महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या समन्वयक कु. तेजल पात्रीकर आणि सहसाधक श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी संगीत तज्ञांच्या घेतलेल्या भेटी !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या समन्वयक कु. तेजल पात्रीकर आणि सहसाधक श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी चित्रीकरणाच्या गटासमवेत मुंबई आणि पुणे येथील प्रसिद्ध कलाकारांच्या अभ्यासात्मक भेटी घेतल्या. तेव्हा संगीताची आराधना करणार्या या कलाकारांशी चर्चा झाली. त्या वेळी संगीताकडे साधना म्हणून पहाण्याचा त्यांचा दृष्टीकोन आणि त्यांच्यातील विविध पैलूंचा अभ्यास करायला मिळाला. त्यांपैकी काही मान्यवरांचे संगीत-साधनेविषयीचे विचार आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य, साधक यांविषयी त्यांनी काढलेले गौरवोद्गार पुढे दिले आहेत.
– कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२३.८.२०१९)
(डॉ. संध्या पुरेचा, चेअरपर्सन ऑफ संगीत नाटक ॲकॅडमी, नवी दिल्ली
मी आचार्य पार्वतीकुमार यांची शिष्या आहे. गत ३५ वर्षे गुरूंकडे गुरु-शिष्य परंपरेने शिक्षण घेतले आहे. आचार्य पार्वतीकुमार यांनी ‘अभिनय दर्पण’ या नृत्यशास्त्रावरील ग्रंथातील श्लोकांवर आधारित माझे नृत्य बसवले आहे. आजपर्यंत हे ३२४ श्लोक साडेतीन घंटे रंगमंचावर सादर करणे, ही केवळ आणि केवळ गुरुकृपा आणि ईश्वरकृपा आहे. त्यांविना हे अशक्यच आहे.
– डॉ. संध्या पुरेचा, चेअरपर्सन ऑफ संगीत नाटक ॲकॅडमी, नवी दिल्ली
(असे नृत्य सादर करू शकणार्या सौ. संध्या पुरेचा या विश्वातील एकमेव नृत्यांगना आहेत ! – संकलक)
पंडिता मनीषा साठे (कथ्थक नृत्यांगना)
‘कला आणि अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या कायमच एकत्र वाटचाल करतात’, अशी आमच्या कुटुंबाची श्रद्धा आहे.’
– पंडिता मनीषा साठे (कथ्थक नृत्यांगना), पुणे (३०.९.२०१९)
पद्मश्री, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर (तबलावादक)
संगीत आणि अध्यात्म यांमध्ये साधनेचा पुष्कळ मोठा संबंध आहे !
‘आपणाशी (महर्षि अधात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर) चर्चा करून मनापासून आनंद झाला. संगीत आणि अध्यात्म यांमध्ये साधनेचा पुष्कळ मोठा संबंध आहे अन् तो आपणास परिचित असल्याने समाधान वाटते.’
– पद्मश्री, तालयोगी पं. सुरेश तळवलकर (तबलावादक), पुणे (२०.९.२०१९)
सुप्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया
‘जिथे खरा सूर (स्वर) असतो, तिथे ईश्वर असतोच’, असा भाव असणारे प.पं. हरिप्रसाद चौरसिया !
संगीताविषयी बोलतांना पं. हरिप्रसाद चौरसिया म्हणाले, ‘‘मी संगीताला ईश्वराच्या समवेत जोडले आहे. जिथे खरा सूर (स्वर) असतो, तिथे ईश्वर असतोच आणि तेथे आपण दैवी संगीताची अनुभूती घेऊ शकतो.’’ – सुप्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया
पद्मश्री सौ. पद्मजा फेणाणी-जोगळेकर (शास्त्रीय आणि सुगम संगीत गायिका)
गातांना स्वतःला पूर्णपणे विसरून जाणे आणि ‘संगीत हेच अध्यात्म आणि सूर हाच परमेश्वर आहे’, असा भाव असणे
‘‘गात असतांना मी स्वतःला पूर्णपणे विसरून जाते. गातांना माझे नेहमीच असे होते. प्रत्येक वेळी गातांना मी ही अनुभूती अनुभवत असते. संगीत हेच माझे अध्यात्म आहे आणि सूर हाच माझा परमेश्वर आहे ! मी त्याचीच आराधना करते. आम्ही वाद्यवृंदाच्या समवेत कुठेही कार्यक्रमाला गेलो, तरी त्या वेळी ‘आम्ही सर्व जण स्वररूपी पुष्पे ओंजळीत घेत आहोत आणि ती देवाचरणी अर्पण करणार आहोत’, असाच माझा भाव असतो.’’
– पद्मश्री सौ. पद्मजा फेणाणी-जोगळेकर (शास्त्रीय आणि सुगम संगीत गायिका), मुंबई
डॉ. विकास कशाळकर (शास्त्रीय गायक)
साधकांमध्ये संगीत आणि अध्यात्म, तसेच संगीतोपचार या विषयांबद्दल जिज्ञासा आहे, हे खरोखरच प्रशंसनीय आहे !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे साधक संगीत आणि अध्यात्म, तसेच संगीतोपचार हे विषय जाणून घेण्यासाठी आले होते. ‘अशा विषयाची जिज्ञासा असणे’, हे खरोखरच प्रशंसनीय आहे. भारतीय कला, परंपरा आणि साधना यांवर ही मंडळी काम करत आहेत. त्यांना पुष्कळ शुभेच्छा !’
– डॉ. विकास कशाळकर (शास्त्रीय गायक), पुणे (२०.९.२०१९)
पंडित उस्मान खान, ज्येष्ठ सतारवादक
‘आपणा सर्वांना भेटून पुष्कळ चांगले वाटले. आपल्याशी संवाद साधून ‘आपण कोणते कार्य करत आहात’, हे समजल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. आपण जे कार्य करत आहात, त्याची आजच्या जगात अत्यंत आवश्यकता आहे. समाज विखुरला गेला आहे. समाजात विस्कळीतपणा आला आहे. यावर उपाय म्हणून आपले कार्य आणि आपली विचारसरणी हेच कामी येऊ शकते.
‘Music is the by product of meditation or the other way round.’
(अर्थ : ध्यानामुळे संगीत साधता येते किंवा संगीतामुळे ध्यानावस्था प्राप्त होते.) संगीत एक साधना आहे. त्याच्याकडे साधनेच्या दृष्टीनेच पहायला हवे. आपणा सर्वांना, आपल्या विचारसरणीला आणि आपल्या साधनेला माझ्याकडून शुभेच्छा !’
– पं. उस्मान खान, ज्येष्ठ सतारवादक, पुणे
पंडित उदय भवाळकर, धृपद गायक, पुणे
अध्यात्म आणि भारतीय संस्कृती विश्वभरात पोचवण्याचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य कौतुकास्पद आहे !
‘१८.९.२०१९ या दिवशी आपल्या सर्वांचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने घरी आगमन झाले. मला आपणा सर्वांना भेटून अत्यंत प्रसन्न वाटले. आपण अध्यात्म आणि भारतीय संस्कृती विश्वभरात पोचवण्याचा अन् भारताला उज्ज्वल करण्याचा जो शुभ प्रयत्न करत आहात, त्यासाठी मी आपणा सर्वांना हार्दिक शुभकामना आणि धन्यवाद देतो. आजच्या युगात आणि अशा वेळी समाजात अध्यात्मप्राप्तीचे मार्गदर्शन करणे, हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे समाजस्वास्थ्य अधिक चांगले होईल. धन्यवाद ! हरि ॐ !’
– पं. उदय भवाळकर, धृपद गायक, पुणे