इच्छापत्र बनवणे ही काळाची आवश्यकता !
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्या व्यक्तीने काही इच्छापत्र अथवा मृत्यूपत्रसदृश काही कागदपत्रे सिद्ध केलेली नसतील, तर त्याला प्रचलित कायदे लागू होतात अन् त्या कायद्यानुसार त्याच्या संपत्तीचे वाटप केले जाते. हे सर्व टाळण्यासाठी आपण प्रत्येकाने इच्छापत्र बनवणे, ही एक काळाची आवश्यकता बनली आहे. अशा प्रकारे इच्छापत्र बनवल्याने आपण आपल्या संपत्तीचे वाटप आपल्या मर्जीप्रमाणे तर लावू शकतोच; परंतु आपल्या वारसांनाही आपल्या पश्चात होणारा त्रास आपण टाळू शकतो, ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे.
१. मालमत्तेच्या योग्य वाटपासाठी इच्छापत्र महत्त्वाचा दुवा !
आजच्या या धकाधकीच्या जीवनाचा मानवी आयुष्यावर कळत नकळत पुष्कळ मोठा परिणाम होत आहे. दैनंदिन जीवनात स्पर्धा अधिकाधिक तीव्र होत जात आहे. यामुळेच त्याचा कळत नकळत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावरही परिणाम होत आहे; म्हणूनच आपण आपले श्रम आणि कर्तृत्व यांमुळे एखादी मालमत्ता निर्माण केली, तर आपल्या पश्चात तिचे वाटप कसे करावे ? याचा अधिकारही त्या मालमत्ता निर्माण करणार्या माणसालाच असतो. हा अधिकार योग्य तर्हेने वापरण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या वयाची चाळिशी झाल्यावर इच्छापत्र बनवणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी मी मुद्दामहून ‘इच्छापत्र’ हा शब्द वापरला आहे; कारण ‘मृत्यूपत्र’ हा शब्द वापरला, तर ‘मृत्यू आपल्या दारात येऊन उभा ठाकला आहे’, अशा तर्हेचे वातावरण निर्माण होऊन संबंधित व्यक्ती आधीच स्वतःचा आत्मविश्वास गमावून बसते आणि हे टाळण्यासाठीच त्याच अर्थाचा इच्छापत्र हा शब्द येथे वापरला आहे. प्रत्येक माणूस इच्छापत्र करण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करतो. ‘मला काय धाड भरली आहे ? इतक्यात इच्छापत्र करायला मी काय म्हातारा झालो आहे का ?’, अशा प्रकारची सर्वसाधारण वृत्ती समाजामध्ये दिसून येते; पण सध्याची धकाधकीची परिस्थिती लक्षात घेता कुणाला कधी मृत्यू येईल ? हे सांगता येत नाही आणि जर काही घडले, तर त्यांनी कमावलेल्या संपत्तीचे वाटप त्यांच्या मर्जीप्रमाणे होईलच, याची खात्री देता येत नाही.
२. इच्छापत्र करणे किती महत्त्वाचे हे समजण्यासाठी घडलेले उदाहरण
याविषयी घडलेले एक उदाहरण मी मुद्दाम वाचकांच्या माहितीसाठी देत आहे. एका गरीब व्यक्तीने मोठ्या कष्टाने काम करून आणि मोठ्या धैर्याने एका शहरासारख्या गावात एक मंगल कार्यालय उभे केले. त्यासाठी त्यांनी पुष्कळ मेहनतही घेतली. त्यामुळे ते मंगल कार्यालय पुष्कळ छानपैकी चालू लागले. त्या व्यक्तीला ४ हुशार मुले होती; परंतु त्यांचे विचार वेगवेगळे होते. हे त्या गृहस्थांना जाणवू लागले, म्हणून त्यांनी वेळीच सावध होऊन स्वत:चे इच्छापत्र बनवले. या इच्छापत्रात त्यांनी त्यांच्या पश्चात त्यांच्या संपत्तीची खासगी विश्वस्त संस्था बनवण्याचे प्रावधान केले आणि त्या संस्थेद्वारेच स्वतःच्या संपत्तीचा कसा विनियोग करावा, हे ठरवले. त्यांची इच्छा या प्रावधानामुळे साकार झाली. या प्रावधानाप्रमाणे त्यांनी इच्छापत्र बनवून घेतले. संबंधितांची स्वाक्षरी करण्यासाठी ते इच्छापत्र घरी घेऊन गेले आणि ‘आज स्वाक्षरी करू’, ‘उद्या स्वाक्षरी करू’, असे करतांना २-४ दिवस गेले. त्यानंतर त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यामुळे त्यांना स्वाक्षरी करता येईना, तरीसुद्धा संबंधित इच्छापत्र जरा बरे वाटल्यावर लगेच स्वाक्षरी करण्याचे त्यांनी ठरवले; परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांनी स्वाक्षरी न केल्यामुळे त्यांनी बनवलेले इच्छापत्र कार्यवाहीत आले नाही.
याचा असा परिणाम झाला की, त्यांनी स्वत: कष्टाने उभी केलेली सर्व मालमत्ता ही वडिलोपार्जित झाली आणि त्या मालमत्तेला ‘हिंदु वारसा हक्क’ लागू झाला. त्यामुळे त्यांची पत्नी आणि त्यांची ४ मुले हे सर्व जण मालमत्तेचे सहमालक झाले. त्याचा परिणाम असा आला की, प्रत्येकाला त्या मालमत्तेमध्ये समान मालकी हक्क मिळाला आणि सर्व मुलांनी मंगल कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आईचा त्याला विरोध होता; परंतु तिचे काही चालले नाही. मुले पैसे घेऊन आपापल्या संसारात रमली. शेवटी त्या दिवंगत व्यक्तीच्या पत्नीकडील पैसे संपले आणि पुढे मुले विचारत नसल्याने तिची दयनीय अवस्था झाली. मुलांच्या हातातील खेळणे बनल्याखेरीज तिला गत्यंतरच राहिले नाही. आपल्या वडिलांचे मृत्यूपत्र न करता निधन झाले म्हणून त्या मुलांनी घरी दिवाळी साजरी केली.
ही सत्य घटना मुद्दाम नमूद करण्याचे कारण, म्हणजे इच्छापत्राचे आपल्या जीवनात काय स्थान आहे ? आणि ते कुठपर्यंत अन् किती खोलपर्यंत परिणाम करू शकते, तसेच एखाद्या वारसाची किंवा आपल्या लाडक्या माणसाची काय हालत होते, याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. समजा जर त्या व्यक्तीने मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केली असती, तरीसुद्धा बुडत्याला काडीचा आधार तरी मिळाला असता आणि त्यावर काहीतरी कायदेशीर कारवाई करता आली असती. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, आपण आपले इच्छापत्र बनवले नसल्यास आजच बनवावा. या सार्यावरून आपल्या असे लक्षात येईल की, इच्छापत्र करणे, ही किती महत्त्वाची गोष्ट आहे.
३. इच्छापत्र बनवण्याचे लाभ
अ. इच्छापत्र बनवल्यामुळे स्वकष्टार्जित मालमत्तेवर वारसांना वारसा हक्क सांगता येत नाही.
आ. इच्छापत्र बनवले असल्यास स्वकष्टार्जित मालमत्तेला कोणताही वारसा हक्क कायदा लागू होत नाही.
इ. इच्छापत्र करणारी व्यक्ती आपल्या स्वकष्टार्जित मालमत्तेचे वाटप स्वतःच्या मर्जीप्रमाणे करू शकते आणि ती कशी करावी ? हेही ती इच्छापत्रात नमूद करून ठेवू शकते. ‘त्या व्यक्तीने आपल्या मालमत्तेचे वाटप अशा तर्हेने का करावे ? यासाठी त्याने असे का केले ?’, असे म्हणून त्याला न्यायालयात आव्हान देता येत नाही.
ई. इच्छापत्र हाती लिहिलेले असले तरी चालते. कोणत्या तरी निश्चित नमुन्यात ते असायलाच पाहिजे, असे कोणतेही बंधन नसते.
उ. इच्छापत्र नोंदवलेले असले अथवा नसले तरी चालते.
ऊ. कायद्याप्रमाणे विशिष्ट सेवेतील लोकांना उदाहरणार्थ सैन्यदलात काम करणार्या व्यक्ती इत्यादी यांना तोंडी इच्छापत्र करण्याचीही मुभा आहे. इतर सर्व गोष्टींची पूर्तता होत असेल, तर असे तोंडी केलेले इच्छापत्रही ग्राह्य धरले जाते.
ए. इच्छापत्र कधीही रहित करता येते.
ऐ. इच्छापत्रात नमूद केलेल्या मालमत्तेचा विनियोग इच्छापत्र करणारी व्यक्ती स्वतःच्या हयातीतही करू शकते. इच्छापत्रात दर्शवलेल्या स्वतःच्या संपत्तीचा विनियोग त्याला आपल्या हयातीत करायचा असल्यास तो तसा करता येतो. यावर काही बंधन येत नाही.
ओ. इच्छापत्रातील एखादे लिखाण बेकायदेशीर ठरले, तर तेवढे लिखाण अथवा ते लिखाण असणारे एखादे कलमच बेकायदेशीर ठरते. संपूर्ण इच्छापत्र त्यामुळे बेकायदेशीर ठरत नाही.
औ. इच्छापत्राविषयी गुप्तता पाळली जात असल्याने भविष्यातील वाटणीवरून लाभार्थींमध्ये लगेच वादावादीला तोंड फुटत नाही.
– श्री. श्रीनिवास घैसास
(साभार : दैनिक ‘लोकसत्ता’, ४.१.२०२३)