नाशिक येथे महिलेचे बळजोरीने धर्मांतर ! – भाजपच्‍या नेत्‍या चित्रा वाघ

  • अनधिकृत प्रार्थनास्‍थळांमध्‍ये धर्मांतराचे काम चालू ! 

  • पोलिसांनी ४ आरोपींना कह्यात घेतल्‍याचा दावा !

नाशिक, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – येथे एका महिलेचे बळजोरीने धर्मांतर करण्‍यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे, तर १ आरोपी पसार आहे, अशी माहिती भाजपच्‍या महिला प्रदेशाध्‍यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी येथे पत्रकार परिषदेत दिली. जिल्‍ह्यातील सिन्‍नर येथील एका महिलेसमवेत हा प्रकार घडला होता, तसेच या प्रकरणात ५ आरोपी आहेत. यात पाश्‍टर हा मुख्‍य आरोपी आहे, असेही त्‍यांनी सांगितले. ‘माझे दैव बलवत्तर म्‍हणून मी वाचले; पण इतर कुठल्‍याही महिलेचा बळी जाऊ नये’, असे सांगून पीडिता तिच्‍या कुटुंबियांसमवेत माध्‍यमांसमोर आली.

सौ. चित्रा वाघ म्‍हणाल्‍या की, २ महिलांनी ‘काम देतो’ म्‍हणून पीडितेला पाश्‍टर आणि इतर २ पुरुष यांच्‍या स्‍वाधीन केले होते. या तिघांनी पीडितेला १ मास डांबून ठेवत शारीरिक अत्‍याचार केले. गोमांस शिजवून ते भक्षण करण्‍यास पीडितेस बळजोरी करण्‍यात आली. एवढेच नाही, तर या पीडितेची विक्रीही करणार होते.

आरोपींनी पीडितेच्‍या पतीस मारहाण केली. पीडितेच्‍या ६ वर्षांच्‍या मुलाला डांबून ठेवले. याविषयी कुठे वाच्‍यता केल्‍यास मारून टाकण्‍याची धमकी दिली. पीडितेच्‍या नवर्‍याने मित्र आणि पोलीस यांचे साहाय्‍य घेऊन पत्नीची सुटका केली.

सौ. चित्रा वाघ म्‍हणाल्‍या की, या घटनेने पुन्‍हा एकदा बळजोरीने धर्मांतराचा विषय समोर आला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्रार्थनास्‍थळांमध्‍येही असे काम चालू आहे. देवाचे नाव वापरून तेथे दानवाचे काम चालू आहे. हा विषय केवळ नाशिकपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण राज्‍यात याचे पेव फुटले आहे.

संपादकीय भूमिका

  • लव्‍ह जिहाद आणि धर्मांतर यांच्‍या विरोधात कायदा करण्‍यासाठी राज्‍यात प्रचंड मोठे मोर्चे अन् आंदोलने होत असूनही त्‍याच्‍याविषयी कायदे करण्‍यात दिरंगाई होत आहे, हेच सत्‍य आहे !
  • बळजोरीने करण्‍यात येणार्‍या धर्मांतराच्‍या विरोधात प्रशासन कठोर कायदा केव्‍हा करणार ?