काढलेली जलपर्णी तशीच नदीत सोडल्याने आळंदी (जिल्हा पुणे) येथील इंद्रायणी नदी जलपर्णीमय !
आळंदी (जिल्हा पुणे) – डुडुळगाव ते आळंदी येथील इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे काम पिंपरी महापालिकेच्या माध्यमातून चालू आहे; परंतु पाण्यातील जलपर्णी काढल्यानंतर ती नदीच्या काठावर न टाकता ती तशीच नदीत पुढे ढकलली जात आहे. परिणामी काढलेली जलपर्णी पाण्यातून वहात जाऊन आळंदीतील इंद्रायणीचे संपूर्ण पात्र या जलपर्णीने भरून गेले आहे. (अकार्यक्षम महापालिका प्रशासन ! – संपादक) त्यामुळे तेथे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पिंपरी महापालिका हद्दीतून चिखली, कुदळवाडी, तळवडे या भागांतील मैलारूपी सांडपाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडले जात आहे. या सांडपाण्यामुळे जलपर्णीची कायमस्वरूपी वाढ होऊ लागल्याचे दिसून येत आहे. जलपर्णी काढण्याचे काम करणार्या कर्मचार्यांना कोणतेही मार्गदर्शन नाही. परिणामी जलपर्णी काढण्याचा केवळ देखावा पिंपरी महापालिका हद्दीत होत आहे.
जलपर्णी मात्र पुन्हा आळंदीकडेच सोडली गेल्याने सिद्धबेट परिसर, ज्ञानेश्वरी मंदिर ते गरूड स्तंभ परिसरात जलपर्णी पुन्हा दिसू लागली आहे.