सातारा नगरपालिकेकडून १०० हून अधिक अनधिकृत ‘फ्लेक्सबोर्ड’ शासनाधीन !
सातारा, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – अनधिकृतपणे शहरातील चौकाचौकांमध्ये फ्लेक्सबोर्ड लावून स्वतःची जाहिरात करणार्या तथाकथित समाजसेवक आणि जाहिरातदार यांच्यावर नगरपालिकेच्या ‘अतिक्रमण हटाव विभागा’च्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १०० हून अधिक अनधिकृत फ्लेक्सबोर्ड काढत ८ जणांना दंडात्मक कारवाईची नोटीस ठोठावण्यात आली आहे. फ्लेक्सबोर्ड काढण्याची मोहीम यापुढेही चालू रहाणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांनी दिली.
प्रशांत निकम पुढे म्हणाले की, अनेक वेळा कारवाईचा बडगा उगारला किंवा फ्लेक्सबोर्ड कह्यात घेतले, तरीही पालिकेची अनुमती न घेताच सार्वजनिक ठिकाणी तथाकथित समाजसेवक किंवा जाहिरातदार फ्लेक्सबोर्ड लावतात. अशा तथाकथित जाहिरातदारांवर अंकुश ठेवण्यासाठी पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम हातात घेतली आहे. मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेवरून जिल्हा शासकीय रुग्णालय, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, गोडोली चौक, शाहूनगर, बॉम्बे रेस्टॉरंट चौक या परिसरांत अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. सातारा नगरपालिकेच्या प्रशासकीय सभेत झालेल्या ठरावाप्रमाणे अतिक्रमण करणार्या संबंधितांकडून प्रत्येकी १० सहस्र रुपये सेवा शुल्क वसूल केले जाणार आहे.