तळेगाव दाभाडे (जिल्हा पुणे) येथे ‘हिंदु जनगर्जना मोर्च्या’मध्ये सहस्रो हिंदू एकवटले !
तळेगाव दाभाडे (जिल्हा पुणे), १४ फेब्रुवारी (वार्ता.) – येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने १२ फेब्रुवारी या दिवशी ‘हिंदु जनगर्जना मोर्चा’ काढण्यात आला. गोवंश हत्याबंदी, लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करावा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन (फाल्गुन अमावास्या) ‘धर्मवीरदिन’ म्हणून घोषित करण्यात यावा, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्याा. या वेळी श्री कालीपुत्र कालीचरण महाराज, श्री सुनील महाराज शास्त्री, भाजप आमदार श्री. नितेश राणे, अधिवक्ता मृणाली पडवळ आणि ह.भ.प. शंकर महाराज मराठे यांनी मोर्च्याला संबोधित केले. या वेळी कालीचरण महाराज यांनी ‘शिवतांडव स्तोत्रा’चे गायन केले. या मोर्च्यात बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वारकरी संप्रदाय आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला अन् धर्माभिमानी हिंदू सहस्रोंच्या संख्येने भगवे झेंडे, टोपी घालून सहभागी झाले होते.
या वेळी आमदार नितेश राणे म्हणाले की, आज हिंदूंनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे; कारण येणारा काळ हा हिंदूंवर संकटांचा असेल, हा आक्रोश नसून ही हिंदूंची गर्जना आहे. धर्मांतराच्या विरोधात लढणे, हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. गाय ही आमची माता असून आम्ही गायीची कत्तल होऊ देणार नाही आणि लोहगडावरील अनधिकृत बांधकामाविषयीही प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे.
श्री सुनील महाराज शास्त्री यांनी सांगितले की, भारताला हिंदु राष्ट्र करायचे असेल, तर आसुरी शक्ती आणि धर्मांतरासारख्या गोष्टी यांविरोधात लढले पाहिजे. सर्व हिंदूंनी हातात हात घेऊन लढायला हवे. वतननगर येथील श्री संतोषीमाता मंदिरापासून या मोर्च्याला प्रारंभ झाला. मोर्च्यात ‘राम कृष्ण हरी’, ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, असा जयघोष करण्यात येत होता. मोर्च्यामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता. तसेच विविध पक्षांतील नेत्यांनी या वेळी सहकार्य केले. मावळमधील आणि विशेषतः तळेगावमधील सर्व पक्ष, संघटना यांनी मोर्च्यामध्ये एकत्रित येत आपसांतील मतभेद बाजूला ठेवून सहभागी झाल्याचे दिसून आले.