ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंद !
ठाणे महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तांवर आक्रमण केल्याचे प्रकरण
ठाणे, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी १५ फेब्रुवारीला संध्याकाळी आक्रमण केले. महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी सुरक्षारक्षकांसमोरच हा प्रकार घडला. या प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे खासगी स्वीय साहाय्यक अभिजीत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विक्रम खामकर, हेमंत वाणी यांच्यासह ७ जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
१. जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कुटुंब यांना संपवण्यासाठी तिहार कारागृहात असलेला गुंड बाबाजी उपाख्य सुभाषसिंग ठाकूर याच्या साहाय्याने एक गुंड तैनात केला असल्याची संभाषणाची एक क्लिप सामाजिक माध्यमांवर प्रसारीत झाली होती. ते संभाषण साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
२. याविषयी आहेर म्हणाले, ‘‘ही क्लिप मी ऐकलेली नाही. त्यामुळे तो आवाज कुणाचा आहे, हे मी नक्की सांगू शकत नाही. ५ जानेवारी २०२३ या दिवशी मी एका व्यक्तीविरोधात नौपाडा पोलीस ठाणे गुन्हा नोंद केला होता. त्या वेळी मी पोलिसांकडे दिलेल्या एका पेनड्राईव्हमध्ये काही ऑडियो क्लिप होत्या. त्यात त्या व्यक्तीने माझ्या हत्येची सुपारी घेतली असून ती व्यक्ती जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेत होती. या प्रकरणी मी गुन्हा नोंद केल्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती.
मी वर्ष २०१९ पासून मुंब्रा येथे साहाय्यक आयुक्त आहे. मी अनधिकृत बांधकामे तोडली आहेत. ती न तोडण्यासाठी माझ्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आणण्यात आला होता. मला आणि माझे कुटुंबीय यांना शिवीगाळ केली जात होती. अतिक्रमण विभागाचा पदभार घेतल्यावर ‘माझ्या मतदारसंघात मला विचारल्याविना कारवाई करू नये’, असे आव्हाड यांनी सांगितले होते. अशा बर्याच गोष्टी आहेत, ज्या मी येत्या काही दिवसांत पुढे आणीन.’’
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचे गुन्हे जगताशी संबंध असून ते संघटित गुन्हेगारांचा म्होरक्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांसदर्भातील पत्र आव्हाड यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दिले आहे. ‘महेश आहेर यांनी माझ्या कुटुंबियांना जिवे ठार मारण्याचे कारस्थान केले असून त्यासाठी गुन्हेगारांचा वापर केला आहे. त्यामुळे आहेर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी’, अशी मागणी आव्हाड यांनी पत्रात केली आहे.