शिक्षक अधिवेशनानिमित्त पुणे जिल्ह्यातील एकही प्राथमिक शाळा बंद न ठेवण्याचा जिल्हा परिषदेचा आदेश !
पुणे – जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना केवळ ‘शिक्षक अधिवेशना’स जाण्यासाठी रजा संमत केली जाईल; परंतु एकाच शाळेतील सर्वच शिक्षकांना रजा संमत केली जाणार नाही. अधिवेशनकाळात जिल्ह्यातील एकही जिल्हा परिषद शाळा बंद रहाणार नाही, याचे योग्य नियोजन करावे, असा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शाळांना दिला आहे.
राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या संघटनांच्या वतीने रत्नागिरी येथे १५ ते १७ फेब्रुवारी या दिवशी अधिवेशन होणार आहे. १९ फेब्रुवारी या दिवशी ‘महाशिवरात्र’, तर २० फेब्रुवारीला रविवारची सुट्टी जोडून आली आहे. यामुळे सलग ५ दिवस शाळा बंद रहाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हा आदेश काढल्याचे समजते, तसेच ज्या शिक्षकांनी अधिवेशनासाठी रजा घेतली आहे, त्यांची अधिवेशनातील उपस्थिती ग्राह्य धरून त्यांची नोंद सेवा पुस्तिकामध्ये करण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले आहे.