समर्थ रामदासस्वामी यांची कालातीत शिकवण !
आज १५ फेब्रुवारी २०२३ (माघ कृष्ण नवमी) या दिवशी ‘रामदास नवमी’ आहे. त्या निमित्ताने…
‘हे कलियुग आहे. गेल्या दोन दशकांत विज्ञानाने उंच भरारी घेतली आहे. त्यामुळे मानवाच्या भौतिक जीवनात आमूलाग्र पालट घडून आला आहे. या दोन दशकांपूर्वीच्या अनेक गोष्टी आज कालबाह्य झाल्या आहेत. भौतिक विकासही वेगाने होत आहे. ‘धरली विज्ञानाची कास म्हणून साधला विकास’, हा आता सिद्धांत झाला आहे. असे असले, तरी समर्थ रामदासस्वामी यांचे संपूर्ण वाङ्मय कालबाह्य झालेले नाही. विज्ञानाने प्रगती केली असली आणि मानवाचे भौतिक जीवन आमूलाग्र पालटलेले असले, तरीसुद्धा मानवाची मानसिकता पालटलेली नाही. आजही समाजामध्ये विकृत मनोवृत्तीची माणसे आढळतात. भौतिक विकास झाला; पण मनोविकास, बौद्धिक विकास आणि भावनिक विकास झाला, असे म्हणता येत नाही.
१. विज्ञानात प्रगती झाली, तरी मानवाची पाशवी वृत्ती तसूभरही उणावली नाही !
पाषाण युगातील माणूस दगडाने हत्या करत होता. आता माणूस आधुनिक शस्त्रांचा वापर करून हत्या करतो, म्हणजे शस्त्र पालटले; पण हत्या करण्याची प्रवृत्ती तशीच राहिली. चोर्या, बलात्कार, फसवाफसवी होतच आहे; म्हणूनच समर्थ रामदासस्वामी रचित मनाचे श्लोक आजही उपयुक्त आहेत. तसे ते भविष्यातही उपयुक्तच असतील, यात शंका नाही.
विज्ञानात प्रगती झाली, तरी मानवाची पाशवी वृत्ती तसूभरही उणावली नाही. हे लक्षात घेऊनच प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणाले, ‘‘Release of power locked in an atom has changed everything in this world, except our ways of thought and hence we are drifting to an unexampled catastrophe.’’ (अणूमधील बंदिस्त असलेली ऊर्जा विज्ञानाने मुक्त केली. त्यामुळे सारे जग पालटून गेले; पण तसा पालट आपल्या म्हणजे मानवाच्या विचारपद्धतीत मात्र झाला नाही; म्हणून हे सारे जग अभूतपूर्व अशा विनाशाच्या गर्तेत कोसळण्यासाठी पुढे सरकत चालले आहे.)
२. विज्ञान आणि अध्यात्म यांचे कार्यक्षेत्र भिन्न असल्याने त्यांच्यात वाद होण्याची कोणतीही शक्यता नाही !
आजचा समाज अधिक चोखंदळ झाला आहे. विज्ञानाधिष्ठित बुद्धी आणि तर्क यांच्या निकषावर सत्य पडताळून पहाण्यासाठी विज्ञानयुगातील माणूस धडपडतो आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. माणसाने शांतपणे विचार केला आणि पूर्वग्रहदूषित विचार टाकून दिले, तर दैनंदिन जीवनासाठी प्रेरणा देणारे ग्रंथ म्हणून आध्यात्मिक ग्रंथांकडे सहजपणे पहाता येईल आणि त्यांचा स्वीकारही करता येईल. अध्यात्मशास्त्राला विज्ञानाचे वावडे नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतात, ‘‘Science without religion is lame and religion without science is blind.’’ (धर्मावाचून विज्ञान पांगळे आहे आणि विज्ञानावाचून धर्म अंध आहे.) हिंदूंच्या आध्यात्मिक ग्रंथांत आयुर्वेद आणि वैदिक गणिताचाही समावेश होतो, त्याचबरोबर खगोलशास्त्रही येते. माणसाला आपला विनाश घडवून द्यायचा नसेल, तर सद्विचारांची कास त्याला धरावीच लागेल. त्यासाठी अध्यात्माचा प्रचार नितांत आवश्यक आहे. आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन करण्याची गोडी समाजामध्ये निर्माण करण्यासाठी उपासकाने कटीबद्ध झाले पाहिजे. विज्ञान जाणून घेण्यासाठी नवीन ग्रंथ अभ्यासावा, तर अध्यात्मासाठी जुन्या ग्रंथांचे परिशीलन करावे. या दृष्टीने विचार करता भगवद्गीता आणि संत वाङ्मय माणसाच्या हाताशी नित्य असले पाहिजेत, तरच मानवाला आपल्या जीवनाचा नेमका हेतू काय आहे, ते कळणे सुलभ जाईल.
आजचा तरुण व्यसनाधीन होत चालला आहे. आज तरुणाला जुगार खेळण्यापासून परावृत्त करण्याऐवजी जुगार खेळण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. अनेक तरुण आत्महत्या करत आहेत. आजच्या मानवाची आकलन शक्ती उणावली आहे कि काय ? असाच प्रश्न निर्माण व्हावा, अशी परिस्थिती आहे. अनेकांना निद्रानाशासारख्या व्याधीने त्रस्त केले आहे. अनेकांना शांत झोप लागत नाही, या समस्येने ग्रासले आहे. वास्तविक पहाता भौतिकदृष्ट्या समृद्ध जीवन जगण्यात सुख नाही. त्याचप्रमाणे विज्ञानवाद म्हणजे नास्तिकता नव्हे. अनेक जण विज्ञानवादाच्या नावाखाली नास्तिकतेचा प्रसार करतात. विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात वाद नाही. भौतिक सृष्टीच्या सुसंगत ज्ञानाला विज्ञान म्हणतात. याचा अर्थ विज्ञानाचे कार्यक्षेत्र दृश्य सृष्टी आहे. अदृश्य सृष्टीच्या सुसंगत ज्ञानाला अध्यात्म म्हणतात. याचा अर्थ अध्यात्माचे कार्यक्षेत्र अदृश्य सृष्टी आहे, म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म यांत अंतर आहे, हे विज्ञान अन् अध्यात्म यांच्या व्याख्यांचा आपण विचार केला की, सहज ध्यानात येते. अध्यात्म आणि विज्ञान यांच्यात असलेल्या संबंधाबाबत जो गैरसमज आपल्या मनात निर्माण झाला आहे, तो सहज दूर होईल. वर उल्लेख केल्याप्रमाणे विज्ञान आणि अध्यात्म यांचे कार्यक्षेत्र भिन्न आहे. त्यामुळे त्यांच्यात वाद निर्माण होण्याची कोणतीही शक्यता नाही.
३. कठोर तप करून आत्मसाक्षात्कार झालेले समर्थ रामदासस्वामी आणि संत तुकाराम महाराज !
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी एकांतात बसून चिंतन, मनन केले. त्यात ते तल्लीन होऊन गेले. समर्थ रामदासस्वामींनी सुद्धा टाकळीला १२ वर्षे कठोर तपश्चर्या केली. कमरेपासून खालचा भाग पाण्यात बुडेल एवढ्या पाण्यात उभे राहून सूर्योदयापासून मध्यान्नापर्यंत त्यांनी जप केला. अशा प्रकारे त्यांनी १२ वर्षे अखंड जप केला. दुपारी विविध आध्यात्मिक ग्रंथांचे परिशीलन केले. संध्याकाळी अध्यात्म श्रवणासाठी राममंदिरात जाण्याचा त्यांचा परिपाठ होता. अशा प्रकारे तप करून त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. अशा आत्मसाक्षात्कारी संतांची वाणी प्रासादिक असते. त्यांना अहंकाराचा स्पर्श झालेला नसतो. विश्वातील अनेक रहस्ये त्यांना सहजतेने उकलता आली आहेत.
संत तुकाराम महाराजांनी सुद्धा तप केले. त्या तपोबाळावर ते म्हणतात, ‘वेदाचा तो अर्थ आम्हांसी च ठावा । येरांनी वाहावा भार माथां ॥’ (तुकाराम गाथा, अभंग २२५६, ओवी १) ‘संत तुकाराम महाराज म्हणतात की, वेदाचा खरा अर्थ, खरे रहस्य आम्हाला ठाऊक आहे. अन्य अभ्यासक केवळ त्या ज्ञानाचा व्यर्थ भार आपल्या माथी वाहतात.’ या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी केलेल्या तपश्चर्येची ते साक्ष देतात.
रामदासस्वामींनी सुद्धा अनेक ग्रंथांचा अभ्यास केला होता. त्याचा उल्लेख आपल्याला दासबोधात आढळतो.
नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती ।
आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥
– दासबोध, दशक १, समास १, ओवी १५
अर्थ : (दासबोध) हा ग्रंथ उपनिषदे, वेदांत, श्रुती तसेच अन्यही अनेक ग्रंथांच्या आधारे आणि मुख्यतः शास्त्रप्रचीती अन् आत्मप्रचीतीच्या आधारे लिहिला गेला आहे.
यात समर्थ रामदासस्वामी स्पष्टपणे सांगतात की, दासबोध हा ग्रंथ एका साक्षात्कारी महापुरुषाचा ग्रंथ आहे. मानवी जीवनाची आध्यात्मिक आणि व्यावहारिक अशी दोन अंगे आहेत. हे लक्षात घेऊनच दासबोधामधून रामदासस्वामी यांनी आध्यात्मिक आणि व्यावहारिक मार्गदर्शन केले आहे. निद्रा, आळस, दूषित मन हे सारे दुर्गुण आहेत. कोणताही दुर्गुण हा व्यावहारिक जीवनात आणि आध्यात्मिक जीवनात घातक ठरतो. दोन्ही क्षेत्रांत सावधता बाळगावी लागते. विज्ञानात प्रयोग, निरीक्षण आणि अनुमान या ३ पायर्या महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर विज्ञानाची चौथी पायरी म्हणजे विज्ञानाने जे सत्य शोधून काढले आहे, ते इतरांना समजेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणे.
त्याचप्रमाणे अध्यात्मात सुद्धा प्रयत्न, प्रत्यय आणि प्रबोध अशा ३ पायर्या आहेत. प्रपंच असो कि परमार्थ असो ? ते अनुभवावाचून दोन्ही व्यर्थ आहे. दोन्ही क्षेत्रांत प्रयत्नपूर्वक ज्ञान संपादन करावे लागते. ते संपादन केलेले ज्ञान जेवढे आपल्याला ठाऊक आहे ते हळूहळू इतरांना सांगावे. त्या ज्ञानाने सर्वांना शहाणे करून सोडावे.
४. शरिरासह भौतिक आणि आध्यात्मिक जीवनात स्वच्छतेला महत्त्व देणारे समर्थ रामदासस्वामी !
अशा प्रकारे वैज्ञानिक पद्धतीची परिसीमा समर्थांनी गाठली; म्हणूनच त्यांची शिकवण कधीही कालबाह्य ठरणार नाही. समर्थांना स्वच्छता आणि सौंदर्य यांची विशेष आवड होती. लोकांनी सुद्धा स्वच्छता पाळायला हवी. शारीरिक स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. भौतिक आणि आध्यात्मिक जीवनातही स्वच्छता अन् शुचिर्भूतता यांना महत्त्व देण्यात आले आहे. ‘जो अस्वच्छ आहे, तो मूर्ख आहे’, असे रामदासस्वामी स्पष्टपणे सांगतात. ‘प्रत्येकाची वाणी शुद्ध आणि स्पष्ट असली पाहिजे. शारीरिक सौंदर्याला, शुद्धतेला जसे महत्त्व आहे, तसे मन, बुद्धी, आचार आणि विचार हे सुंदर अन् शुद्ध असले पाहिजेत’, असा आग्रह समर्थांनी धरला आहे.
५. समर्थांनी सांगितलेली आणि कधीही कालबाह्य न होणारी ज्ञानलालसा अन् परोपकारी वृत्ती !
माणसाने विषयसुखाच्या आनंदात राहू नये. मानवजन्म हा अत्यंत दुर्लभ आहे. आपल्याला मिळालेला मानवजन्म उपभोगात आणि विषय वासनेमध्ये व्यर्थ दवडायचा नाही. हे सांगताना समर्थ लिहितात,
तुला ही तनु मानवी प्राप्त झाली ।
बहूजन्मपुण्यें फळालागिं आली ।
तिला तूं कसा गोंविसि विषयीं रे ।
हरे राम हा मंत्र सोपा जपा रे ॥
– राममंत्राचे श्लोक, श्लोक ३
अर्थ : हा मानवाचा देह तुला अनेक जन्मांत केलेल्या पुण्यामुळे प्राप्त झाला आहे. म्हणून हा मानवी देह विषयांमध्ये अडकवू नकोस. त्यापेक्षा रामनामाचा जप करणे अत्यंत सोपे आहे. या जपामुळे तुला लाभच होईल.
आपल्याला प्राप्त झालेला हा मानवाचा देह सत्कार्यासाठी झिजवला पाहिजे. या देहाचा उपयोग ज्ञान संपादनासाठी करायचा. प्राप्त केलेले ज्ञान लोकांपर्यंत पोचवण्यासाठी अपार कष्ट घेतले पाहिजेत. तेच आपले कर्तव्य आहे. हा मानवी देह नष्ट होणार आहे. तो कधी नष्ट होईल, हे आपल्याला ठाऊक नाही; म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण परोपकारासाठी, ज्ञानार्जनासाठी वेचायचा आहे. त्यामुळे आपला देह नष्ट झाला, तरी आपण केलेल्या कार्याची ओळख मागे शिल्लक रहाणार आहे. असा उपदेश करून समर्थ रामदासस्वामी सर्वसामान्य जनतेच्या मनात ज्ञानलालसा निर्माण करतात आणि ‘परोपकाराची सवय सर्वांनी स्वतःला लावावी’, अशी शिकवण देतात. ज्ञानलालसा आणि परोपकारी वृत्ती ही कधी कालबाह्य होणार नाही.
कष्टावाचून कुणालाच काहीही मिळत नाही. माणसाने ऐतखाऊ असू नये. दुसर्याच्या ज्ञानावर, कष्टावर, धनावर आणि जिवावर जगणे हे पाप आहे; म्हणून स्वतः कष्ट करून ज्ञान आणि धन संपादन करावे. हे संपादन करतांना प्रामाणिकपणा ठेवावा, लबाडी करू नये. असे सांगून कष्ट सहन करण्याची महती समर्थांनी गायली आहे. ‘प्रयत्नाला देव माना’, हे सांगतांना ‘यत्न तोची देव जाणा ।’, असे समर्थ सांगतात.
६. देव, देश आणि धर्म यांविषयी समर्थांची शिकवण !
समर्थांनी राष्ट्रभक्ती श्रष्ठ मानली आहे. ‘देव, देश आणि धर्म या ३ गोष्टींसाठी माणसाने आपले प्राण अर्पण करावेत’, अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. त्याला अनुसरूनच समर्थ म्हणतात,
देवद्रोही तितुके कुत्ते । मारूनि घालावे परते ।
देवदास पावती फत्ते । यदर्थीं संशय नाहीं ॥
अर्थ : देशाशी द्रोह करणारा पशू आहे. त्याला हुसकून लावावा. देवाचा दासच या जगात यशस्वी होतो, यात शंका नाही.
आपल्या धर्मावर जर आक्रमण झाले, तर धर्म वाचवण्यासाठी काय करावे ? याचे उत्तर देतांना समर्थ म्हणतात,
देव मस्तकीं धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बडवावा की बुडवावा । धर्मसंस्थापनेसाठीं ॥
अर्थ : धर्मरक्षणासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी देवाला श्रेष्ठ मानून त्याचा जयजयकार करावा अन् संपूर्ण प्रांत पिंजून काढावा.
देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी शक्तीमान असणे नितांत आवश्यक आहे. माणूस सामर्थ्यसंपन्न असेल, तरच तो स्वतःचे, तसेच देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करू शकतो. या शक्तीला युक्तीची जोड मिळाली पाहिजे. केवळ शक्ती किंवा केवळ युक्ती पुरेशी नाही. शक्ती आणि युक्ती यांची जोड मिळाल्याविना विजय संपादन करता येत नाही. अशा प्रकारची समर्थांनी दिलेली शिकवण ही कालबाह्य ठरू शकत नाही.
म्हणूनच या दासनवमीच्या निमित्ताने आपण संत वाङ्मय आणि गीता यांचा अभ्यास करण्याचा संकल्प करूया. हीच समर्थांची केलेली षोडशोपचारे पूजा ठरेल. समर्थ आपल्याला तशी प्रेरणा देवो, ही त्यांच्या चरणी प्रार्थना आणि कामना !
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली (७.२.२०२३)