‘आज्ञापालन आणि निरीक्षणक्षमता’, हे गुण अंगी असणारे अन् कृतज्ञताभावात रहाणारे सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ५ वर्षे) !
डॉ. दीपक जोशी (निसर्गाेपचार तज्ञ) मंगळुरू येथे साधकांसाठी उपचार करण्यासाठी आले होते. तेव्हा पू. भार्गवराम भरत प्रभु (वय ५ वर्षे) यांची त्यांच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. ‘डॉ. दीपक जोशी मला रागावले नसून त्यांनी मला भोजन नीट करायला हवे !’, असे समजावून सांगितले’, असे वडिलांना वस्तूनिष्ठपणे सांगणे
पू. भार्गवराम यांना भूक लागत नसल्यामुळे ते नीट जेवत नव्हते. ही अडचण मी डॉ. दीपक जोशी यांना सांगितली. त्यांनी पू. भार्गवराम यांना त्याविषयी थोडे गांभीर्याने सांगितले आणि गंभीर होऊन काही प्रश्नही विचारले.
हे सर्व झाल्यानंतर पू. भार्गवराम यांच्या वडिलांनी (श्री. भरत प्रभु यांनी) विचारले, ‘‘काय झाले ?’’ त्यावर मी सांगितले, ‘‘डॉ. दीपक जोशी पू. भार्गवराम यांना रागावले. ‘पू. भार्गवराम यांनी भोजनात सर्व पदार्थ व्यवस्थित घेतले पाहिजेत’, असे त्यांनी सांगितले आहे.’’
त्यावर पू. भार्गवराम यांनी त्वरित सांगितले, ‘‘ते मला रागावले नाहीत, तर त्यांनी मला चांगल्या प्रकारे समजावून सांगितले की, जेवणात सर्व भाज्या खाल्ल्या पाहिजेत आणि भोजन नीट केले पाहिजे.’’
२. आज्ञापालन करणे
त्यानंतर पू. भार्गवराम यांनी आठवणीने त्या सर्व सूत्रांचे पालन केले. ‘डॉक्टरांनी सांगितले आहे ना, भाज्या खाल्ल्या पाहिजेत ! मला थोडी भाजी वाढ’, असे सांगून त्यांनी भाज्या खाण्याचे प्रयत्न चालू केले.
३. पू. भार्गवराम यांनी डॉ. दीपक जोशी यांना पापी देऊन त्यांनी केलेल्या प्रीतीमय सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करणे
त्यानंतर २ – ३ दिवस पू. भार्गवराम यांनी डॉ. जोशी यांना आश्रमातील वेगवेगळ्या साधकांसाठी उपचार करत असतांना त्यांचे निरीक्षण केले. ज्या वेळी डॉ. दीपक जोशी परत जाण्यासाठी निघाले, त्या वेळी पू. भार्गवराम यांनी त्यांच्या दोन्ही गालांवर पापी दिली. खरेतर इतर कुणीही विचारले, तरीही पू. भार्गवराम स्वतःहून पापी देत नाहीत.
त्यानंतर मी पू. भार्गवराम यांना त्याचे कारण विचारले. तेव्हा पू. भार्गवराम यांनी मला सांगितले, ‘‘ते रामनाथीहून आलेले डॉक्टर होते ना, ते कसे हसत हसत उपचार करतात ! ते स्वतः हसतात आणि इतर साधकांनाही हसवतात. किती चांगले आहेत ना ते ! ते सर्व साधकांना बरे करण्यासाठी आले आहेत.’’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘डॉ. दीपक जोशी यांनी केलेल्या प्रीतीमय सेवेप्रती पू. भार्गवराम यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता, म्हणजे पू. भार्गवराम यांनी त्यांना दिलेली पापी होती.’
‘पू. भार्गवराम यांनी डॉ. दीपक जोशी यांच्याप्रती दाखवलेली प्रीती आणि डॉ. दीपक जोशी यांनी साधकांवर केलेली प्रीती’, यांमुळे गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) साधकांप्रती संत अन् साधक यांच्या माध्यमातून किती आपुलकी दाखवतात !’, हे माझ्या लक्षात आले. अशा प्राणप्रिय गुरुमाऊलींप्रती मंगळुरू येथील सर्व साधकांच्या वतीने मी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. भवानी भरत प्रभु (पू. भार्गवराम प्रभु यांची आई), मंगळुरू, कर्नाटक. (१.१.२०२३)