पुणे येथील भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग खरे नसल्याचा आसाम सरकारचा दावा !
भीमाशंकर देवस्थानचे मुख्य पुजारी मधुकरशास्त्री गवांदे यांचे आवाहन
आसाम सरकारच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू नये !
पुणे – येथील आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर हे देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे सहावे ज्योतिर्लिंग आहे; मात्र ‘भीमाशंकरचे ज्योर्तिलिंग हे खरे नसून आसाममधील ज्योतिर्लिंग खरे आहे’, असा दावा आसाम सरकारने केला आहे. आसाम पर्यटन विभागाने या संदर्भात विज्ञापनही बनवले आहे. त्यामुळे आता या स्थानावरून वाद निर्माण झाला आहे. यावर ‘भीमा नदीकाठी वसलेले ज्योर्तिलिंग हे भीमाशंकर म्हणून अनादी काळापासून प्रसिद्ध आहे. आसाम सरकारच्या म्हणण्यावर कुणीही विश्वास ठेवू नका’, असे आवाहन भीमाशंकर देवस्थानचे मुख्य पुजारी मधुकरशास्त्री गवांदे यांनी केले आहे. महाराष्ट्रातील अनेकांनीही या गोष्टीचा निषेध व्यक्त केला आहे, तर ‘सरकारने यावर भूमिका घोषित करावी’, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
#धाकड़EXCLUSIVE: श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग पर असम Vs महाराष्ट्र? जानिए, छठे ज्योतिर्लिंग पर क्यों छिड़ी है ‘जंग’?
@Anant_Tyagii के साथ देखिए, असम सरकार के विज्ञापन में क्या है?#Assam #ShriBhimashankarJyotirlinga #Jyotirlinga #Maharashtra pic.twitter.com/zjPeW5Gjpm— Times Now Navbharat (@TNNavbharat) February 15, 2023
मधुकरशास्त्री गवांदे यांनी सांगितले की, अनादिकाळापासून पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरमध्ये ज्योर्तिलिंग आहे. शिवपुराण आणि शिवलीलामृत यांतही त्याचा उल्लेख आहे. शंकरचार्यांनी सह्याद्री पर्वतरांगांतील भीमा नदीकाठी वसलेले भीमाशंकर यावर काव्य रचले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून येथे काही परंपरा पाळल्या जातात. आसाममध्ये भीमाशंकर असल्याचे प्रथमच ऐकायला मिळाले. येथील शिवलिंग मोठे आहे, तर भीमाशंकरमधील शिवलिंग शंकर आणि पार्वती असे दुभंगलेले आहे. असे भेद असलेले शिवमंदिर इतर कुठेही नाही. देशातील इतर ज्योर्तिलिंगामध्येही असेच वाद निर्माण केले गेले. यावर भाविकांनी विश्वास ठेवू नये.
महाराष्ट्रातील श्री भीमाशंकर हेच धर्मशास्त्रात वर्णित सहावे ज्योतिर्लिंग असल्याने याविषयी राजकीय वाद नको ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ
पुणे – आसाम सरकारने १४ फेब्रुवारी २०२३ या दिवशी एक विज्ञापन प्रसारित करून पुणे येथील श्री भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग नसून आसाममधील गौहत्ती येथील भीमाशंकर हे खरे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप चालू झाले आहेत. खरेतर तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळे आदी धार्मिक गोष्टींमध्ये राजकारण होणे दुर्दैवी आहे. देव, धर्म, धर्मग्रंथ, प्रथा-परंपरा, तीर्थक्षेत्रे, धार्मिक स्थळे, मंदिरे आदी धार्मिक गोष्टींविषयी धार्मिक क्षेत्रातील तज्ञ अर्थात् शंकराचार्य, धर्माचार्य, संत-महंत आदी अधिकारी व्यक्तींना बोलण्याचा अधिकार आहे. राजकारण्यांनी धार्मिक गोष्टींविषयी न बोललेलेच बरे. स्वत: आद्य शंकराचार्य यांच्या १२ ज्योतिर्लिंग श्लोक, तसेच शिवलीलामृत ग्रंथ, शिवपुराण आदी अनेक मान्यताप्राप्त धर्मग्रंथांमध्ये पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर हेच भगवान शिवाचे सहावे स्वयंभू ज्योतिर्लिंग असल्याचे स्वयंस्पष्ट आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये भीमा नदीचे उगमस्थान असलेल्या घनदाट जंगलातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले श्री भीमाशंकर हेच अत्यंत प्राचीन आणि सहावे ज्योतिर्लिंग देवस्थान आहे, असे ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी स्पष्ट केले आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी शंकराचार्य-धर्माचार्य यांचे मार्गदर्शन घेऊन ‘पुणे जिल्ह्यातील श्री भीमाशंकर हेच सहावे ज्योतिर्लिंग असल्याची भूमिका देशासमोर मांडावी’, असे आवाहन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने करण्यात आले आहे.
view