‘ॐ’ आणि ‘अल्ला’ एकच आहेत, तर काबा मशिदीवर ॐ लिहावे !

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांचे मौलाना अर्शद मदनी यांना आव्हान !

नवी देहली – जमियत उलेमा-ए-हिंदचे नेते मौलाना (इस्लामचा अभ्यासक) अर्शद मदनी यांनी येथील सद्भावना संमेलनात बोलतांना ‘ॐ’ आणि ‘अल्ला’ एकच असल्याचे विधान केले होते. त्याला तेथे उपस्थित आचार्य लोकेश मुनी यांनी विरोध करत अन्य धर्मियांच्या संतांसहित मंचाचा त्याग केला होता.

या विधानाविषयी ज्योतिष पीठाचे  शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांनी म्हटले की, जर अर्शद मदनी यांचा दावा आहे की, ‘ॐ’ आणि ‘अल्ला’ एकच आहे, तर त्यांनी याला प्रमाणित करण्यासाठी त्यांच्या मशिदींवर ‘ॐ’ लिहिले पाहिजे. याचा प्रारंभ मक्केतील काबा मशिदीपासून केला पाहिजे. तेथे सोन्याच्या वर्खाचा वापर करून ॐ लिहिले पाहिजे. यानंतर देहलीतील जामा मशिदीवर तसे लिहिले पाहिजे. जेथे जेथे ‘अल्ला’ लिहिण्यात आले आहे तेथे ‘ॐ’ लिहिले पाहिजे; कारण त्यांच्या दृष्टीने दोन्ही एकच आहेत.