कराड येथील श्री मारुतीबुवा मठाच्या तत्कालीन मठाधिपतीस ७ वर्षे सक्तमजुरी !

कराड, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – येथील श्री मारुतीबुवा कराडकर मठाचे अध्यक्ष यशवंत दाजी माने यांच्या डोक्यात वीणा घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मठाचे तत्कालीन मठाधिपती बाजीराव जगताप यांना न्यायालयाने दोषी धरून ७ वर्षे सक्तमजुरी आणि ७ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सरकार पक्षाचा युक्तिवाद आणि सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून कराडच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रविकांत साखरे यांनी बाजीराव मामा कराडकर यांना या गुन्ह्यात दोषी धरत शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने अधिवक्ता राजेंद्र शहा यांनी काम पाहिले. शिक्षा झालेले तत्कालीन मठाधिपती बाजीराव मामा हे या गुन्ह्यात जामीनावर बाहेर असतांना त्यांनी मारुतीबुवा मठाचे मठाधिपती जयवंत पिसाळ यांचा खून केल्याच्या आरोपावरून ते सध्या कोठडीत असल्याची माहिती अधिवक्ता राजेंद्र शहा यांनी या वेळी दिली.