विज्ञानाला अध्यात्माची जोड मिळाली की, नव्या कल्पना उदयाला येतात ! – डॉ. विजय भटकर, संगणक शास्त्रज्ञ
पुणे येथील ‘श्री स्वामी समर्थ औंध’ पुरस्कार वितरण सोहळा !
पुणे – विज्ञानात कल्पनेला पुष्कळ महत्त्व आहे. कल्पनेविना विज्ञानात प्रगती होऊ शकत नाही. एखादी गोष्ट आहे किंवा नाही, हे विज्ञानात सिद्ध करावे लागते. विज्ञानाला अध्यात्माची जोड मिळाली की, नव्या कल्पना उदयाला येतात, यातूनच विज्ञानाला विकसित होण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन डॉ. विजय भटकर यांनी केले. ‘श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान’ यांच्या वतीने देण्यात येणारा ‘श्री स्वामी समर्थ औंध’ पुरस्कार पद्मभूषण प्रा. डॉ. विजय भटकर यांना स्वाध्याय परिवाराच्या श्रीमती धनश्री तळवलकर यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अधिवक्ता श्रीकांत पाटील, योगेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. हे सोहळ्याचे २३ वे वर्ष असून या वेळी ‘आत्मविश्वास’ या विषयानुसार सर्व सप्ताहातील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.
डॉ. विजय भटकर यांनी सांगितले की, तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी विज्ञान तंत्रज्ञान मंत्री, त्या विभागाचे सचिव, मी आणि आणखी काही लोकांना बैठकीसाठी बोलावले होते. त्या वेळी त्यांनी आपल्याला ‘सुपर कॉम्प्युटर’ सिद्ध करता येईल का ? असे विचारले. त्या वेळी मी ‘सुपर कॉम्प्युटर’ पाहिलाही नव्हता; मात्र आत्मविश्वासाने मी होकार दिला. त्यानंतर पुणे विद्यापिठाच्या मागे असणार्या इमारतीत आम्ही ‘सुपर कॉम्प्युटर’ बनवण्यास आरंभ केला आणि अथक परिश्रमाने यशस्वीही झालो.
या वेळी बोलतांना स्वाध्याय परिवाराच्या प्रवर्तक धनश्री तळवलकर म्हणाल्या की, विज्ञानात एखादी गोष्ट सिद्ध केली की, पुन्हा त्यातीलच पुढच्या शोधाला आरंभ होतो. त्यामुळे त्या वैज्ञानिक गोष्टी सातत्याने विकसित होत असतात. विज्ञानात प्रत्येक गोष्ट ही मोजमापात असते; मात्र ज्या गोष्टी मोजता येत नाहीत, त्या गोष्टी अध्यात्मात येतात.