प्रशासकीय अधिकार्याला मारहाण केल्याप्रकरणी मुंबईतील माजी नगरसेवकाला अटक !
मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी घाटकोपर येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक किरण लांडगे यांना १३ फेब्रुवारी या दिवशी पोलिसांनी अटक केली. लांडगे यांना अटकेच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी विनोबा भावेनगर पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली.
वर्ष २०२२ मध्ये घाटकोपरमधील असल्फा परिसरात सातत्याने येणार्या पाण्याच्या समस्येविषयी स्थानिकांनी किरण लांडगे यांच्याकडे तक्रार केली होती. या प्रकारावरून किरण लांडगे यांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार अधिकार्यांनी पोलीस ठाण्यात केली होती. त्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे किरण लांडगे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. शिंदे गटाच्या दबावामुळे किरण लांडगे यांना अटक करण्यात आल्याचा आरोप लांडगे यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.