला त्यांनी विभूती फासली आहे. शिवाची उपासना करणारा उपासक हा ज्ञानासक्त, विरक्त, विरागी सुद्धा असला पाहिजे. याचा अर्थ त्याने वैभवाला तुच्छ मानले पाहिजे, असा होत नाही. प्राप्त झालेल्या वैभवावर आसक्ती ठेवायची नाही. विरक्ती आणि वैराग्य हेसुद्धा वैभवच आहे, हे सांगण्यासाठीच विभूतीला स्वीकारायचे आहे.
७. गळ्यात कवट्यांची माळ असण्यामागील अर्थ
अशा प्रकारे ज्ञान संपादन करून त्या ज्ञानाला प्रेमाची जोड द्यायची आणि कल्याणकारी गोष्टींचे चिंतन करायचे. हे करतांना विभूतीलाच वैभव समजायचे. अशी शिकवण देणारे हे व्रत जो निष्ठेने करतो, त्याने संपादन केलेले ज्ञान त्याच्या मृत्यूनंतरही नष्ट होत नाही. अशा भक्ताचा वा उपासकाचा मृत्यू झाल्यानंतर ते ज्ञान महादेवांच्या गळ्यात सहजतेने जाऊन पडते; कारण कोणतीही कल्याणकारी, उपकार असलेली गोष्ट ही ज्या ज्ञानाला प्रेमाची जोड मिळाली त्या ज्ञानातूनच निर्माण होते. असे ज्ञान अखेरीस शिवातच विलीन होऊन जाते. हे सांगण्यासाठीच महादेवांच्या गळ्यात कवट्यांची माळ असते.
८. महादेवांना ३ नेत्र का आहेत ?
या सर्वांचा आपण विचार केल्यावर आपल्या ध्यानात येईल की, महादेवांना ३ नेत्र का आहेत ? शिव ही ज्ञानाची देवता म्हणजे शिवाला जशी ज्ञानाची दृष्टी आहे तशीच प्रेमाची आणि न्यायाची सुद्धा दृष्टी आहे, म्हणजे महादेवांना ज्ञान, प्रेम आणि न्याय यांचे नेत्र आहेत. म्हणून त्यांना ३ नेत्र आहेत. या ३ नेत्रांनी महादेव सर्वसामान्य भोळ्या जनतेला सुरक्षित ठेवण्याचे काम करतात. साध्या भोळ्या भक्तांचे नाथ म्हणूनच महादेवांना ‘भोलेनाथ’ असेही संबोधले जाते.
९. भगवान महादेवांकडील साधनांचा अर्थ
आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी विरक्त आणि विरागी असलेल्या महादेवांनी काही साधने बाळगली आहेत. ती साधने कशाचे प्रतीक आहेत ? ते आपण जाणून घेऊया.
९ अ. त्रिशूळ : महादेवांनी न्याय, नीती आणि धर्म यांनी युक्त असलेले त्रिशूळ स्वतःच्या हातात धारण केले आहे. या त्रिशुळाच्या साहाय्याने महादेव सज्जनांचे रक्षण, तर दुष्टांचा विनाश करतात. त्रिशूळ हे महादेवांच्या हातातील संहारक शस्त्र आहे.
९ आ. डमरू : हे संगीताचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे डमरू हा ज्ञानाचा उद़्गाता आहे. महादेवांनी डमरू वाजवून महर्षि पाणिनी यांना व्याकरणाचे बीजमंत्र सांगून ज्ञान दिले. हेच महर्षि पाणिनी ‘आद्य व्याकरणकार’ म्हणून ओळखले जातात.
९ इ. नाग : काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर हे ६ विकार नागासारखे अत्यंत विषारी आहेत. मानवाचे जीवन हे ६ रिपू नष्ट करू शकतात. त्यांचे दात पाडून त्यांना आपल्या आज्ञेत आणि नियंत्रणात आणून आपल्या गळ्यात जरी आपण घालून फिरलो, तरी हे नाग म्हणजेच ६ शत्रू हानीकारक ठरत नाहीत. त्यासाठी उपयोगी पडते ते तेजस्वी ज्ञान !
९ ई. चंद्रकोर : महादेवांच्या मस्तकावर बीजेची चंद्रकोर आहे. याचा अर्थ महादेवांनी दुसर्यांच्या म्हणजे उपासकांच्या सद़्गुणांना आपल्या मस्तकावर धारण केले आहे. याचा अर्थ दुसर्याचे सद़्गुण स्वतःच्या डोक्यावर धारण करण्याची ज्याच्यात शक्ती आहे, तो खरा ज्ञानी होय. खरा ज्ञानी सद़्गुणांचा भोक्ता असतो.
९ उ. नंदी आणि कासव : नंदी हा शिवाचा वाहक आणि तो कष्टाळू आहे. शिवभक्त बौद्धिक कष्ट घेण्यास सिद्ध असतो. शिवभक्ताने शिवापर्यंत पोचण्यासाठी आणि शिव होण्यासाठी बौद्धिक कष्ट घेण्यास सिद्ध असले पाहिजे. त्यासह शिवभक्त हा कासवाप्रमाणे इंद्रियांवर नियंत्रण ठेवून जितेंद्रिय होण्यासाठी सिद्ध असला पाहिजे, तरच शिवोपासना यशस्वी आणि फलद्रुप होईल. त्याचप्रमाणे ‘संथपणे, शांतपणे कोणत्याही प्रकारची घाई गडबड न करता अखंड सावध राहून अंतिम ध्येय गाठेपर्यंत साधना करायची आहे’, हा संदेश शिवपिंडीच्या समोर असलेले कासव आपल्याला देते. उपासकाने नंदी आणि कासव यांचे गुण संपादन केले पाहिजेत, तरच तो शिवापर्यंत पोचेल अन् शिव होईल.
१०. अर्ध प्रदक्षिणा घालण्यामागील कार्यकारणभाव
शिवमंदिरात अर्ध प्रदक्षिणा घातली जाते. यामागचे कारण असे की, शिवाचे निर्माल्य ओलांडल्यामुळे मानवाची शक्ती नष्ट होते. ‘पुष्पदंत’ नावाचा एक गंधर्व होता. फुले आणायला जात असतांना त्याने नकळत शिवनिर्माल्य ओलांडले. त्यामुळे त्याच्या शक्तीचा नाश झाला. आपली गेलेली शक्ती परत मिळवण्यासाठी त्याने शिवाचा महिमा गायला. पुष्पदंत गंधर्वाने जो शिवमहिमा गायला, तेच ‘शिवमहिम्नस्तोत्र’ होय. शिवाची अशी स्तुती केल्यावर त्याची गेलेली शक्ती त्याला पुनश्च प्राप्त झाली.
अनेक शिवभक्तांनी म्हणजेच ऋषी, संतपुरुष, महात्मे, साधू, कर्मयोगी आणि ज्ञानयोगी यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन शिवचरणी अर्पण केले, म्हणजेच त्यांनी स्वतःचे जीवन पुष्प शिवाला अर्पण केले. अशा महापुरुषांची निंदा करणे, त्यांच्यावर टीका करणे याचा अर्थ शिवनिर्माल्याचे उल्लंघन करणे होय. अशा प्रकारे शिवभक्तांचा अवमान करणे, हा मोठा अपराध मानण्यात आला. तसे पातक आपल्या हातून घडू नये, हे सर्वसामान्य लोकांना कळावे, यासाठी शिवमंदिरात अर्ध प्रदक्षिणा घातली जाते.
११. ज्ञानाची कल्याण मूर्ती म्हणजे शिवशंकर !
शिव म्हणजे ज्याच्या मस्तकातून ज्ञानाची गंगा वहाते. असे शिवतत्त्व उत्तुंग, धवल, शुद्ध आणि पवित्र शिखरावर वसले आहे. त्याने साधेपणाचा शृंगार केला आहे. विभूतीला वैभव मानून ती आपल्या सर्वांगाला लावली आहे. सज्जनांचे रक्षण करून दृष्टांचे निर्दालन करण्याचा त्याने संकल्प केला आहे. वैराग्य धारण करून कर्मयोगी असलेल्या चंद्राला त्याने मस्तकावर घेतले आहे. या शिवाने जगताच्या रक्षणासाठी हसतमुखाने विष प्राशन केले आहे. अशी ज्ञानाची कल्याणाची मूर्ती म्हणजे शिवशंकर म्हणजेच महादेव !
१२. भगवान शिवाचे अद्वितीय वर्णन
पीठं यस्य धरित्री जलधरकलशं लिङ्गमाकाशमूर्तिः
नक्षत्रं पुष्पमाला ग्रहगणकुसुमं नेत्रचन्द्रार्कवह्निः ।
कुक्षौ सप्तसमुद्रं भुजगिरिशिखरं सप्तपातालपादं
वेदं वक्त्रं षडङ्गं दशदिशिवसनं दिव्यलिङ्गं नमामि ॥
अर्थ : ज्याचे धरणीमाता हे आसन आहे; धरणीवरील सर्व जलाशय हे कलश आहेत; संपूर्ण आकाश हा देह आहे; गळ्यात नक्षत्रांची पुष्पमाला आहे; सारे ग्रह ही फुले आहेत; चंद्र, सूर्य आणि अग्नी हे नेत्र आहेत; सात समुद्र ही कुशी आहे; भूतलावरील सारे पर्वत हे बाहू आहेत; सप्त पाताळ हे चरण आहेत; (कल्प, शिक्षा, छंद, निरुक्त, ज्योतिष, व्याकरण या) ६ अंगांनी युक्त असे वेद हे मुख आहे; ज्याने १० दिशांचे वस्त्र परिधान केले आहे, अशा दिव्य लिंगाला नमस्कार असो.
शिवाच्या विश्व व्यापून टाकणार्या प्रतिमेचे वर्णन या एका श्लोकात करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे शिवमहात्म्य जाणून शिवासारखे होण्यासाठी प्रयत्न करणारे शिवोपासक होऊया, हीच त्याच्या चरणी प्रार्थना !
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली (७.२.२०२३)