आद्य क्रांतीकारकांच्या सशस्त्र लढ्याचे परिणाम !
आज, १७ फेब्रुवारी २०२३ आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा १४० वा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांच्या अत्याचाराला, अन्यायाला आणि आर्थिक पिळवणुकीला शह देण्यासाठी समाजातील महार, मांग, रामोशी अशा विविध जातीजमातींना एकत्र करून सशस्त्र लढा दिला. त्यांची ही सशस्त्र क्रांती त्यांच्या नंतरच्या पिढीतील देशभक्तांना प्रेरणा देणारी ठरली, तर त्यांच्या या क्रांती लढ्याने ब्रिटिशांचे धाबे दणाणून गेले.
१. वासुदेव बळवंत यांच्या सशस्त्र क्रांतीच्या गंभीर परिणामांविषयी सर एडमंड यांनी सादर केलेला वृत्तांत
वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र क्रांतीमुळे ब्रिटीश सरकारला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. याविषयी आपले मत व्यक्त करतांना सर एडमंड वासुदेव बळवंत फडके यांच्या बंडाच्या वृत्तांतात लिहितात, ‘‘वासुदेव फडके यांनी पुण्याच्या आणि सातार्याच्या कलेक्टरांच्या (जिल्हाधिकार्यांच्या) मस्तकांसाठी प्रत्येकी ५ सहस्र रुपयांची पारितोषिके देऊ केली. छळग्रस्त जनतेची त्यांच्या गोर्या छळ करणार्यांच्या हातून मुक्तता करण्याची त्यांची कल्पना युद्धाच्या नसा मिळवण्यासाठी दरोडे घालणे ही होती.’’ याच वृत्तांताच्या अखेरीस फडके यांच्या सशस्त्र क्रांतीच्या गंभीर परिणामाविषयी सर एडमंड लिहितात, ‘‘फडके अधिराज्यविरुद्ध आत्यंतिक अपराध करणारे गृहस्थ होते. त्यांनी बर्याच भागातील राज्यव्यवस्था उलथून टाकली होती.’’
२. काँग्रेसची स्थापना करण्यामागील ब्रिटिशांचे खरे कारण
सर एडमंड यांच्या या विधानांवरून पुढील गोष्टी निश्चितपणे सांगता येतात –
वासुदेव बळवंत फडके यांनी स्वबळावर उभारलेल्या सशस्त्र क्रांतीकारी संघटनेने दिलेला लढा म्हणजे ब्रिटीश सरकारच्या मुळावर केलेला जबरदस्त आघात होता. ब्रिटीश सरकारच्या विरोधात सशस्त्र लढा देण्याची क्षमता हिंदुस्थानच्या जनतेत निर्माण झाल्याचा अनुभव ब्रिटीश सरकारला येत होता. अशी क्रांती अखंड चालू राहिली, तर ब्रिटिशांना हिंदुस्थानात स्वतःची राजकीय सत्ता टिकवणे अशक्य झाले असते. त्यासह जगावर राज्य करणारी महासत्ता म्हणून त्यांच्या कीर्तीला काळीमा फासली गेली असती. या अपकीर्तीपासून ब्रिटीश स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करू लागले. वासुदेव बळवंत फडके यांच्याप्रमाणे पुनश्च कुणीही सशस्त्र क्रांती करण्याचे साहस करू नये; म्हणून ठोस उपाय शोधून काढण्याचा घाट ब्रिटीश सरकारने घातला. त्यातूनच काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसची स्थापना करण्यामागे वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र क्रांतीचे एक प्रमुख कारण होते.
लन ऑक्टोव्हियन ह्यूम हे नगरमध्ये जिल्हाधिकारी होते. त्यांनी वर्ष १८५७ च्या हिंदुस्थानच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धाचा धसका घेतला होता. ब्रिटीश सरकारच्या विरोधात निर्माण होणार्या असंतोषाला वाव देण्यासाठी एखादे वायुद्वार (सेफ्टी व्हॉल्व्ह) हिंदुस्थानात असले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. वर्ष १८८२ मध्ये सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या स्थापनेसाठी प्रयत्न करण्यास आरंभ केला. त्यांच्या प्रयत्नातूनच वर्ष १८८५ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली.
३. महान राजकीय विचारवंत विल्फिड स्कॅवेन ब्लंट आणि गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांच्यात सशस्त्र क्रांतीविषयी झालेली चर्चा
विल्फिड स्कॅवेन ब्लंट हे त्याच कालखंडातील महान राजकीय विचारवंत आणि टीकाकार होते. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याचा ते पुरस्कार करत असत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे सहकारी क्रांतीकारक यांची तत्त्वप्रणाली आणि त्यांचे क्रांतीकार्य यांचा त्यांनी उघडपणे गौरव केला होता. मदनलाल धिंग्रा यांनी सर कर्झन वायली यांच्या वध केला. त्याची त्यांनी प्रशंसा केली होती. विस्टन चर्चिल, लॉईड जॉर्ज यांसारख्या ज्येष्ठ राज्यकर्त्यांना सुद्धा त्यांचे मत जाणून घेण्याची प्रचंड जिज्ञासा आणि श्रद्धा निर्माण झाली होती. असा हा हिंदुस्थानच्या क्रांतीकारकांचा कैवार घेणारा आंग्ल विचारवंत वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र क्रांती लढ्यानंतर ४-५ वर्षांनी हिंदुस्थानात आला. हिंदुस्थानात आल्यावर त्यांनी मुंबईमध्ये गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांची भेट घेतली. फडके यांच्या सशस्त्र क्रांतीविषयी त्यांच्यात चर्चा झाली. या चर्चेच्या वेळी फर्ग्युसन काय म्हणाले ते सांगताना ब्लंट लिहितात, ‘‘गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन यांच्या मते हिंदुस्थानातील बहुसंख्य जनता त्यांच्या शासनावर प्रसन्न आहे. त्यामुळे सशस्त्र क्रांतीच्या संकटाला पुन्हा सामोरे जावे लागेल, असे वाटत नाही; कारण ५ वर्षांपूर्वी एका महाराष्ट्रीयन ब्राह्मणाने बंडाची खटपट करण्याचा प्रयत्न केला; पण तो सापडला. त्याच्या दैनंदिनीत आपल्या प्रतिपादना संबंधात लोक दगडाप्रमाणे मठ्ठ आणि चेतनाहीनच राहिल्याचे आपल्या अनुभवाला आल्याचे गार्हाणे त्याने केल्याचे प्रत्ययाला आले होते.’’ फर्ग्युसन असे म्हणत असले, तरी वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र क्रांती युद्धामुळे ब्रिटीश सरकारच्या तोंडचे पाणी पळाले होते, यात संशय नाही.
४. सशस्त्र क्रांतीलढ्यातून क्रांतीकारकांची फौज निर्माण होणे
वासुदेव बळवंत फडके यांना त्यांच्या क्रांतीकार्यात यश जरी प्राप्त झाले नसले, तरी त्यांच्या लढ्याला दुर्लक्षित करता येत नाही. त्यांच्या या लढ्यामुळे ‘परतंत्र राष्ट्रातील जनतेत परकीय सत्तेच्या विरोधात आपण लढू शकतो’, याविषयीचा उत्साह आणि आत्मविश्वास उत्पन्न झाला होता, हे नाकारता येत नाही. भविष्यात अशा प्रकारचा लढा देण्यासाठी हिंदुस्थानातील भावी पिढी सज्ज होईल, याची शक्यता इंग्रजांनी ध्यानात घेतली होती. म्हणूनच राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्याचा घाट ब्रिटिशांनी घातला.
फर्ग्युसन यांचा कयास खरा ठरला नाही. वासुदेव बळवंत फडके यांच्यानंतर ब्रिटीश सरकारच्या विरोधात हातात शस्त्र घेऊन लढणार्या सशस्त्र क्रांतीकारकांची फौज अविरत निर्माण होत राहिली. त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातून अनेक पिढ्या निर्माण झाल्या.
५. ‘आनंदमठ’ कादंबरी साकारण्यामागील कार्यकारणभाव
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना ‘वन्दे मातरम्’ हे गीत स्फुरले. हे गीत त्यांनी नंतर ‘आनंदमठ’ या कादंबरीत समाविष्ट केले. वासुदेव बळवंत फडके यांच्या क्रांतीकार्यामुळेच त्यांना ‘आनंदमठ’ ही कादंबरी लिहिण्याची स्फूर्ती मिळाली.
‘बंकीमसरणी’ या ग्रंथाचे लेखक प्रमथनाथ विशी म्हणतात, ‘‘आनंदमठ कादंबरीची पृष्ठभूमी बंगाल असली, तरी त्या कथेची वास्तविक भूमी संपूर्ण भारतवर्षाला व्यापणारी आहे. बंकिमचंद्रांना हे कथानक बंगालच्या सीमेबाहेरील इतिहासावरून सुचले. स्वातंत्र्यासाठी बंड करण्याचे तोपर्यंत बंगालमधील लोकांना ठाऊक नव्हते. अशा घटना केवळ महाराष्ट्रातच घडल्या होत्या.’’ बंकिमचंद्रांनीच म्हटले आहे, ‘‘अखिल हिंदुस्थानात राष्ट्रीयत्व आणि स्वातंत्र्य प्रियता हे गुण एकट्या महाराष्ट्रातच आढळून येतात.’’ प्रमथनाथांच्या मते त्या वेळी वासुदेव बळवंत फडके यांच्या कार्याचा भरभक्कम आधार होता.
डॉ. विमानबिहारी मुजुमदार यांनी लिहिलेल्या एका ग्रंथात ‘आनंदमठ’ आणि ‘फडके’ असे एक स्वतंत्र प्रकरण लिहिले आहे. या प्रकरणात त्यांनी काढलेला निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहे, ‘वासुदेव बळवंत हेच आनंदमठाचे स्फूर्तीदाते होते.’
डॉ. विमानबिहारी मुजुमदार यांनी केलेल्या विवेचनानुसार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ‘डेप्युटी मॅजिस्ट्रेट’ (उपदंडाधिकारी) पदी ३२ वर्षे नोकरी करत होते. वर्ष १८७५ मध्ये त्यांनी ‘वन्दे मातरम्’ हे गीत रचले. ते ‘वंगदर्शन’मध्ये प्रसिद्ध झाले. १८७९ मध्ये हुगळी येथे आनंदमठाची शेवटची प्रकरणे लिहिली. वर्ष १८८० मध्ये ‘आनंदमठ’ ही कादंबरी लिहून पूर्ण झाली. १८७९ या वर्षी वासुदेव बळवंत फडके यांना अटक करण्यात आली. त्यांच्या आत्मचरित्राचा अनुवाद ‘समाचार चंद्रिका’ या पत्रात प्रसिद्ध झाला. पुढे ८ फेब्रुवारी १८८० या दिवशी हा अनुवाद पुस्तक रूपात प्रसिद्ध झाला. या प्रकाशनामुळे संपूर्ण हिंदुस्थानात खळबळ उडाली. कोलकाताच्या ‘अमृत बाजार’ पत्रिकेने वासुदेव बळवंतांचा ‘थोर देशभक्त’ म्हणून गौरव केला. त्या वेळी कोलकाता ही हिंदुस्थानची राजधानी होती. त्या राजधानीत सशस्त्र क्रांतीचे पडसाद उमटले. त्यामुळे ब्रिटीश सरकारची झोप उडाली. याच घटनेचा बंकिमचंद्रांवर मोठा प्रभाव पडला. त्यातूनच ‘आनंदमठ’ ही कादंबरी साकारली.
६. हिंदुस्थानातील क्रांतीकारक आणि राष्ट्रीयत्व यांचे यथार्थ जनक वासुदेव बळवंत फडके !
वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र क्रांतीलढ्याविषयी प्रसिद्ध इतिहासकार डॉ. रमेशचंद्र मुजुमदार म्हणतात, ‘‘१८५७ च्या बंडानंतरच्या काळात हिंदुस्थानातील ब्रिटीश राज्य उलथून पाडण्याच्या उघड उघड उद्दिष्टाने पहिली गुप्त क्रांतीसंस्था संघटित करण्याचे श्रेय वासुदेव बळवंत फडके यांचे आहे. ब्रिटीश सरकार विरुद्ध फडके यांनी स्वतः एकाकी दिलेल्या लढाईने वारसा मागे ठेवला. त्यांनी जे बीज पेरले त्याचे पाव (२५ वर्षांत) शतकाच्या अवधीत त्याच्या शाखा सर्व हिंदुस्थानभर विस्तार पावल्या आणि त्याचे एका प्रचंड वटवृक्षात रूपांतर झाले. गुप्तपणे शस्त्र गोळा करणे, तरुणांना सैनिकी शिक्षण देणे आणि राजकीय दरोड्यांद्वारे आवश्यक तो पैसा हस्तगत करणे या त्यांच्या मार्गाचा त्यांच्या (फडके यांच्या) नंतरच्या क्रांतीकारकांनी अवलंब केला. म्हणूनच वासुदेव बळवंत फडके यांनाच हिंदुस्थानातील क्रांतीकारक पंथाच्या राष्ट्रीयत्वाचे यथार्थपणे जनक मानले पाहिजे.’’
अशा या आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांना कोटी कोटी प्रणाम !
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१४.१.२०२३)