शिक्षकेतर कर्मचार्यांचा ‘महाआक्रोश मोर्चा’ !
मागण्यांची नोंद न घेतल्यास १० वी आणि १२ वी च्या परीक्षांवर बहिष्कार !
पुणे – शिक्षकेतर कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या वतीने शनिवार वाडा ते शिक्षण आयुक्त कार्यालयापर्यंत ‘महाआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. राज्यभरातील शिक्षकेतर कर्मचारी या मोर्च्यामध्ये सहभागी झाले होते. हा मोर्चा म्हणजे सरकारला चेतावणी असून शिक्षकेतर कर्मचार्यांच्या प्रश्नांची तातडीने नोंद घ्यावी, तसे न झाल्यास दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याची भूमिका या वेळी मांडली. पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शिक्षण संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना, विविध शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य लिपिक हक्क परिषदेचे पदाधिकारी आदी या मोर्च्यात सहभागी झाले होते.
शिक्षकेतर कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भातील निवेदन शिक्षण सहसंचालक हरुण अत्तार यांनी आयुक्त कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी राजेश शिंदे यांना दिले. शिक्षकेतर कर्मचार्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात शासनाने काहीच कार्यवाही केली नाही; मात्र आता मागण्यांची नोंद न घेतल्यास बेमुदत आंदोलन करण्यात येईल, तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घातला जाईल, असे महामंडळाचे राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका‘मोर्च्याविना सरकारपर्यंत आपले म्हणणे पोचणारच नाही’, अशी प्रतिमा सरकारची व्हायला नको, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत ! समस्या वेळच्या वेळी आणि योग्य पद्धतीने सोडवाव्यात, अशीच जनतेची अपेक्षा आहे ! |