देवरुख येथील तरुणाची २ लाख रुपयांची ‘ऑनलाईन’ फसवणूक !
‘ऑनलाईन’ पद्धतीने वाढती फसवणूक हे पोलिसांसमोर आव्हान !
रत्नागिरी – ‘ऑनलाईन’ नोकरी लावून देतो, असे सांगून देवरुखातील एका तरुणाची २ लाख १४ सहस्र ५८० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही रक्कम तरुणाने आई-वडिलांच्या बँक खात्यातून ‘गूगल पे’द्वारे भरली होती. हा प्रकार ७ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही फसवणूक झाल्याची तक्रार अलोक प्रमोद नलावडे याने केली आहे.
अलोक नलावडे हा पदवीधर असून त्याच्या भ्रमणभाषवरील टेलिग्राम अॅपवर ‘गायत्री’ नावाचे ‘प्रोफाईल’ असलेल्या व्यक्तीने संदेश पाठवला. त्या संदेशामध्ये ‘ऑनलाईन’ नोकरी देण्याचे सांगून सिनेस्तान फिल्म कंपनी प्रा.लि. या आस्थापनाच्या चित्रपटांना ‘रेटिंग’ देण्यास आस्थापनाने ‘अॅप डाऊनलोड’ करण्यास सांगितले.
त्यानंतर पैसे मिळण्यासाठी तरुणाला ‘टास्क’ पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी रक्कम भरण्यास सांगितले. ‘टास्क’ पूर्ण केल्यानंतर तरुणाला ६ लाख १७ सहस्र ४९१ रुपये मिळतील, असे सांगितले. त्या वेळी अलोकने ही रक्कम भरणे शक्य नसल्याचे सांगून भरलेली रक्कम परत करण्यास सांगितले. ही रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यावर स्वत:ची फसवणूक झाल्याचे लक्षात आले.