हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती
उसगाव, फोंडा येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा
फोंडा, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – जगभरात १५२ हून अधिक ‘ख्रिस्ती राष्ट्रे’, ५७ हून अधिक ‘इस्लामी राष्ट्रे’, १२ ‘बौद्ध राष्ट्रे’ आहेत; मात्र १०० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या हिंदूंचे या भूमंडळावर एकही ‘हिंदु राष्ट्र’ नाही. ‘हिंदु राष्ट्र’ म्हणजे केवळ हिंदूंचा देश एवढाच संकुचित विचार नाही, तर येथील लोकांची संस्कृती, सभ्यता, परंपरा, इतिहास, धर्म, साहित्य, कला, राजनीती ही सूत्रेही अंतर्गत आहेत. हिंदु राष्ट्र ही केवळ धार्मिक संकल्पना आहे, असे नाही, तर हिंदु राष्ट्र ही एक आदर्श आणि प्रगल्भ समाजव्यवस्था आणि राज्यव्यवस्था आहे. भ्रष्टाचारमुक्तता, प्रामाणिकता, कार्यक्षम प्रशासन, जलद न्याय ही आदर्श समाजव्यवस्थेची लक्षणे आहेत. अशा हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आपण कटीबद्ध होऊया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी केले. पाचवाडा, उसगाव येथील श्री आदीनाथ मंडपात आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत श्री. गोविंद चोडणकर बोलत होते. या वेळी ‘रणरागिणी’च्या सौ. राजश्री गडेकर यांचीही उपस्थिती होती.
श्री. गोविंद चोडणकर यांनी पुढे त्यांच्या मार्गदर्शनात हिंदु राष्ट्राची मागणी राज्यघटनाविरोधी कशी नाही, हिंदूंवर होणारे आघात संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता, विदेशातील हिंदूंची दु:स्थिती, धर्मांतर आदी सूत्रांवर प्रकाश टाकून हिंदूंमध्ये धर्मतेज जागवले. ‘रणरागिणी’च्या सौ. राजश्री गडेकर यांनी ‘लव्ह जिहाद’ आदींच्या माध्यमातून हिंदूंवर होणारे आघात रोखण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेण्याचे महत्त्व प्रतिपादित केले. सभेच्या शेवटी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी उपस्थितांनी शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुमेधा नाईक यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. श्रीपाद अरगडे यांनी केले. सभेनंतर झालेल्या चर्चासत्रात उपस्थित राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.