संस्कृत भाषेला लुप्त होण्यापासून वाचवा !
‘भारतीय जनगणना २०२३’साठी महत्त्वाचे आवाहन
‘ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. वर्ष २०२३ ची भारतीय जनगणना शेवटच्या टप्प्यात आहे. जनगणना अधिकारी माहिती गोळा करण्यासाठी तुमच्या घरी येतील. तेव्हा ते तुम्हाला ‘मातृभाषेच्या खेरीज आणखी कोणत्या भाषा येतात ?’, असे विचारतील. या वेळी तुम्ही सनातनी हिंदु असल्याने कृपा करून ‘संस्कृत येते’, असे सांगण्यास विसरू नका. तुम्ही जरी संस्कृत भाषा प्रतिदिन व्यवहारात बोलत नसाल, तरी तुम्हाला येत असलेल्या भाषांमध्ये एक ‘संस्कृत’ अवश्य लिहा. यामागील कारण हे आहे की, आपण प्रतिदिन आपली प्रार्थना, मंत्रोेच्चार, श्लोक, संपूर्ण धार्मिक विधी संस्कृत भाषेतच करतो. अशा प्रकारे आपण देवतांची भाषा संस्कृत शुभ-अशुभ कार्यात वापरतच असतो. त्यामुळे आपण ‘संस्कृत भाषाही येते’, हे जनगणना करणार्या अधिकार्यांच्या पत्रकात निश्चित लिहा; कारण शेवटच्या जनगणनेच्या माहितीनुसार संस्कृत बोलणार्यांची संख्या संपूर्ण भारतवर्षात २ सहस्र एवढी सांगण्यात आली होती. याउलट अरबी आणि फारसी बोलणार्यांची संख्या याहून अनेक पटींनी अधिक होती. त्यामुळे त्यांना भाषेच्या विकासासाठी अनुदान दिले जाते. या वेळी जर संस्कृत बोलणार्यांची संख्या घटली, तर तिला लुप्त भाषेच्या सूचीत जोडण्यात येईल, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.
दिव्य संस्कृत भाषा वाचवण्यासाठी करावयाचा प्रयत्न
संस्कृत ही भारताची सर्वाधिक प्राचीन, सुंदर आणि दिव्य भाषा आहे. या दैवी संस्कृत भाषेला जिवंत ठेवण्याचे संपूर्ण दायित्व आपल्या सर्वांचे आहे. आपल्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे जर संस्कृतला जनगणना अधिकार्यांनी लुप्त भाषेमध्ये मोजले, तर तिचा प्रचार, प्रसार आणि विकास यांसाठी सरकारकडून कोणतेही निश्चित असे अनुदान मिळणार नाही अन् मग आपण संस्कृतला नेहमीसाठी हरवून बसू. म्हणून या वेळी जनगणना पत्रकात सतर्क राहून ‘संस्कृत’ भाषेचे नाव अवश्य जोडा. आपल्या सामूहिक प्रयत्नांमुळेच संस्कृत भाषेला जिवंत ठेवता येईल. हे सर्वविदित आहे की, आपण सनातनी हिंदूंनी स्वत:हून आपली हानी करून घेतली आहे; परंतु या वेळी हानीला लाभामध्ये निश्चितपणे पालटता येणार आहे. अजून वेळ गेलेली नाही. त्यामुळे आपण आपले नातेवाईक, मित्र, परिचित, व्यापारी संकुल यांच्या अनेकानेक ‘व्हॉट्सॲप’ गटांत ही गोष्ट निश्चित प्रसारित करा आणि लुप्त होण्याच्या उंबरठ्यावर पोचलेल्या आपल्या संस्कृत भाषेला वाचवा !’ (अमेरिकेत रहाणार्या डॉ. मृदुल यांना ‘देवभाषा संस्कृत’ वाचवण्यासाठी असे आवाहन करावे लागणे, हे भारतियांना लज्जास्पद ! – संपादक)
– डॉ. मृदुल कीर्ती, अमेरिका
(साभार : सामाजिक संकेतस्थळ)
डॉ. मृदुल कीर्ती यांचा संक्षिप्त परिचयडॉ. मृदुल कीर्ती यांनी वेद, उपनिषदे, भगवद्गीता या महत्त्वाच्या संस्कृत ग्रंथांविषयी जनमानसात रुची निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यांनी श्रीमद्भगवद्गीता, सामवेद, अष्टावक्र गीता, पतंजलि योग दर्शन, सांख्ययोग दर्शन, विवेक चुडामणि, शंकर पंचदर्शन आदी ग्रंथांचे हिंदीमध्ये काव्यात्मक भाषांतर केले आहे. |