राज्याबाहेरील विद्यापिठाची पदवी पदोन्नतीकरता ग्राह्य धरली जाणार नाही ! – शेखर सिंह, महापालिका आयुक्त, पिंपरी-चिंचवड
पिंपरी (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी हे राज्याबाहेरील विद्यापीठ अन् नामवंत शैक्षणिक संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी, पदविका घेतात. त्या आधारावर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी पदोन्नतीचा आग्रह धरतात; मात्र यापुढे पदोन्नतीकरता राज्याबाहेरील विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थेची पदवी आणि पदविका ग्राह्य धरली जाणार नाही, असा निर्णय महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे बोगस पदवी आणि पदविका धारण करणारे अधिकारी अन् कर्मचारी यांना चाप बसणार आहे.
महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी हे अभियांत्रिकी, तंत्रशास्त्र, बी.टेक., डी.सी.ई., एम्.ई., एम्.टेक. आणि अन्य स्वरूपाचे दुरस्थ तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाद्वारे राज्याबाहेरील विद्यापिठांची पदवी घेतात. याविषयी विविध प्रकारच्या तक्रारी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागास प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार वरील निर्णय घेण्यात आल्याचे समजते.