प्रेमभावाने सर्वांशी जवळीक साधणारी आणि तळमळीने सेवा करणारी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. श्रावणी पेठकर (वय २१ वर्षे) !
माघ कृष्ण नवमी (१५.२.२०२३) या दिवशी कु. श्रावणी पेठकर हिचा २१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त कु. एकता नखाते हिला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहोत.
कु. श्रावणी पेठकर हिला २१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
‘कु. श्रावणी १२ वर्षांची असतांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील आश्रमात आली. तेव्हापासून मी तिला ओळखते. एवढ्या लहान वयात ती अतिशय समजूतदार आहे. तिच्यात अनेक दैवी गुण आहेत. गेल्या २ वर्षांत तिच्या समवेत खोलीत रहात असतांना तिच्यातील दैवी गुण मला जवळून अनुभवायला मिळाले. ते मी कृतज्ञतेने मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
१. प्रेमभाव
१ अ. सर्वांशी प्रेमाने बोलणे : श्रावणीमधील सर्वांत मोठा गुण म्हणजे प्रेमभाव ! आश्रमातील लहान-मोठ्या सर्वांशी तिची जवळीक आहे. ती प्रत्येक साधकाची अगदी सहजपणे आणि प्रेमाने विचारपूस करते. ‘बोलण्यासाठी ओळख असायलाच हवी’, असे तिच्याकडे बघून जाणवत नाही. तिच्यातील प्रेमभाव केवळ तिच्या बोलण्यातच नाही, तर तिचे डोळे आणि स्पर्श यांतूनही जाणवतो. तिचा चेहरा नेहमी हसतमुख असतो.
१ आ. प्रेमाने जवळीक साधणे : आमच्या समवेत सेवा करणार्या एक काकू सकाळी लवकर उठतात आणि दुपारी विश्रांती घेत नाहीत. तेव्हा ती अनेकदा त्यांना ‘तुमची पाठ दुखेल. थोडी विश्रांती घ्या’, असे सांगून त्यांच्या पाठीवर हात फिरवते आणि त्यांची पाठ चेपून देते.
१ इ. आबालवृद्धांशी मैत्री असणे : बालसाधकांची ती ‘प्रिय ताई’ आहे. तिची सर्व बालसाधकांशी मैत्री आहे. ती त्यांच्याशी लहान होऊन खेळते आणि बोलते. बालसाधकांप्रमाणे तिची त्यांच्या पालकांशीही तेवढीच जवळीक आहे. आश्रमातील तिच्या मैत्रिणींशी ती जेवढ्या सहजतेने बोलते, तेवढ्याच सहजतेने ती त्यांच्या पालकांशीही बोलते. ‘मैत्री करण्यासाठी वयाचे बंधन नसते’, हे मला तिच्याकडून शिकायला मिळाले.
२. चुका स्वीकारण्याची आणि शिकण्याची वृत्ती
२ अ. चुकांविषयी खंत वाटणे : श्रावणीकडून खोलीत काही चुका झाल्यास मी तिला सांगत असे. तिच्याकडून त्या संदर्भात पालट न झाल्यास मी तिला त्या पुनःपुन्हा सांगायचे. तेव्हा तिला माझा राग कधीच आला नाही किंवा ‘मी सांगितलेले ती स्वीकारत नाही’, असे मला तिच्याकडे बघून कधी जाणवले नाही. तिच्याकडून झालेल्या चुकांविषयी तिला खंत वाटते आणि ती लगेच क्षमाही मागते.
२ आ. शिकण्याची वृत्ती : एकदा तिने मला सांगितले, ‘‘ताई, तू प्रत्येक वेळी माझ्या चुका सांगतेस; म्हणून मला माझ्यातील स्वभावदोषांची जाणीव होते. तू मला नेहमी चुका सांगत रहा. तू माझ्यावर रागवून चुका सांगण्याचे थांबवू नकोस.’’ तिचे हे बोलणे ऐकून ‘शिकण्याची वृत्ती कशी असावी ? समोरील व्यक्ती आपल्याला वारंवार चुका सांगत असेल, तर तिच्याशी कसे बोलावे ? प्रेमाने तिचे मन कसे जिंकावे ?’, हे देवानेच मला शिकवले.
३. इतरांचा विचार करणे
अ. कुठेही साहाय्याची आवश्यकता असल्यास श्रावणी तिला जमेल तेवढे साहाय्य मनापासून करण्याचा प्रयत्न करते. ‘इतरांना आधार देणे; उत्साही आणि आनंदी करणे’, हेही तिचे एकप्रकारे साहाय्य करणेच असते. ‘तिच्याकडे व्यक्तीची निराशा घालवण्याची असामान्य कला आहे’, असे मला वाटते.
आ. काही वेळा सेवेमुळे मला रात्री झोपायला उशीर व्हायचा. तेव्हा ती माझ्या समवेत थांबून मला साहाय्य करायची.
इ. ‘स्वतःमुळे इतरांना त्रास होऊ नये’, याची ती काळजी घेते.
४. मनमोकळेपणा
तिला कुणी काही बोलल्यास ती ते बोलणे मनात धरून ठेवत नाही. ती पुन्हा स्वतःहून लगेच त्या व्यक्तीशी बोलण्यास जाते. श्रावणीला काही स्वीकारता येत नसल्यास किंवा मनात पूर्वग्रहाचे प्रसंग निर्माण झाल्यास ती लगेच बोलून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते.
५. सेवेची तळमळ
सेवेसाठी साधकसंख्या अल्प असतांना ती अनेक सेवा झोकून देऊन करते. तिला अनेक शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास आहेत, तरीही ती देहभान विसरून सेवा करते.
६. कृतज्ञताभाव
तिला कुणी साहाय्य केलेले असल्यास ती ते कधी विसरत नाही. तिच्या मनात त्या साधकांविषयी कृतज्ञताभाव असतो. तिच्या कृतीतून तो व्यक्तही होत असल्याचे मला जाणवते.
७. अनेक संत तिची आठवण काढतात. ते तिला खाऊ पाठवतात. तिची संतांवर संपूर्ण श्रद्धा आहे.
तिच्यातील ‘प्रेमभाव’ या गुणामुळेच तिच्यात ‘इतरांचा विचार करणे, साहाय्य करणे, सर्वांशी जुळवून घेणे, व्यापकत्व, नेतृत्व, अहं अल्प असणे, न्यूनपणा घेणे’, हे समष्टी गुण आहेत.
‘हे गुरुमाऊली, ‘तुमच्या कृपेमुळे मला श्रावणीच्या समवेत रहाण्याची संधी मिळाली. तिच्यातील हे गुण दाखवून तुम्ही मला शिकण्याची संधी दिली. मला केवळ सहसाधिका नाही, तर आध्यात्मिक मैत्रीण मिळाली’, यासाठी मी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘हे गुरुदेवा, ‘श्रावणीमधील हे गुण मला आत्मसात करता येऊ देत. तुम्ही माझ्यासाठी दिलेल्या या संधीचा मला लाभ करून घेता येऊ दे’, हीच शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– कु. एकता नखाते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.८.२०२१)