अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या परंपरेतील थोर संत श्री गजानन महाराज यांच्या पावन पादुकांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात शुभागमन !
‘फेब्रुवारी २०२३ मध्ये म्हापसा येथे झालेल्या सोमयागात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या परंपरेतील थोर संत आणि परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र अन् त्यांच्या चरणपादुका घेऊन त्यांचे भक्तगण सहभागी झाले होते. सनातनच्या साधकांनी त्यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट देण्याची विनंती केली होती. या अनुषंगाने ११.२.२०२३ या दिवशी अक्कलकोटचे परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका घेऊन त्यांच्या भक्तगणांचे रामनाथी आश्रमात शुभागमन झाले. या वेळी सूक्ष्म स्तरावर लक्षात आलेली वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. अक्कलकोट येथील परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका यांचे आगमन
१ अ. वायूमंडलातील शक्ती आणि श्री दत्ततत्त्व यांमध्ये वाढ होणे : अक्कलकोटचे परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका घेऊन त्यांचे भक्तगण चारचाकी गाडीने आले होते. चारचाकी गाडी सनातनच्या रामनाथी आश्रमात प्रवेश करताच वायूमंडलातील शक्ती आणि श्री दत्ततत्त्व यांच्यात वाढ झाली. ‘श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंचे अवतार असून त्यांच्या परंपरेतील परम सद़्गुरु गजानन महाराज यांच्यातही दत्ततत्त्व असल्याने त्यांच्या आगमनामुळे वायूमंडलातील शक्ती आणि श्री दत्ततत्त्व यांमध्ये वाढ झाली आहे’, असे माझ्या लक्षात आले.
१ आ. वायूमंडलातील सूक्ष्म प्रकाशात वाढ होणे : जयघोष करत भक्तगणांनी अक्कलकोट येथील परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका चारचाकी गाडीतून बाहेर आणल्यावर मला वायूमंडलातील सूक्ष्म प्रकाशात वाढ झाल्याचे दिसले. त्या वेळी मला जाणवले, ‘परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे तेजतत्त्वाच्या स्तरावरील कार्य चालू असल्याने त्यांचे छायाचित्र आणि चरणपादुका, हेही तेजतत्त्वाने भारित झाले आहेत. अक्कलकोट येथील परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका यांच्यातून प्रक्षेपित तेजतत्त्वाचा परिणाम झाल्यामुळे सूक्ष्म प्रकाशात वाढ झाली.’
२. अक्कलकोट येथील परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका यांची पाद्यपूजा : रामनाथी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सनातन-पुरोहित श्री. सिद्धेश करंदीकर यांनी परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका हातांत धरलेल्या भक्तांची पाद्यपूजा केली.
२ अ. भक्तांमधील भावामुळे परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका यांची पाद्यपूजा होतांना ‘सद़्गुरु उपस्थित आहेत’, असे जाणवणे : परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका यांचे आश्रमात आगमन झाले. त्या वेळी सनातनचे साधक श्री. संदीप शिंदे यांनी परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र धरले होते. आश्रमातील मुख्य द्वाराजवळ पोचल्यावर परम सद़्गुरु गजानन महाराज यांच्या भक्तगणांनी स्वतः छायाचित्र न घेता ‘श्री. संदीप शिंदे यांनी परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र धरले आहे. त्यामुळे ते पाद्यपूजेच्या मानाचे अधिकारी आहेत’, असे सांगितले.
या वेळी परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र श्री. संदीप शिंदे यांनी हातांत धरले होते आणि चरणपादुका त्यांच्या एका भक्ताने हातांत धरल्या होत्या. त्या वेळी त्यांचे अस्तित्व न जाणवता ‘सूक्ष्मातून परम सद़्गुरु गजानन महाराजच पाद्यपूजेसाठी उपस्थित आहेत’, असे मला जाणवत होते. या संदर्भात ईश्वराने सांगितले, ‘परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे शिष्य गुरूंचा सगुण देह किंवा मानाची अपेक्षा, यांमध्ये न अडकता सेवाभावाने सर्व कृती करत आहेत. शिष्यांनी गुरूंप्रती असा सात्त्विक भाव ठेवल्यामुळे गुरुतत्त्वाला त्यांच्यासाठी प्रगट व्हावे लागते. त्यामुळे गुरूंचा देहत्याग होऊन अनेक वर्षे झाली, तरी भक्तांच्या भावामुळे छायाचित्र आणि पादुका यांमध्ये परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे इतरांचे अस्तित्व न जाणवता ‘सूक्ष्मातून परम सद़्गुरु गजानन महाराजच पाद्यपूजेसाठी उपस्थित आहेत’, असे जाणवले.’
२ आ. पूजनामुळे वायूमंडलातील आपतत्त्व आणि चैतन्य यांमध्ये वाढ होणे : परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका यांची पाद्यपूजा होत असतांना मला वायूमंडलातील आपतत्त्व आणि चैतन्य यांमध्ये वाढ झाल्याचे जाणवले. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘आपतत्त्व हे भावाशी निगडित असते. पाद्यपूजेतून समष्टी व्यक्त करत असलेल्या कृतज्ञताभावामुळे आपतत्त्वात वाढ झाली. समष्टी भावामुळे पादुकांतून प्रक्षेपित होणार्या शक्तीचे चैतन्यात रूपांतर झाले.’
२ इ. पाद्यपूजा होतांना माझा आणि उपस्थित अन्य साधकांचा भाव जागृत होऊन आम्हाला हलकेपणा जाणवत होता.
(ज्ञान मिळवतांना होणार्या आध्यात्मिक त्रासांपासून रक्षण होण्यासाठी आणि लिखाणातील काळी शक्ती नष्ट होण्यासाठी लिहिलेला नामजप)
३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका यांचे दर्शन घेणे : शारीरिक स्थिती बरी नसतांनाही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका यांचे दर्शन घेतले.
३ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दर्शन घेतल्यावर परम सद़्गुरु गजानन महाराज यांच्या छायाचित्रातील चैतन्यात वाढ होऊन त्यातील सजीवता वाढणे आणि चरणपादुकांतून आनंद प्रक्षेपित होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दर्शन घेण्यापूर्वी परम सद़्गुरु गजानन महाराज यांच्या छायाचित्रात ६० टक्के चैतन्य कार्यरत होते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका यांना हात जोडून नमस्कार केला अन् त्यांना फूल अर्पण केले. या कृतींमुळे परम सद़्गुरु गजानन महाराज यांच्या छायाचित्रातील चैतन्यात वाढ होऊन ते ८० टक्के झाले, तसेच छायाचित्रात असलेले परम सद़्गुरु गजानन महाराज आणि त्यांच्या मागे असलेले श्री स्वामी समर्थ यांचे चित्र सजीव झाल्याचे मला जाणवले. ‘परम सद़्गुरु गजानन महाराज यांच्या चरणपादुकांमध्ये कार्यरत चैतन्याचे आनंदात रूपांतर झाले’, असे माझ्या लक्षात आले.
३ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पादुकांवर डोके टेकवून नमस्कार केल्यावर पादुकांमध्ये सुप्त रूपात असलेले समष्टी गुरुतत्त्व, म्हणजे श्री दत्ततत्त्व जागृत होऊन समष्टीसाठी प्रक्षेपित झाल्याने वैराग्य आणि शांती यांची अनुभूती येणे : काही वेळाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पादुकांवर डोके (कपाळाचा भाग) टेकवून नमस्कार केला. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी परम सद़्गुरु गजानन महाराज यांच्या चरणपादुकांवर डोके ठेवल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले खोल अशा निर्गुण अवस्थेत जात आहेत’, असे दृश्य मला दिसले. त्यानंतर पूर्ण वायूमंडलात मोठ्या प्रमाणात वैराग्य आणि शांती यांची स्पंदने अन् सूक्ष्म श्वेत प्रकाश प्रक्षेपित होत होता. काही वेळाने ‘परम सद़्गुरु गजानन महाराज यांच्या चरणपादुकांतून प्रक्षेपित निर्गुण तत्त्व खोलीपुरते मर्यादित न रहाता ते साधना करणार्या सर्वत्रच्या समष्टीकडे प्रक्षेपित होत आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्या वेळी मला जाणवले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अध्यात्मात उच्च पदावर असूनही शिष्यभावाने वागतात. अशा समष्टी शिष्याने गुरुपादुकांवर डोके (कपाळाचा भाग) टेकवून नमस्कार केल्यामुळे पादुकांमध्ये सुप्त स्वरूपात असलेले समष्टी गुरुतत्त्व, म्हणजे श्री दत्ततत्त्वच समष्टी भाव असलेल्या शिष्यासाठी प्रगट आणि जागृत झाले. एवढेच नव्हे, तर समष्टी शिष्यभावामुळे ते साधना करणार्या सर्वत्रच्या समष्टीपर्यंत प्रक्षेपित झाले. श्री दत्ततत्त्व हे वैराग्य आणि शांती यांच्याशी निगडित आहे. त्यामुळे वायूमंडलात वैराग्य आणि शांती यांची स्पंदने जाणवत आहेत.’ (या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले म्हणाले, ‘‘परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका यांना हात जोडून नमस्कार केल्यावर तेवढी स्पंदने जाणवली नाहीत; पण डोके टेकवून नमस्कार केल्यावर पुष्कळ स्पंदने जाणवली.’’)
३ इ. सूक्ष्मातून श्री स्वामी समर्थ आणि परम सद़्गुरु गजानन महाराज यांनी आशीर्वाद दिल्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील गुरुतत्त्वात वाढ होऊन ते ‘परमहंस’ स्थितीत रहाणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पादुकांना डोके टेकवून नमस्कार केल्यानंतर ते भक्तगणांशी अनौपारिक चर्चा करत असतांना सूक्ष्मातून श्री स्वामी समर्थ आणि परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे अस्तित्व जाणवून ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना आशीर्वाद देत असल्याचे मला दिसले. ‘या आशीर्वादामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यातील गुरुतत्त्वात वाढ होऊन ते परमहंस गुरु (टीप १) स्थितीत आहेत’, असे मला जाणवले. राष्ट्रगुरु, धर्मगुरु, मोक्षगुरु, ज्ञानगुरु, यानंतरची गुरूंची अवस्था, म्हणजे परमहंस अवस्था (सच्चिदानंद परब्रह्म या अवस्थेचे पर्यायी नाव). त्या वेळी मला जाणवले, ‘गुरूंचे देह वेगळे असले, तरी तत्त्व एक असते. गुरूंना आज्ञापालन करणारे आणि आज्ञापूर्तीसाठी सर्वकाही समर्पित करणारे शिष्य आवडतात. अशा शिष्यांना त्यांच्या कार्यात यश देण्यासाठी गुरुतत्त्व वेळोवेळी विविध स्वरूपांत प्रगटते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले गुर्वाज्ञेने समष्टीत अध्यात्माचा प्रसार करत आहेत. त्यामुळे काळानुसार चालू असलेल्या कार्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना यश मिळवून देण्यासाठी गुरुतत्त्वाचे अंश असलेले श्री स्वामी समर्थ आणि परम सद़्गुरु गजानन महाराज सूक्ष्मातून आशीर्वाद देऊन त्यांना परमहंस अवस्थेत ठेवत आहेत.’
टीप १ – ‘परमहंस’ शब्दाची व्याख्या
१. ज्याला ‘सच्चिदानंद ब्रह्म मीच आहे’, असा स्वानुभव आला आहे तो.
२. ‘अवधूत’चे चार प्रकार आहेत- कुटीचक्र, बहूदक, हंस आणि परमहंस. यांपैकी परमहंस सर्वश्रेष्ठ आहे.
३. परमहंस होणे, म्हणजे सर्व प्रकारच्या बंधनांतून मुक्त होणे.
(संदर्भ : संकेतस्थळ – https://educalingo.com/hi/dic-hi/paramahansa)
४. परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका यांचे षोडशोपचार पूजन : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका यांचे दर्शन घेतल्यानंतर सनातन-पुरोहित श्री. ईशान जोशी यांनी पुरुषसूक्त म्हणत परम सद़्गुरु गजानन महाराज यांच्या चरणपादुकांचे भावपूर्ण षोडशोपचार पूजन केले.
४ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सूक्ष्मातून श्री स्वामी समर्थ आणि परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे षोडशोपचार पूजन करत असल्याचे दृश्य दिसणे अन् त्यामुळे समष्टीवर आशीर्वादाचा कृपावर्षाव होणे : सनातन-पुरोहित श्री. ईशान जोशी परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका यांचे भावपूर्ण षोडशोेपचार पूजन करत होते. या वेळी ‘वायूमंडलातील श्वेत प्रकाशात पुष्कळ वाढ झाली होती आणि तपोलोकातून आशीर्वादाचा श्वेत झोत रामनाथी आश्रम आणि साधना करणारी समष्टी यांच्याकडे प्रक्षेपित होत आहे’, असे मला दिसले. ‘सामान्य षोडशोपचार पूजनातून एवढा परिणाम होण्याचे कारण काय ?’, हे जाणून घेण्यासाठी डोळे बंद केल्यावर मला पुढील दृश्य दिसले, ‘सूक्ष्मातून श्री स्वामी समर्थ आणि परम सद़्गुरु गजानन महाराज, हे दोघे जण मोठ्या सिंहासनावर बसलेले असून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ त्यांचे भावपूर्ण षोडशोपचार पूजन करत आहेत. पूजनामुळे श्री स्वामी समर्थ आणि परम सद़्गुरु गजानन महाराज यांना पुष्कळ आनंद होऊन ते देत असलेल्या आशीर्वादामुळे संपूर्ण समष्टीकडे आशीर्वादाचा श्वेत प्रकाशझोत येत आहे.’ त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ !’, या अध्यात्मातील तत्त्वानुसार उच्च आध्यात्मिक स्तर असूनही श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ शिष्यभावात राहून सूक्ष्मातून करत असलेल्या भावपूर्ण पूजनामुळे प्रसन्न होऊन करुणासिंधु श्री स्वामी समर्थ आणि परम सद़्गुरु गजानन महाराज केवळ श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यावर नव्हे, तर साधना करणार्या सर्वत्रच्या समष्टीवर कृपाशीर्वादाचा वर्षाव करत आहेत. यातून सर्व गुरु समष्टी भावाचे महत्त्व समष्टीला शिकवत आहेत.’
४ आ. षोडशोपचार पूजनामुळे परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका यांच्यात ८० टक्के निर्गुण चैतन्य कार्यरत होऊन ते जनलोकापासून चौथ्या पाताळापर्यंत प्रक्षेपित होणे : षोडशोपचार पूजन चालू असतांना उपस्थितांवर उपाय होत होते, तसेच त्यांना ‘ध्यान लागणे, शांती जाणवणे, मन निर्विचार होणे, ‘ॐ’कार ऐकू येणे’, अशा चांगल्या आध्यात्मिक अनुभूतीही येत होत्या. एकाच वेळी दोन्ही परस्परविरोधी आध्यात्मिक पालट जाणवण्यामागील कारण शोधल्यावर माझ्या लक्षात आले, ‘स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही स्तरांवर चालू असलेल्या षोडशोपचार पूजनामुळे परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र आणि चरणपादुका यांच्यात ८० टक्के निर्गुण चैतन्य कार्यरत झाले आहे. या निर्गुण चैतन्याचे प्रक्षेपण तपोलोकापासून चौथ्या पाताळापर्यंत होत आहे. त्यामुळे वाईट शक्तींचा त्रास असलेल्या साधकांना चैतन्य मिळत असल्याची अनुभूती येत आहे, तर वाईट शक्तींचा तीव्र त्रास नसलेल्या आणि ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकांना विविध प्रकारच्या चांगल्या अनुभूती येत आहेत.’
४ इ. षोडशोपचार पूजन पूर्ण झाल्यावर भस्माचा सुगंध येणे आणि ही ‘पूर्ण कृपे’ची अनुभूती असल्याचे जाणवणे : षोडशोपचार पूजन पूर्ण झाल्यावर पुढील काही क्षण मला सतत भस्माचा सुगंध येत होता. हा सुगंध उत्साहवर्धक आणि मनाला तृप्ती देणारा असून ‘तो घेतच रहावा’, असे मला वाटत होते. या संदर्भात माझ्या लक्षात आले, ‘पिंडी ते ब्रह्मांडी’, ही व्यष्टी प्रक्रिया आहे. यात जिवाचा प्रवास पृथ्वीतत्त्वाकडून आकाशतत्त्वाकडे होत असतो; याउलट ‘ब्रह्मांडी ते पिंडी’ ही समष्टी प्रक्रिया आहे. यामध्ये निर्गुण निराकार ईश्वरी तत्त्व किंवा गुरुतत्त्व साधक आणि भक्त यांच्यावर कृपा करण्यासाठी पंचतत्त्वांच्या माध्यमातून प्रगटते. ज्या वेळी निर्गुण तत्त्व आकाश, वायु, तेज, आप या तत्त्वांना व्यापून पृथ्वीतत्त्वापर्यंत पोचते, त्या वेळी सूक्ष्म गंध निर्माण होतो. हा सूक्ष्म गंध कार्यपूर्णतेची किंवा ईश्वर आणि गुरु यांनी समष्टीवर केलेल्या ‘पूर्ण कृपे’ची साक्ष असते. या प्रसंगात श्री दत्तावतार श्री स्वामी समर्थ आणि त्यांच्या परंपरेतील परम सद़्गुरु गजानन महाराज यांनी समष्टीवर ‘पूर्ण कृपा’ केली असल्याने भस्माचा सूक्ष्म गंध आला.’
५. संत आणि साधक यांनी परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र अन् चरणपादुका यांचे दर्शन घेणे : परम सद़्गुरु गजानन महाराज यांच्या चरणपादुकांचे षोडशोपचार पूजन झाल्यानंतर आश्रमातील संत आणि साधक यांनी परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र अन् चरणपादुका यांचे दर्शन घेतले. त्या वेळी सूक्ष्म स्तरावर पुढील परिणाम झाले.
टीप १ – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी परम सद़्गुरु गजानन महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. तेव्हा त्यांनाही ‘त्यांच्यात वायुतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत आहे’, असे जाणवले.
६. परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र अन् चरणपादुका यांचे प्रस्थान होत असतांना त्यांतून श्वेत ज्योत प्रक्षेपित होऊन ती रामनाथी आश्रमाच्या वायूमंडलात विलीन होणे : आश्रमातील संत आणि साधक यांनी परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र अन् चरणपादुका यांचे दर्शन घेतल्यानंतर परम सद़्गुरु गजानन महाराज यांच्या भक्तांनी प्रस्थानाची (जाण्याची) सिद्धता चालू केली. परम सद़्गुरु गजानन महाराज यांचे छायाचित्र अन् चरणपादुका यांचे प्रस्थान होतांना त्यांच्यातील निर्गुण तत्त्वात अधिक वाढ होऊन त्याचे प्रमाण ८५ टक्के झाले. त्या वेळी सूक्ष्मातून परम सद़्गुरु गजानन महाराज यांच्या चरणपादुकांतून दिव्याच्या ज्योतीच्या आकारातील श्वेत रंगाची मोठी ज्योत बाहेर पडली आणि ती रामनाथी आश्रमाच्या वायूमंडलात विलीन झाली. या संदर्भात मला जाणवले, ‘सद़्गुरु हे माऊली असतात. यामुळे गुर्वाज्ञापालन करणार्या प्रत्येकाची ते काळजी घेतात. सनातनच्या राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या कार्यात पुढील काळात काही अडचण येऊ नये; म्हणूनच जणू परम सद़्गुरु गजानन महाराज यांनी स्वतःचा एक चैतन्यमय अंश किंवा आशीर्वाद रामनाथी आश्रमात कायमचा ठेवून दिला आहे.’
७. कृतज्ञता : संत म्हणजे भूतलावर प्रगटलेले ईश्वर. भक्तांसाठी ईश्वर सतत कार्यरत रहातो. संत स्थुलदेहातून भूतलावर राहू शकले नाहीत, तरी छायाचित्र, पादुका अशा विविध स्वरूपांत ते भक्तांसाठी सतत कार्यरत रहातात आणि योग्य काळ आल्यावर त्या त्या भक्तांकडे जाऊन त्यांच्यावर कृपावर्षाव करतात. ‘अशीच कृपा श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थ यांच्या परंपरेतील परम सद़्गुरु गजानन महाराज यांनी सनातनच्या सर्व साधकांवर केली आहे’, याबद्दल श्री दत्तात्रेय, श्री स्वामी समर्थ, परम सद़्गुरु गजानन महाराज आणि त्यांचे भक्तगण यांच्याप्रती कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२३, संध्याकाळी ५.१५)
|