बारामती येथील काकांनी राज्यात भ्रष्टाचाराचे अड्डे बनवून ठेवले आहेत ! – आमदार प्रशांत बंब
संभाजीनगर – गंगापूर साखर कारखाना निवडणुकीत भाजपचे आमदार प्रशांत बंब यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला असून शिवसेना (ठाकरे) गटाने संपूर्ण २० जागांवर विजय मिळवला आहे. या पराभवाविषयी आमदार प्रशांत बंब म्हणाले की, बारामतीच्या काकांनी (खासदार शरद पवार यांनी) राज्यात भ्रष्टाचाराचे अड्डे बनवून ठेवले असून त्यांच्या अनुयायांच्या खोटेपणाला आणि त्यांनी पसरवलेल्या अफवांना शेतकरी, सभासद अन् नागरिक बळी पडत आहेत, असा आरोप त्यांनी १४ फेब्रुवारी या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केला.
बंब पुढे म्हणाले की, गंगापूर साखर कारखान्याच्या निवडणुकीत १ सहस्र मतांच्या भेदाने आमच्या पॅनलचा पराभव झाला आहे. तरीही सहस्रो मतदारांनी विश्वास ठेवल्याविषयी मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्या राज्यात काही राजकारणी लोकांचा महिमा गेल्या ५५ वर्षांपासून चालू आहे. त्याचे प्रमुख सूत्रधार बारामती येथील काका आहेत. ते आणि त्यांचे अनुयायी मराठवाड्यात सहकारी संस्था आणि बँका यांच्यावर पगडा ठेवून भ्रष्टाचाराचे अड्डे बनवून ठेवले आहेत. त्यांच्याकडून प्रचंड लूट करण्यात येते. तसाच प्रयोग गंगापूर कारखाना निवडणुकीत झाला आहे.