भारतीय पद्धतीचे गोवंश वाढणे अत्यंत आवश्यक ! – वैद्य सुयोग दांडेकर
सातारा, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – परदेशातील विविध प्रकारच्या जातीच्या गायी आहेत; मात्र शरिराचे स्वास्थ आणि आरोग्य सुधारण्यासाठी भारतीय गोवंशाचे गोसंवर्धन करणे, ही काळाची आवश्यकता आहे. या गोवंशाचे मल आणि मूत्र यांतून उत्पादित केलेली विविध औषधेही प्रत्येकाच्या शरीर स्वास्थ्यासाठी बहुउपयोगी आहेत, असे प्रतिपादन वैद्य सुयोग दांडेकर यांनी केले.
श्रीक्षेत्र सज्जनगड येथील ‘श्रीधर कुटी ट्रस्ट’च्या वतीने चालू करण्यात आलेल्या ‘पावन पंचगव्य उत्पादनां’चा उद़्घाटन कार्यक्रम गडावरील ‘श्री समर्थ सेवा मंडळा’च्या श्रीराम भक्तनिवास येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी वैद्य सुयोग दांडेकर बोलत होते. कार्यक्रमासाठी ‘श्री समर्थ सेवा मंडळा’चे अध्यक्ष पू. गुरुनाथ महाराज कोटणीस, प्रसिद्ध कीर्तनकार मकरंदबुवा रामदासी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले.
गोपूजन झाल्यानंतर पावन पंचगव्य उत्पादनांचे महत्त्व विशद करतांना वैद्य सुयोग दांडेकर म्हणाले की, ‘श्रीधर कुटी ट्रस्ट’च्या वतीने चालू करण्यात आलेली ही पावन पंचगव्य उत्पादने निश्चितच सर्वांच्या आरोग्यासाठी परिपूर्ण आणि योग्य उपचारपद्धतींचा अवलंब करणारी आहेत. दैनंदिन जीवनामध्ये आयुर्वेदिक उत्पादने उपयोगात आणणार्या सर्वांनीच पावन पंचगव्य उत्पादनांचा अनुभव घ्यावा.