रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !
|
मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे त्यागपत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संमत केले आहे. याविषयीची माहिती राष्ट्रपती भवनाने दिली आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बैस हे महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांनी त्यागपत्र द्यावे, अशी मागणी केली होती. देशातील १३ हून अधिक राज्यपाल आणि उपराज्यपाल यांचे स्थानांतर आणि नियुक्ती राष्ट्रपती भवनाकडून करण्यात आली आहे.
रमेश बैस यांची पार्श्वभूमी
रमेश बैस यांचा जन्म २ ऑगस्ट १९४७ मध्ये छत्तीसगडच्या रायपूरमध्ये झाला. १९७८ मध्ये ते सर्वप्रथम नगरपालिकेत निवडून आले होते. १९८० ते ८४ मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते. रमेश बैस यापूर्वी झारखंड आणि त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. छत्तीसगड राज्यातील रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आलेले ते खासदार होते. रमेश बैस हे आजवर एकही निवडणूक पराभूत झालेले नाहीत. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात ते राज्यमंत्री होते.
देशातील अन्य राज्यपाल आणि उपराज्यपाल यांचे स्थानांतर, तसेच नियुक्ती !
अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन्, आसाम राज्यपाल – गुलाबचंद काटरिया आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून शिवप्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल बी.डी. मिश्रा यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मणिपूरचे राज्यपाल गणेशन् यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांच्याजागी नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस हे याआधी झारखंडचे राज्यपाल होते. @maha_governor@rashtrapatibhvn@BSKoshyari #RameshBais pic.twitter.com/AU1LRlzo5K
— AIR News Aurangabad (@airnews_arngbad) February 12, 2023
बिहारचे राज्यपाल फागु चौहान यांची मेघालयाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवृत्त न्यायमूर्ती एस्. अब्दुल नजीर यांची आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. आंध्रप्रदेशचे राज्यपाल बिस्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडच्या राज्यपालपदी नियुक्ती आणि छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उकिये यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.