मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अनधिकृत ‘मोबाईल टॉवर्स’ना नोटिसा !
नवी मुंबई, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील पाचही बाजारपेठांमध्ये असलेल्या अनधिकृत ‘मोबाईल टॉवर्स’ना महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. महापालिकेची अनुमती न घेता बाजार समिती आणि व्यापारी यांनी काही ठिकाणी गाळ्यांवर अनधिकृतपणे मोबाईल टॉवर उभारले आहेत. यातील बहुतांश मोबाईल टॉवर हे बाजार समितीने उभारलेले आहेत. त्यामुळे संबंधित पाचही बाजारांतील उपसचिवांनाही या नोटीस देण्यात आलेल्या आहेत. (एवढे टॉवर उभे राहीपर्यंत प्रशासन काय करत होते ? – संपादक)
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांना नोटीस देण्याची कार्यवाही नियमितपणे केली जाते. त्यानुसार बाजार समितीच्या आवारातील अनधिकृत मोबाईल टॉवरनाही नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मसाला बाजार आणि भाजीपाला बाजारात प्रत्येकी ३ मोबाईल टॉवर असून, धान्य बाजारात २, फळ बाजारात १ तर इतर ३ ठिकाणी, कांदा बटाटा बाजारात १ ठिकाणी मोबाईल टॉवर उभारण्यात आलेले आहे.
मोबाईल टॉवरसाठी महापालिकेची अनुमती घेणे बंधनकारक होते; मात्र ती घेण्यात आली नसल्याने हे टॉवर अनधिकृत ठरवून बाजार समितीला नोटिसा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या नोटिसीची मुदत संपल्यानंतर संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याचे बंधनकारक आहे. असे असतांना महापालिकेचे अधिकारी त्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करत असल्याने अनधिकृत बांधकामे करणार्यांचे चांगलेच फावले आहे. याविषयी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेश भुसारी यांना संपर्क केला असता त्यांनी बैठकीत असल्याचे सांगून अधिक माहिती देण्यास नकार दिला.